छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली. यावेळी हाउसिंग सोसायट्यांमध्येही मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. दोन टप्प्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कामकाज होणार आहे. ‘बीएलओ’मार्फत मतदार यादीतील नावातील दुरुस्त्या, नाव वगळणे, नाव समाविष्ट करणे, अस्पष्ट फोटो अद्ययावत करणे, त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
ज्या मतदान केंद्रावर १५०० पेक्षा अधिक मतदान आहे, त्या ठिकाणच्या केंद्राची पुनर्रचना होणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांना बीएलए (बूथ लेवल एजंट) नियुक्त करावा लागणार आहे. हा एजंट बीएलओच्या (बूथ लेवल ऑफिसर) मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.
बीएलएच्या मदतीने मतदार याद्यांच्या दुरुस्ती व अद्ययावती करण्याचे काम केले जाणार आहे. मात्र, हा व्यक्ती दररोज केवळ दहा अर्जच बीएलओकडे देवू शकणार आहे. मतदार याद्याही यावेळी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या ऐवजी बीएलएमार्फत दिल्या जाणार आहेत. राजकीय पक्षांना जर फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवायचे असेल तर त्यांना बीएलए नियुक्त करावाच लागणार आहे.
मतदानासाठी मतदाराला कुठल्याही परिस्थितीत दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर जावे लागू नये, अशा सूचना आहेत. त्यामुळेच यावेळी मोठ्या सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र दिले जाणार आहेत. अनेक वेळा एकाच कुटुंबातले व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रावर जातात.
असे होऊ म्हणून मोठ्या ग्रुप हाउसिंग सोसायटीच्या ठिकाणीच मतदान केंद्र देण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. यामुळे नागरिकांना मतदान केंद्राची शोधाशोध करणे आणि रांगेमध्ये थांबण्याची गरज राहणार नाही. अशा ठिकाणचे मतदार सवडीनुसार मतदान करू शकणार आहेत. सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी संमती दिली तर असे केंद्र दिले जाणार आहेत.
बीएलओ यांच्यामार्फत घरोघर जाऊन सर्वेक्षण.
गरजेनुसार विद्यमान मतदान केंद्रांचे पुनर्रचना आणि नवीन केंद्रांची स्थापना
मतदार यादीतील दुबार नावे, नावातील त्रुटी, चुकीचे पत्ते, खराब फोटो दुरुस्त करणे.
मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे
प्रारूप मतदार यादी २५ जुलैला रोजी प्रसिद्ध होईल.
या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील.
दावे व हरकतींवर कार्यवाही १९ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल.
अंतिम मतदार यादी २० ऑगस्टला प्रसिद्ध होणार.
मतदानाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरूच राहील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.