Sant Tukaram Maharaj sakal
छत्रपती संभाजीनगर

Jagadguru Sant Tukaram Maharaj : जगद्गुरू तुकोबांचा अमृतोत्सव!

जेमतेम बेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभेलेले तुकाराम काय काय लिहून-बोलून जातात?

सकाळ वृत्तसेवा

स्वतःचे मरण डोळ्याने पाहून आपल्या संघर्षशील जगण्याचा अमृतोत्सव साजरा करणारा एकमेवाद्वितीय संत कवी म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम! संसारात राहून, भोवतालच्या माणसांशी वागून अभंग-कीर्तनातून लोकव्यवहार कथन करणारा सामान्यातील असामान्य महापुरुष तुकोबाराय!

जेमतेम बेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभेलेले तुकाराम काय काय लिहून-बोलून जातात? समोरील आव्हानांचा भलामोठा पहाड आणि संघर्षातून दिलेली उत्तरे म्हणजे तुकारामोत्तर लोकांच्या जीवनाला अजीवन पथगामी ठरणारी आहेत. सतरावे शतक, कडेकोट वर्णव्यवस्था यातून मोठ्या कौशल्याने मार्ग काढत तुकोबा पुढे जातात.

आपले अभंग बुडविले तरी कुणालाही एक शब्द न बोलता ज्यांच्यासाठी लिहिले होते त्यांच्याकडेच जाऊन आपली कैफियत मांडतात. त्यांचे अभंग खऱ्या अर्थाने अभंगच राहिले, कारण ते लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले.

आलेले अनुभव सरळ, साध्या लोकभाषेत कथन करून समाजमंथन करण्याचे महत्कार्य तूकोबांनी केल्यामुळेच जनसागराच्या मनपटलावर अभंग तरले आणि त्यानंतर खराखुरा तुकाराम लोकांसमोर आला.

आपल्या लोकसंवादी कीर्तनातून वारकरी विचार प्रकट करतांना महाराजांनी लोकनाडी ओळखली. कर्मकांडांचे माजलेले स्तोम, जातीभेद, बुवाबाजी, जादूटोणा आणि कडेकोट वर्णव्यवस्थेने घायाळ झालेला सामान्य माणूस सुखासाठी रानोमाळ पळत होता. धर्माच्या नावाखाली माणूस पिचला, सैरभैर झाला होता.

सत्य-असत्य यात फरक कळायला मार्ग नव्हता. अशा कठीण परिस्थितीत संत तुकारामांनी आपल्या अभंग विचारांनी सर्वांगीण, विवेकी धर्मक्रांती घडवून आणली. तेराव्या शतकांत ज्या उद्देशाने वारकरी संप्रदाय पुनरुज्जीवित झाला तो उद्देश रुजविण्याचे महत्तम श्रेय सतराव्या शतकात संतश्रेष्ठ तुकारामांनाच जाते.

म्हणूनच "यारे यारे लहान थोरं। याती भलत्या नारीनर॥" उद्देशाने आणि "बुडते हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणोनिया॥" हे शब्द लिहिणारे तुकोबारायच अलीकडच्या काळातील बहुजणांचे उद्धारक ठरतात! संसारातील अनेक दुःखाचे, कठीण प्रसंग तूकोबांनी स्वतः झेलले परिणामी ते त्याविषयी सहजच बोलले!

यामुळेच ते सर्वसामान्य माणसाच्या हृदय सिंहासनावर सर्वकाळ आरूढ झाले. "नवसे कन्यापुत्र होती। तरी का करणे लागे पती॥" असे दैनंदिन जीवनातील सोपे सिद्धांत मांडून "तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी ॥" हे कंबर बांधून, दगडाचे टाळ वाजवून कीर्तनातून प्रतिपादन केल्यानंतर लोक तुकोबांना ऐकायला येऊ लागले. आपल्यातीलच असलेला सामान्य संसारिक-व्यावहारिक माणूस रोजच्या जीवनातले धडे-दाखले देऊन आपल्याला आनंदी रहायला सांगत आहे.

कोणताही सौदा न करता, सुख-दु:ख ह्या संसार नाण्याच्या दोन बाजू असून त्यातून गेल्याशिवाय खरा संसार कळणारच नाही असे सांगणारा आपला माणूस लोकांना भेटला. हातोहात याचा प्रचार-प्रसार झाला आणि कीर्तनाला लोक जमू लागले. हे मोठे क्रांतिकारी पाउल होते.

 तुकोबांच्या अभंगांना अनंत धुमारे फुटतांना तुकोबा सहजच लोकप्रवाही होऊन जातात. तुकोबांची अभिव्यक्त भाषा ही लोकभाषा असल्यामुळे सामान्यांच्या भावना त्यांच्या अभंगांतून सहजतेने प्रवाही होतात. एकाचवेळी तुकोबा अनंत पातळ्यांवर कार्यप्रवण होतांना त्यांच्यातील रोखठोकपणा दृष्टीआड होत नाही.

उपदेश करतांना मेणाहून मऊ होऊन उपदेश करतात आणि नाही ऐकल्यास नाठाळाच्या माथी काठी हाणायला सुद्धा ते मागे पुढे पहात नाहीत. शब्दांच्या शस्त्रांनी वार करणारे तुकोबा मात्र प्रत्यक्ष लोकांशी दोन हात करायला कमी पडतात. याचा परिपाक असा झाला की; त्यांना धर्ममार्तंडांचा मार खावा लागला.

