पाचोड : दीड वर्षापासून कोरोनामुळे शिक्षणाची पूर्णतः वाट लागली. कोरोनाचे संकट दूर सारत आता हळूहळू शैक्षणिक स्थिती पूर्वपदावर येत असून, विद्यार्थीही शाळेत जात आहेत. मात्र, शाळांतील रिक्त जागा भरण्याकडे लक्ष दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येते. पाचोडसह पैठण तालुक्यातील ४० शाळा गणिताच्या शिक्षकांविना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एकीकडे शासन शैक्षणिक गुणवत्ता वाढून दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करीत आहे. तर दुसरीकडे पाच ते सात वर्षे जबाबदार घटकाच्या रिक्त जागाच भरत नसल्याने शिक्षणाचे तीन- तेरा वाजत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून पैठण तालुक्यातील शिक्षण विभागात एकूण १,३०५ पैकी दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह १५ केंद्र प्रमुखांच्या, २३ मुख्याधापकांच्या व ४८ पदवीधर प्राथमिक शिक्षकाच्या तर ३५ सहशिक्षकांच्या अशा १२३ जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे, त्यामुळे सधन व जागरूक पालक आपल्या पाल्यांना शहरांची वाट दाखवत आहे.
एकंदरीत सहशिक्षक गेल्या सहा वर्षांपासून मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाची ‘प्रभारी’ जबाबदारी सांभाळीत असून, ते शिक्षणमंत्र्यांपेक्षाही अधिक रुबाब गाजवीत आहे. त्यांना नामी संधीचा मिळालेला मोह सुटण्यास तयार नसून, पाच वर्षांपासून तालुक्यात बदलून आलेल्या शिक्षकांना तर ‘प्रभारी’ कोण हे सुद्धा माहीत नाही, ते प्रभारींनाच आपले नियमित ‘वरिष्ठ’ समजतात.
पैठण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४४ प्राथमिक, सहा माध्यमिक अशा २५० तर १८ केंद्रीय प्राथमिक शाळा असून, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची चार पदे मंजूर असून, दोन पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची अठरा पदे मंजूर असून, तीन कार्यरत तर पंधरा पदे रिक्त, मुख्याध्यापकांची ९२ पदे मंजूर असून, ६९ पदे कार्यरत तर २३ पदे रिक्त, पदवीधर प्राथमिक शिक्षकांची २७१ पदे मंजूर असून, २२३ कार्यरत तर ४८ पदे रिक्त, सहशिक्षकांची ९२० पदे मंजूर असून, ८८५ जण कार्यरत तर ३५ जागा रिक्त आहेत.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अनिता वानखेडे यांनी तातडीने रिक्त जागा भरण्याची मागणी केली असून, जागा न भरल्यास आपण शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
गणित विषयाच्या रिक्त पदांचा तपशिल
आडूळ, ज्ञानेश्वरवाडी, मायगाव, कुरणपिंप्री, दरेगाव, खादगाव, फारोळा, शिवणी, धनगाव, पोरगाव, ढोरकीन, ब्रम्हगाव, देवगाव, रजापूर, धूपखेडा, लोहगाव, आवडे उंचेगाव, घेवरी आदी. उर्दू माध्यम गणित : बालानगर, कारकीन, लोहगाव, हिरडपूरी, नवगाव, पिंपळवाडी, कोळी बोडखा.
सर्व रिक्तपदांची वरिष्ठांना प्रत्येक महिन्याला माहिती देण्यात येते. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही वरिष्ठांच्या अधिनिस्त आहे. जिल्हाभर हीच परिस्थिती आहे. माणसंच नाहीत, काही बदलून गेले, काही सेवानिवृत्त झाले. आम्ही काय करणार?
-श्रीराम केदार, गट शिक्षणाधिकारी, पैठण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.