उस्मानाबाद : नियती कधी कोणता खेळ खेळेल हे सांगता येत नाही. एका क्षणात नियती आकाशातील उल्केला पृथ्वीवरील पाषाण करून सोडते. असेच काहीसे येथील पूजा ओंकार सुतार यांच्या बाबत घडले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचे पती, सासरे आणि सासू अशा घरातील तीन व्यक्तींचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. पाळण्यात असलेला चार-पाच महिन्यांचा अजिंक्य आणि पूजा या दोन व्यक्तीच वाचल्या. पण, आता आपला अन् चिमुकल्या अजिंक्यचा उदरनिर्वाह कसा करावा, ही चिंता पूजा यांना झोपू देत नाही.
पूजा यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. चिमुकल्याच्या भविष्यासाठी कुठेही नोकरी करण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देवळाली (ता. उस्मानाबाद) येथील पूजा यांचे लग्न पाच वर्षांपूर्वी उस्मानाबाद शहरातील ओंकार यांच्याशी झाले होते. ओंकार यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून शहरातच प्रॅक्टीस सुरू होती. ओंकार यांचे वडील एका सहकारी संस्थेत तात्पुरत्या स्वरूपात लिपिक होते. एप्रिलमध्ये कोरोनाची लाट आली. ॲड. ओंकार यांच्यासह त्यांच्या आई, वडिलांना कोरोनाची बाधा झाली.
प्रथम वडिलांना शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. ओंकार आणि त्यांच्या आईसाठी शहरात कुठेही बेड उपलब्ध झाला नाही. अखेर मिरज येथील दवाखान्यात त्यांना जावे लागले. त्यांच्यासोबत त्याची आई मिरज येथे उपचारासाठी गेली. मात्र, दुर्दैव असे की वडील बब्रूवान भीमराव सुतार हे १ मे २०२१ रोजी कोरोनाने दगावले. दुसऱ्या दिवशीच म्हणजे २ मे २०२१ रोजी ॲड. ओंकार यांचाही कोरोनात मृत्यू झाला. चौथ्या दिवशी ४ मे २०२१ रोजी ओंकार यांच्या आईचाही कोरोनाने मृत्यू झाला.
पाच जणांच्या कुटुंबात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर चिमुकला अजिंक्य आणि ओंकार यांच्या पत्नी पूजा असे दोघेच उरले. अखेर पूजा यांनी दुःखाचा डोंगर झेलत वडिलांकडे देवळाली (ता. उस्मानाबाद) येथे राहण्यास गेल्या आहेत. त्यांच्याकडे उस्मानाबाद शहरातील फरशी गल्लीत मोडकळीस आलेले घर आहे. त्याशिवाय राहण्यास आणि जगण्यास कोणतेही साधन उरलेले नाही.
आतापर्यंत ५० हजार मिळालेत
कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन झाले तर ५० हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. त्यामुळे आतापर्यंत पूजा यांना ५० हजार रुपयांची मदत मिळाली. मात्र, त्यांना उर्वरित एक लाख रुपये मिळाले नाहीत. ही रक्कम पूजा आणि अजिंक्य यांच्या भविष्यासाठी पुरेशी नसली तरी यातून त्यांना तात्पुरता आधार मिळणार आहे. पण, आपल्या आणि अजिंक्यच्या उदरनिर्वाहासाठी पूजाला नोकरी हवी आहे. कोरोनाने दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विविध सवलती देण्याचे सूचना निघाल्या आहेत. मात्र, अद्याप तरी पूजा यांच्यापर्यंत योजना पोचल्या नाहीत.
माझ्या कुटुंबातील सर्वच कर्त्या व्यक्ती दगावल्या. आता केवळ मी आणि माझा दीड वर्षाचा मुलगाच राहिलो आहोत. शासनाकडून मला नोकरीची अपेक्षा आहे. माझे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. कुठेही नोकरी करण्याची तयारी आहे. माझा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
- पूजा सुतार, उस्मानाबाद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.