उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत व पोलिस अंमलदार निकम यांच्या दिशेने दगडांचा मारा वाढल्यानंतर उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून हवेत चार राऊंड फायर केले.
छत्रपती संभाजीनगर : तलवार, चाकूच्या धाकावर दोन शेतवस्तीवर सात जणांनी दरोडा (Chhatrapati Sambhajinagar Robbery) टाकला. यात शेतवस्तीवरील कुटुंबांना मारहाण करीत दागिन्यांसह लॅपटॉप, रोकड असा सव्वातीन लाखांचा ऐवज लुटणाऱ्या सात जणांना शिऊर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
दरम्यान, दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडांचा मारा केला. चाकूनेही हल्ला केला. यात एका पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार गंभीर जखमी झाला. रात्री दीडच्या दरम्यान सुरू झालेला थरार सकाळी साडेअकरापर्यंत सुरू होता. पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन दरोडेखोरांना बुधवारी (ता. आठ) मध्यरात्री तर तुरीच्या शेतात लपलेल्या पाच दरोडेखोरांना गुरुवारी (ता. नऊ) सकाळी साडेअकराच्या सुमारास पकडले.
हल्ला करून पसार झालेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन करून शेतात रोखले. पोलिसांनी दरोडेखोरांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी पोलिसांवर चाक, तलवारींसह हल्ला केला. यात दोन पोलिस गंभीर जखमी झाले. मात्र, जिवाची बाजी लावत पोलिसांनी दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या.
दरम्यान, उसाच्या शेतात चहूबाजूंनी दरोडेखोरांना चहूबाजूंनी वेढल्यावर पोलिसांनी दरोडेखोरांना शरण येण्यास सांगितले. मात्र, आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाच मारून टाकू, असे दरोडेखोर ओरडू लागले. त्यांनी दगडांचा मारा सुरू केला. दगडांचा मारा वाढल्याचे पाहून अखेर पोलिसांनी दरोडेखोरांच्या दिशेने आगेकूच केली.
उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत व पोलिस अंमलदार निकम यांच्या दिशेने दगडांचा मारा वाढल्यानंतर उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून हवेत चार राऊंड फायर केले. इतके होऊनही दरोडेखोर शरण आले नाहीत. काही दरोडेखोर श्री. दुल्हत, श्री. निकम यांच्या हाती लागले.
मात्र, त्यांनी दगडांनी, चाकूने हल्ला केला. यात उपनिरीक्षक दुल्हत यांच्यासह श्री. निकम गंभीर जखमी झाले. श्री. दुल्हत यांनी आपल्या अंगावर चाकू घेऊन अंगावर धावलेल्या दरोडेखोराच्या दिशेने दोन राउंड फायर केले. यात अमित चव्हाण याच्या हाताला, पोटाला जखम झाली. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक दरोडेखोर जखमी झाल्यानंतर उर्वरित चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
दरोडेखोर हे रेकॉर्डवरील असून, त्यांच्याविरोधात शिऊर, देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे यापूर्वीही दाखल झाले आहेत. या घटनेत दुल्हत यांच्या छातीवर, हातावर वार बसले. निकम यांच्या हातावर, दंडावर वार बसून त्यांचे बोट फ्रॅक्चर झाले. गंभीर जखमी झालेल्या या दोघांना वैजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस अधीक्षकांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांची विचारपूस करत त्यांच्यासह कुटुंबीयांना धीर दिला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार, सहायक अधीक्षक महक स्वामी, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील, अंमलदार राहुल थोरात, अमृत ठोके, विशाल पैठणकर, भरत कमोदकर, संभाजी आंधळे, श्रद्धा शेळके यांनी केली. दुसऱ्या दिवशी पथकातील भगतसिंग दुल्हत, मधुकर मोरे, विजय जाधव, पोलिस अंमलदार सिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे, अशोक वाघ, वाल्मीक निकम, यांनी केली आहे. देवगाव रंगारी ठाण्याचे सहाय निरीक्षक अमोल मोरे, अंमलदार ऋषीकेश पैठणकर, भावसिंग जारवाल, केशरसिंग राजपूत, रोडगे यांचाही दरोडेखोरांना शोधण्यात सक्रिय सहभाग होता.