हे होतांना मात्र त्यांची अभंगानुभूती सहजच फुलतांना दिसते. ते असे सहजच का लिहितात? याचे उत्तर "आपुलिया बळे नाही मी बोलत। सखा भगवंत वाचा त्याची ॥" किंवा "सात्विक प्रेमळ दृष्टांताच्या मते। बोलिलो बहूते कळावया ॥" असे त्यांच्या अनेक अभंगांतून वाचायला मिळते. संत तुकारामांच्या अगोदर आणि नंतरही अनेक कवी लेखक होऊन गेले,

मात्र तुकोबांची ही लोकसंग्रही आणि लोकप्रवाही शैली बऱ्याच लेखकांना हाताशी आलेली दिसत नाही. कित्येकांचा उगम आणि अस्त केंव्हा झाला(?) हे कळले सुदा नाही, परंतु अनेक टक्के टोणपे झेलून, वाऱ्या-पावसात त्यांच्या अभंग गाथ्याने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. याउलट काळाच्या ओघात तुकोबांचा अभंग गाथा पहिल्यापेक्षाही जास्त प्रभावी आणि प्रवाही होतांना दिसतो. दिवसेंदिवस तो उजळत राहिला.

असे महद्भाग्य लाखांत एखाद्याच कवी अथवा लेखकाच्या नशिबी असते, आणि त्याला तुकोबा अपवाद राहिले नाहीत. त्यांच्यासमोर अनंत अडचणी उभ्या असतांना व्यतीत झालेले संघर्षमय, खडतर जीवन आणि त्यातून जन्मलेला एकएक अभंग लोकांच्या काळजावर कोरला गेला! याचा परिणाम म्हणजे ज्यांना संत वाङ्मय आणि वारकरी सांप्रदायाचा कसलाही अभ्यास अथवा संबंध नसतांना अनेकांच्या ओठी तुकोबांचे अभंग लीलया ओसंडून वाहतांना पाहून आश्चर्य झाले नाही तरच नवल!

  महाराष्ट्रातील वारकरी आज संत तुकाराम बीज साजरी करत आहे. तुकाराम महाराजांच्या अखंड जीवनात पावलोपावली संघर्ष पाहायला मिळतांना त्यांचे इहलोकातून जाणे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करून गेले. त्यावर तूर्तास न बोलता हा महामानव आपल्यातून जाऊन जवळपास पावणेचारशे वर्षाचा भलामोठा काळ लोटला असतांना; हा लोककवी आपल्यासमोर अनंत प्रश्न आणि जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देतो आहे.

केवढी मोठी ही क्षमता? तुकोबांच्या गाथ्यातील एकाएका अभंगाचे सूक्ष्मपणे अवलोकन केल्यास मराठी वाचकाच्या सहजच त्यांची तळमळ लक्षात येते. मी या अगोदर सुद्धा अनेकवेळा लिहिले आणि बोललो आहे की; एक लेखक-कवी-कीर्तनकार गेल्यानंतर अजूनही त्या माणसाच्या लेखणीच्या आणि जीवनाच्या ताकदीवर अनेकांनी लाखो रुपये कमावले,

कमावत आहेत आणि कमावत राहतील! अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक पदव्या संपादन केल्यात. एवढे होऊनसुद्धा तुकोबा आणखी तुम्हा आम्हाला जागवत आहेत. "केले उपकार सांगू काय। बाप न करी ऐशी माय॥" या ओळी तुकोबांना सर्वकाळ तंतोतंत लागू होतात.

आज आपण तुकोबांचा वसा आणि वारसा चालवणाऱ्या वारकरी सांप्रदायातील लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. बीड जिल्यातील कान्नापुर गावाभोवतालच्या १४ गावांनी एकत्र येवून आदर्श अखंड हरीनाम सप्ताह सुरु केला असून त्यात कोणताही झगमगाट नाही. कीर्तनकार-प्रवचनकार मंडळींना फक्त येण्याजाण्याच्या किरायाशिवाय एक रुपयाही बिदागी दिली जाणार नाही.

भोवतालच्या गावातील लोकांनी घरून भाजी-भाकरी घेऊन यायची आणि अखंड हरीनाम सप्ताहात पंगत करायची. कोणताही बडेजाव न करता आज तुकाराम बिजेच्या दिवशी या आदर्श अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता होत आहे. आज अशा अखंड हरीनाम सप्ताहाची महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायांस नितांत गरज आहे.

शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतांना लाखो रुपयांची पट्टी गोळा करून मनोरंजन करणाऱ्या महाराजांना हजारो रुपये देणे म्हणजे मूळ वारकरी कीर्तन परंपरेचा गळा घोटणे होय! तेंव्हा, तमाम कीर्तनकार आणि सप्ताह आयोजकांनी सावध होऊन हजारो रुपये मागणाऱ्या कीर्तनकारांना न बोलावता केवळ जाण्या-येण्याच्या खर्चात केवळ आणि केवळ अभंगातील तत्वे आणि संत चरित्र कथन करणाऱ्या लोकांनाच बोलवावे!

असे होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकोबांचा वसा-वारसा पुढे घेऊन जाणे होय, खरी तुकाराम बीज साजरी करणे होय अन्यथा केवळ आणि केवळ व्यापार! जय तुकोबाराय!

 प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT