sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Gas Tanker Accident Sambhaji Nagar : भयग्रस्त चेहरे, चिंतेचे सावट ; भोंग्यावरील सूचना ऐकताच हजारो लोकांनी सोडली घरे

पहाटे पाच-साडेपाचची वेळ. कोणी मॉर्निंग वॉकला जाण्याच्या तयारीत तर कोणी ड्युटीवर जाण्याच्या तयारीत. शाळेत जाणाऱ्या मुलांची आवरा-आवर सुरू असतानाच अचानक भोंग्यावरून ‘तुम्ही घराचे एक किलोमीटर अंतर सोडून सुरक्षित ठिकाणी जा. घरातील विजेचे दिवे बंद करा, ज्वलनशील पदार्थ वापरू नका, जनरेटर बंद करा, असे आवाहन सिडको एन-३, एन-४, कॅनॉट प्लेस भागातील नागरिकांच्या कानावर पडले आणि एकच घाबरगुंडी उडाली. अनेकांनी इतर भागांत राहणाऱ्या जवळच्या नातेवाइकांना फोन करून घर गाठले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पहाटे पाच-साडेपाचची वेळ. कोणी मॉर्निंग वॉकला जाण्याच्या तयारीत तर कोणी ड्युटीवर जाण्याच्या तयारीत. शाळेत जाणाऱ्या मुलांची आवरा-आवर सुरू असतानाच अचानक भोंग्यावरून ‘तुम्ही घराचे एक किलोमीटर अंतर सोडून सुरक्षित ठिकाणी जा. घरातील विजेचे दिवे बंद करा, ज्वलनशील पदार्थ वापरू नका, जनरेटर बंद करा, असे आवाहन सिडको एन-३, एन-४, कॅनॉट प्लेस भागातील नागरिकांच्या कानावर पडले आणि एकच घाबरगुंडी उडाली. अनेकांनी इतर भागांत राहणाऱ्या जवळच्या नातेवाइकांना फोन करून घर गाठले.

सिडको उड्डाणपुलाच्या परिसरातील हजारो नागरिकांनी अवघ्या तासाभरात घर सोडले. चिंतातूर चेहरे आणि परिसरात भीतीचे सावट असे वातावरण पहाटेपासून दुपारपर्यंत अर्ध्या शहरात होते. यातून भोपाळ गॅस दुर्घटनेची नागरिकांना आठवण झाली, तर ही घटना सिनेस्टाईल घडल्याची चर्चाही होती. सिडको उड्डाणपुलावर पहाटे सव्वा पाचच्या सुमारास गॅसच्या टॅंकरला अपघात झाल्याने गळती सुरू झाली.

यामुळे परिसरातील एक किलोमीटर अंतरातील नागरिकांच्या जिवाला धोका असल्याने प्रशासनाने तातडीने परिसर रिकामा करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील लेमन ट्री, वन, अजिंठा ॲम्बेसिडरमधील पर्यटकांना तातडीने हॉटेल सोडण्याची सूचना करण्यात आली. इतर हॉटेलचालकांना हॉटेल सुरू न करण्याची सूचना देण्यात आली. वसंतराव नाईक, शिवछत्रपती महाविद्यालयासह परिसरातील शाळांतील सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यासोबतच एन-४, एन-३, कॅनॉट प्लेस भागातील नागरिकांना घरे सोडण्याची सूचना करण्यात आली. महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त सविता सोनवणे, प्रसाद देशपांडे, अर्जुन गिराम, नइम अन्सारी, नागरिक मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्यासह प्रभाग तीन, पाच, सहा व सातचे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. त्यानुसार तासाभरात हजारो नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाणे पसंत केले.

सारेच धावले मदतीला

घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेंद्र जंजाळ,अभिजित देशमुख घटनास्थळी धावून आले. जंजाळ स्वतः ॲम्ब्युलन्स घेऊन आले. त्यानंतर या दोघांनी नागरी वसाहतींमध्ये रिक्षाच्या माध्यमातून फिरून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी प्रसंगावधान राखून घटनेची माहिती अग्निशमन, पोलिस विभागाला दिली. विमानतळाकडे जात असताना हा प्रकार लक्षात आल्याचे राठोड यांनी सांगितले.

पाच शहर बसची व्यवस्था

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी पाच शहर बसची व्यवस्था करण्यात आली होती. काही नागरिकांना बसच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी सोडण्यात आल्याचे सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

टॅंकर चालकाची पटली ओळख

अपघातग्रस्त टॅंकरमध्ये आढळून आलेल्या कागदपत्रांवरुन त्या टॅंकर चालकाचे नाव फिरदोस ताज अन्सारी (रा. झारखंड) असल्याचे आढळून आले. अतिज्वलनशील पदार्थाची वाहतूक मानवी जीवन धोक्यात येईल, अशा पद्धतीने केली. तसेच गॅस वाहतुकीचा टॅंकर निष्काळजीपणे चालवून उड्डाणपुलाच्या कठाड्यास धडक दिली आणि त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना न कळविता टॅंकर सोडून फरार झाला, असे आरोप चालकावर ठेवण्यात आले. याप्रकरणात त्याच्याविरोधात सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारीने वाहन चालविणे, ज्वालाग्राही पदार्थाबाबत हयगयीचे वर्तन करणे, भादंवि कलम २७९, २८५ व मोटार वाहन कायद्याच्या १३४ अन्वये पोलिस उपनिरिक्षक भाग्यश्री शिंदे यांनी फिर्याद दिली.

दिवसभरात पाच लाख लिटर पाण्याचा मारा

छत्रपती संभाजीनगर : अपघातग्रस्त टॅंकरमधून होणाऱ्या गॅस गळतीनंतर आग भडकू नये, यासाठी दिवसभरात तब्बल पाच लाख लिटर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यासाठी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरून सुमारे १०० टॅंकर भरून देण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. सकाळी सहा ते साडेसहापासून टॅंकरवर पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. त्यासाठी लागणारे पाणी सिडको एन-५ येथील जलकुंभावरून आणले जात होते. महापालिकेतर्फे शहरातील गुंठेवारी भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. हे सर्व टॅंकर गुरुवारी अग्निशमन विभागाच्या वाहनांना पाणीपुरवठा करण्यासाठी वळविण्यात आले होते.

दिवसभरात ९८ ते १०० फेऱ्या टॅंकरच्या झाल्या. प्रत्येक टॅंकरची क्षमता पाच हजार लिटरची होती. पाच लाख लिटर पाणी वापरण्यात आले असले तरी शहराच्या इतर भागात पाणीटंचाई जाणवली नाही, असे फालक यांनी सांगितले. पर्यवेक्षक संतोष खेडकर, कनिष्ठ अभियंता अभिजित गावंडे यांनी टॅंकरचा पाणीपुरवठा सुरळीत केला. वाहनांना पाणी कमी पडू नये यासाठी सिडको एन-५ पाण्याची टाकी ते सिडको उड्डाणपूल असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. या रस्त्यावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. टॅंकरवर मारलेले पाणी जालना रोडला असलेल्या साइड ड्रेनमधून वाहून जात होते. या पाण्यात गॅस आहे का? याची याची तपासणी एलपीजी मीटरच्या माध्यमातून केली जात होती.

गल्लीबोळातून काढला मार्ग

छत्रपती संभाजीनगर ः जालना रस्त्यावर गॅस टॅंकरची दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी वाहतूक वळवल्याने जालना रस्त्यालगतच्या बहुतांश समांतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. काहींनी तर गल्लीबोळातून मार्ग काढत घर, कार्यालय गाठले. घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी जालना रस्त्यावर वसंतराव नाईक चौक (सिडको) पासून क्रांती चौककडे जाणारा रस्ता बंद केला होता. तर विरुद्ध दिशेने वसंतराव नाईक चौकाकडे येणारा रस्ता हा सेव्हन हिलपासून बंद केला होता.

त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्यांनी ये-जा करावी लागली. तथापि, नेहमीचे रस्त्यांवरील वाहनांचे अतिक्रमण, अरुंद रस्ते आणि बेशिस्तपणा यामुळे समांतर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत होती. सेव्हन हिलपासून सिडको चौकाकडे येण्यासाठी जकात नाका, सिडको एन-६, पुढे चिश्तिया चौकातून जळगाव रस्त्यापर्यंत यावे लागत होते. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने चिश्तिया चौकातून पुढे चारही दिशांना जाणारे रस्ते जाम झाले होते.

काही प्रमाणात कॅनॉट प्लेसमध्येही रस्त्यांवर वाहतूक वाढल्याने सकाळी तीन ते चार तास वाहतूक जामचा अनुभव येत होता. दुसऱ्या बाजूने सिडको चौकातून पुढे क्रांती चौकाकाडे जाण्यासाठी सिडको चौकातून जयभवानी रस्त्याकडून पुंडलिकनगर रस्त्याने जावे लागत होते. त्यातच अनेकांनी सिडको एन-४ परिसरातील रस्त्यांवरूनही वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक जाम होत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT