औरंगाबाद - कापडी, सर्जिकल, एन-९५, एफएफपी थ्री असे अनेक मास्क बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मास्क कुठला वापरावा, हा प्रश्न सर्वांच्या मनात घोंगावतोय. योग्य मास्क कसा निवडावा, याबाबत त्वचारोगतज्ज्ञ, वैद्यकीय विषयावरील लेखक, आयएमएचे पदाधिकारी डॉ. अनुपम टाकळकर यांनी सविस्तर माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांनुसार सर्वसामान्यांना तीनपदरी कापडी मास्क पुरेसा आहे, असे त्यांनी सांगतिले.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
सर्वसामान्यांसाठी कापडी मास्क पुरेसा
सध्या बाजारात मास्कची अनेक दुकाने थाटली आहेत. त्यामुळे नेमका मास्क कसा असावा, याविषयी डॉ. टाकळकर म्हणाले, की सर्वसामान्य जनतेने सर्जिकल मास्क आणि एन-९५ मास्क वापरण्याची काही विशेष आवश्यकता नाही. जागतिक आरोग्य संघटनेने पाच जून २०२० रोजी मास्कच्या वापरासंदर्भात अंतरिम मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार सर्वसामान्य जनतेने बाहेर पडताना फॅब्रिक मास्कचा वापर करावा. हे फॅब्रिक मास्क (म्हणजे कापडी मास्क) तीनपदरी असावे. या तीन पदरातील आतला पदर हा हायड्रोफिलिक कपड्यांपासून बनलेला असावा. उदाहरणार्थ, सुती कपड्यापासून बनलेला असावा. एकदम बाहेरचा लेअर हा हायड्रोफोबिक कपड्यापासून बनलेला असावा. हायड्रोफोबिक कपडा म्हणजे पॉलिएस्टर किंवा पॉलीप्रोपिलीन किंवा या दोघांच्या मिश्रणातून बनलेला. तर मधला लेअर हा सिंथेटिक नॉन वोव्हन कपडा म्हणजे पॉलीप्रोपिलीन किंवा कॉटन लेयरपासून बनलेला असावा, जेणेकरून फिल्ट्रेशन चांगले होईल किंवा ड्रॉपलेट या मधल्या लेअर मध्येच रोखले जातील. जागतिक आरोग्य संघटनेच्या या सूचना समूह संसर्ग सुरू झालेल्या देशांसाठी आहेत. भारत जरी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जगात चौथ्या स्थानावर असला तरी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अजूनही भारत स्टेज 'टू' मध्येच आहे! परंतु नजीकच्या भविष्यात जर भारत 'स्टेज थ्री' मध्ये पोचला तर या सर्व मार्गदर्शक सूचना आपल्याला देखील लागू होतील.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
हायपॉक्सिया होत नाही
मास्कच्या सतत वापरामुळे हायपॉक्सिया होतो, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो किंवा माणूस बेशुद्ध पडतो अथवा दगावू शकतो या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. सुदृढ व्यक्तीस सामान्यतः या गोष्टी होत नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमचा मास्क तुमचे काम होईपर्यंत घराबाहेर असताना परिधान केलेला कधीही चांगला, असे डॉ. टाकळकर यांनी सांगितले.
मास्क मोठा असावा
रंगीबेरंगी, विविध आकारांचे मास्क बाजारात आहेत; परंतु शक्यतो तीनपदरी मास्क वापरा आणि मास्क हा मोठा असावा, जो की नाक, तोंड आणि हनुवटी पूर्ण झाकू शकेल. मास्क तयार करताना घ्यावयाचा कपडा हा शक्यतो २५ सेंटिमीटर लांब आणि १५ सेंटिमीटर रुंद एवढा मोठा असावा. त्यामुळे स्वस्तात मिळणारे चार इंची मास्क वापरण्यापेक्षा मोठा मास्क वापरणे श्रेयस्कर. खराब झालेला, ओला, छिद्रे असलेला, फाटलेला मास्कदेखील वापरू नये.
विनाकारण हात लावू नका
बऱ्याच लोकांना सवय असते, की ओळखीची कोणी व्यक्ती भेटला तर मास्क तोंडावरून खाली घेतात आणि गळ्यात अडकवतात आणि बोलायला लागतात. असे करणे टाळा. एकदा घराच्या बाहेर पडलं, की तुम्ही घातलेला मास्क हा घरी परतल्यानंतरच काढायचा हे लक्षात घ्या.
काढताना ही घ्या काळजी
हात साबणाने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करून मगच मास्क चेहऱ्यावर घाला. काढताना मास्कच्या पुढील बाजूस स्पर्श न करता केवळ कानाच्या बाजूला असणाऱ्या दोरीला अथवा इलॅस्टिक पकडून काढा आणि लगेच धुवायला टाका. नंतर आपले हात स्वच्छ साबणाने अथवा सॅनिटायझरने धुऊन घ्या; तसेच मास्क शर्टच्या किंवा पॅंटच्या खिशामध्ये ठेवू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.