chhatrapati sambhajinagar three arrested More than 110 crimes eight house burglaries confessed crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : अट्टल गबऱ्यासह तिघांना बेड्या; तब्बल ११० पेक्षा अधिक गुन्हे, आठ घरफोड्यांची कबुली

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : घरफोड्या करणाऱ्या अट्टल तिघांना मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाने १२ जूनरोजी रात्री सापळा लावून अटक केली. तर चौथ्या आरोपीला १३ जूनरोजी जालन्याहून उचलले. विशेष म्हणजे, अटकेतील आरोपींपैकी बबन ऊर्फ गबऱ्या भागाजी मकळे (४०, रा. मुकुंदनगर) याच्याविरोधात आजवर तब्बल ११० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे.

त्याच्यावर दोन वेळेस तडीपारीची कारवाई झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. अटक करताच आरोपींनी वर्षभरात तब्बल आठ मोठ्या घरफोड्या केल्याची कबुली दिली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गबऱ्यासह अरविंद ऊर्फ राजू अब्दुल सदाशिव अल्हाट (२४, रा. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकासमोर शिवशाहीनगर), सोमिनाथ अशोक कांबळे (२३, रा. शिवशाहीनगर) आणि पचास ऊर्फ अशोक रावसाहेब लंगोटे (२३, रा. मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मुकुंदनगरात राहणारे विजय विश्वनाथ काकडे (४३, रा. मुकुंदनगर) यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी रोख ३० हजार, एलईडीसह, मंगळसूत्र, गौतम बुद्धांची मूर्ती, घड्याळ आदी ऐवज लांबविला होता. हा गुन्हा आरोपी गबऱ्या याने साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून मुकुंदवाडी पोलिस गबऱ्याच्या मागावर होते.

अशी केली अटक

अखेर गबऱ्या आणि त्याचे साथीदार हे जयभवानीनगरातील १३ वी योजना परिसराच्या मैदानावर एकत्र आल्याची कुणकुण मुकुंदवाडी पोलिसांना लागली होती. दरम्यान निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक पंकज मोरे, नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, शैलेंद्र अडीयाल, सुखदेव जाधव, पोलिस अंमलदार समाधान काळे, मनोहर गीते, अनिल थोरे, संतोष भानुसे, शाम आढे, योगेश बावस्कर, अनिल कोमटवार, जया बनसोड यांनी सापळा रचून तिघा आरोपींना अटक केली.

विशेष म्हणजे चौथा आरोपी अशोक पचास हा तिथे येण्याआधीच तिघांना उचलल्याने तो पळाला. त्याला आपल्या साथीदारांना उचलल्याची माहिती मिळाली असता, तो वाऱ्याच्या वेगाने जालन्याला गेला. तोपर्यंत अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहितीआधारे त्यालाही दुसऱ्या दिवशी जालन्याहून पोलिसांनी उचलले. आरोपी अशोक व्यतिरिक्त अटकेतील तिघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी पंकज मोरे यांनी सांगितले.

तब्बल ११० पेक्षा अधिक गुन्हे

आरोपी गबऱ्याविरोधात आजवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यासह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच विविध जिल्ह्यांत चोऱ्या, घरफोडीचे तब्बल ११० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली. इतकेच नव्हे, तर गबऱ्याविरोधात दोन वेळेस तडीपारीचीही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अटकेतील आरोपींच्या ताब्यातून एक लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोण आहे हा गबऱ्या?

गबऱ्या हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याची शहरात आंबेडकर चौक, मुकुंदवाडी आणि रेल्वेस्थानकापलीकडे अशी तीन ठिकाणी घरे आहेत. अनधिकृत जागेवर चार पत्रे ठोकली की झाले घर तयार! अशा परिस्थितीत तो पत्नी आणि मुलाबाळांसह राहत होता. चोऱ्या केल्या की तो कधीच घरी राहत नाही. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी पोलिस तपास करत असताना श्वानपथकाने त्याच्या घरापर्यंत माग काढला मात्र आरोपी गबऱ्या तिथे सापडला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT