Chhatrapati Sambhaji Nagar : रागाच्या भरात तीन बायकांच्या वृद्ध नवऱ्याकडून तिसऱ्या बायकोच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार करत चेहऱ्यावर चाकूने वार करत निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना ११ जुलै रोजी सकाळी पावणेनऊ वाजेदरम्यान कांचनवाडी परिसरात उघडकीस आली.
संगीता सुखदेव सोलंकर (३७, रा. कांचनवाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे तर सुखदेव बापूराव सोलंकर (६७, रा. जुने मारुती मंदिर परिसर, कांचनवाडी) असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.
सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुखदेव याला तीन पत्नी आहेत. तो वाल्मी या संस्थेत सेवक पदावरून २०१७ मध्ये निवृत्त झाला आहे. आरोपी सुखदेव याची पहिली पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. पहिल्या पत्नीपासून त्याला तीन मुली, दोन मुले अशी पाच अपत्ये तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली, तर तिसऱ्या मृत पत्नीपासून एक मुलगी, एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.
त्यापैकी १३ वर्षीय लहान मुलगा सातवी वर्गात शिकतो. आरोपीने मृत संगीता सोबत २२ वर्षांपूर्वी लग्न केले होते.
बॅटच्या फटक्यात घेतला जीव
सुखदेव हा पत्नी संगीतासोबत नेहमीच भांडण करून मारहाण करत असे. त्याचे वय ६७, तर तिचे ३७ वर्षे. त्यामुळे तो चारित्र्याच्या संशयावरून तिला मारहाण करत असे. अगदी घरगुती किरकोळ कारणावरूनही तो तिला बेदम मारहाण करत असे.
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान आरोपी सुखदेव याने संगीता हिच्यासोबत भांडण करण्यास सुरवात केली. त्याचवेळी नेहमीचेच भांडण असल्याने लक्ष न देता तिची मोठी बहीण तथा सवत ही एका खासगी डेंटल महाविद्यालयात कामावर निघून गेली.
तिच्या दोन मुलीपैकी एकीचा विवाह झालेला असून, दुसरी मुलगी अंघोळीला गेली होती. तर, तिसऱ्या मृत पत्नीचे मुलं शाळेत नेऊन सोडले होते. आरोपी सुखदेव याने पत्नी संगीतासोबत भांडण करत रागाच्या भरात तिच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार केला. तसेच चेहऱ्यावर आणि हातावर चाकूने वार केले.
पळून जाताना शेतातून केली अटक
आरोपी सुखदेव याने पत्नीचा जीव घेतला आणि बाहेरून घराला लॉक करून पळून गेला. दरम्यान, शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावले असता संगीता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. दरम्यान, सातारा पोलिसांना माहिती देण्यात आली. संगीता हिला तत्काळ घाटीत दाखल केले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.
दुसरीकडे पती सुखदेव याने पत्नीचा खून केल्याचे प्रथमदर्शनी समजताच पोलिस त्याच्या मागावर गेले. तोपर्यंत आरोपीने पळत वळदगाव शिवार गाठले. त्याला शिवारातील गट क्र. ६२ मधून पाठलाग करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
याच शिवारात आरोपीची अडीच एकर जमीन आहे. मृत संगीताचा भाऊ ज्ञानेश्वर लव्हटे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात सातारा गुन्हा दाखल झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.