सागर रतन भोसले (२०), रावसाहेब भीमराव पगारे (३५, रा. पडेगाव, ता. कोपरगाव, जि. नगर) या दोन दरोडेखोरांना शिऊर पोलिसांनी रात्री पाठलाग करून वाहनासह पकडले. दरोडा टाकून रात्री शेतात लपून बसलेले दरोडेखोर अमित ऊर्फ अमीनखान कागद चव्हाण (२३, रा. हिंगणी ता. कोपरगाव), श्याम बडोद भोसले (२७), धीरज भारंब भोसले (१९), पांडुरंग ऊर्फ पांडू भारंब भोसले (२६, रा. तिघेही पडेगाव ता. कोपरगाव, जि. नगर), परमेश्वर दिलीप काळे (२२, रा. थेरगाव ता. कर्जत जि. नगर).
आठपेक्षा जास्त दरोडेखोरांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री साडेअकराच्या दरम्यान शिऊर पोलिस ठाणे हद्दीतील साकेगाव, मणेगाव शेतवस्तीला लक्ष्य केले. विष्णू पंढरीनाथ सुराशे (५०) हे मुलगा रूपेश (२०), पत्नी हीराबाई असे तिघे शेतवस्तीवरील घराच्या ओट्यावर झोपले होते. रात्री दरोडेखोरांनी चाकूने, लोखंडी गजाने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. रूपेशवर हल्ला झाल्याचे पाहून मदतीला धावलेल्या आई-वडिलांनाही दरोडेखोरांनी मारहाण केली. चाकूच्या धाकाने हीराबाईंच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे दागिने काढून घेत ते पसार झाले.
पहिला हल्ला झाल्यावर दरोडेखोर देवगाव रंगारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानडगाव (सटीचे, ता. कन्नड) येथील शेतवस्तीकडे वळले. या ठिकाणी देविदास लक्ष्मण नलावडे (५०) आणि पत्नी संगीता नलावडे यांच्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास ते झोपेत असताना दरोडेखोरांनी चाकू, लोखंडी गज, काठ्यांनी हल्ला केला. यात देविदास नलावडे यांच्या डोक्यात चाकूचा वार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले तर पत्नीही जखमी झाली. दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने, घरातील लॅपटॉप असा दोन लाख ८० हजार रुपयांचा ऐवज घेत पोबारा केला.
पोलिसांना या घटनांची माहिती मिळताच शिऊर, देवगाव रंगारी, गंगापूर, कन्नड, वैजापूर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. शिऊर ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने खामखरी नदी, कानडगाव भागातील नदी, नाल्यात दरोडेखोरांचा शोध सुरू केला. त्याचवेळी साकेगाव जवळील पेट्रोलपंपाच्या बाजूला अंधारात उभे टाटा एसी गोल्ड वाहन वेगाने शिऊरकडे गेल्याचे समजताच पोलिसांनी पाठलाग करून पहाटे अडीच वाजता (एमएच १७ बीवाय ९१८९) संशयित वाहन बोरसर फाट्यावर पोलिस व्हॅन आडवी लावून पकडले.
यावेळी सागर भोसले, रावसाहेब पगारे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र, मागील दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत जानेफळकडे पळाले. दरोडेखोरांनी पोलिसांना हूल देण्यासाठी वाहनात क्रेट ठेवले होते. त्यात ैैदोन कप्पे बनविले. त्यात दरोडेखोरांनी तलवारी, चाकू, दगड आदी साहित्य लपविले. दुसऱ्या कप्प्यात सात-आठ जण बसतील अशी रचना होती. या परिसरात स्थानिक गुन्हे शाखा, शिऊर पोलिसांनी रात्रभर ‘सर्च ऑपरेशन’ राबविले.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता जानेफळ शिवारात तलावाजवळ निमसे पाटील यांचे तुरीचे व मुख्तार शेख यांच्या मक्याच्या शेतात दरोडेखोर लपले होते. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, दरोडेखोरांनी दगडांचा तुफान मारा सुरू ठेवला. ‘आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जिवंत मारुन टाकू’ असे दरोडेखोर ओरडत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.