सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : जालना रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून जावे लागते. यावर ‘सकाळ’ने ‘वाहतुकीचा बोजवारा’ या मालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकला. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेत रस्ता ओलांडावा लागत असल्याचा हा गंभीर प्रकार समोर आणला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी चौकात ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून वाहतूक थांबवून पादचाऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयोग सुरू केला आहे.
दरम्यान, आकाशवाणी चौकात हा प्रश्न तूर्त मार्गी लागला असला तरी इतर चौकांमध्ये, वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक सुधारण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.जालना रस्त्यावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा म्हणून सिग्नलमध्ये तीस सेकंदाचा वेळ असतानाही पोलिस दुर्लक्ष करत असल्याने या वेळेवर वाहनधारकच आक्रमण करत होते.
त्यामुळे पादचाऱ्यांना सुसाट वाहतुकीतून जीव सांभाळत कसाबसा मार्ग काढत रस्ता ओलांडावा लागत होता. महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना तर अनेकदा रस्ता ओलांडण्यासाठी तर १५ ते २० मिनिटांचाही कालावधी लागत होता. मुळात वाहतुकीचा पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी आकाशवाणी आणि अमरप्रित चौक बंद केले. मात्र, हे करताना पादचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याने सकाळने एकूणच वाहतूकीच्या विषयाला हात घातला.
वाहतुकीचा बोजवारा अशी मालिका सुरू केली. पाच भागातील मालिकेत तिसऱ्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी चौकात ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने वाहतूक थांबवून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदतीचा हात देणे सुरू केले आहे.
कायमस्वरुपी हवी व्यवस्था
आकाशवाणी चौकात पोलिसांनी ध्वनीक्षेपक लावून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सकाळ व संध्याकाळी काही काळ ही व्यवस्था केली आहे. मात्र, चौक उघडले जाणार नसतील तर ही व्यवस्था कायमस्वरुपी आणि दिवसभर आवश्यक आहे. जालना रस्त्यावर दिवसभर वाहतूक कायम असते, पोलिस नसले तर पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नल टायमींवर वाहनधारक आक्रमण करतात, त्यामुळे ही व्यवस्था दिवसभर असली पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.