छत्रपती संभाजीनगर : शहरात कोरोना संसर्गाचा शुक्रवारी (ता. २२) एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता, त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला होता. पण शनिवारी (ता. २३) हर्सूल सावंगी भागातील १८ वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात दोन दिवसात तीन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. शनिवारी दिवसभरात १२२ जणांच्या चाचण्या करण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासोबतच शहरातही कोरोना हळूहळू पाय पसरत आहे. गुरुवारी सिडको एन-७ भागातील एक मुलगी आणि एक महिला पॉझिटिव्ह निघाली होती. मात्र, शुक्रवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. शुक्रवारी ५८ संशयित रुग्णांच्या आरटीपीसीआरचे स्वॅब घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. शनिवारी त्यातील ४८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दहा रुग्णांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.
शनिवारी दिवसभरात १२२ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यातील ६० जणांच्या आरटीपीसीआरचे स्वॅब तपासणीसाठी घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उर्वरित ६२ रुग्णांची अॅण्टीजेन चाचणी केली असता हर्सूल-सावंगी भागातील १८ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह निघाली. तिचा आरटीपीसीआरचा स्वॅब तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
आतापर्यंत ३३९ चाचण्या
कोरोना संसर्गाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत. गुरुवारी ६६, शुक्रवारी १४१ तर शनिवारी १२२ जणांच्या ॲण्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.