छत्रपती संभाजीनगर - उल्कानगरीमध्ये सोमवारी भल्या पहाटे बिबट्या दिसल्याचा दावा खरा ठरला, तरी बिबट्या प्रत्यक्षात मात्र कुणालाही दिसला नाही. सलग दोन दिवस शोधमोहीम, ट्रॅप कॅमेरा, पिंजरा ठेवूनही बिबट्या सापडला नाही.
मात्र, भर वसाहतीमध्ये बिबट्याचा वावर असण्याची शक्यता कायम ठेवून वन विभागाने शोधमोहीम सुरू ठेवली. वन विभागाचे प्रयत्न सुरू असले, तरी इकडे नागरिकांचा जीव अजूनही भांड्यात पडला नाही. दुसरीकडे शहरातील अमुक भागात बिबट्या दिसला, म्हणून सोशल मीडियावर फोटो पोस्ट होणे मात्र अजूनही थांबलेले नाही.
अग्निहोत्र चौकाकडून खिंवसरा पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर गणपती मंदिरासमोरच्या परिसरात गर्द झाडीच्या विस्तीर्ण परिसरात नाला आहे. दुतर्फा झाडी, भटक्या जनावरांचा वावर आणि छातीच्या उंचीइतके गवत इतका हा दाट परिसर आहे.
या संपूर्ण परिसराभवती नागरी वसाहत असून, या भागात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. सोमवारी सायंकाळी इथल्या एका नागरिकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसल्यावर वन विभागाने शोधमोहीम सुरू केली, जी बुधवारपर्यंतही सुरू होती.
वन विभागाने पिंजऱ्यापासून ते भक्ष्य म्हणून बकऱ्या आणण्यापर्यंत प्रयत्न केले. मात्र, अजूनही पिंजऱ्यातील बकरी जिवंत आहे, तर नाल्याच्या काठावर बसविलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये मंगळवारी रात्री बिबट्या दिसला नाही. उल्कानगरीमध्ये बिबट्या दिसून दोन दिवस उलटूनही बिबट्या सापडत नसल्याने वन विभागाने बिबट्याचा संभाव्य मार्ग तपासला.
उपवनसंरक्षक सूर्यकांत वि. मंकावार, प्रभारी सहायक वनसंरक्षक दादासाहेब तौर, वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर, रोहिणी साळुंके, वनपाल मनोज कांबळे यांनी पोद्दार हायस्कूलजवळ पाहणी केली. इथेही बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले नाहीत.
फॉरवर्डेड पोस्टमुळे वैताग
बिबट्याला प्रत्यक्ष बघणारे महावितरणचे कर्मचारी वगळले, तर एकही व्यक्ती वन विभागासमोर आली नाही. तरीही सोशल मीडियावर मात्र दररोज शहरातील वेगवेगळ्या भागांत बिबट्या दिसल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. बुधवारी विभागीय क्रीडा संकुलामागे काबरानगर-इंदिरानगर येथे बिबट्या दिसल्याचा फोटो व्हायरल झाला होता. वन विभागाने तत्काळ या भागात भेट दिली, तेव्हा मात्र नागरिकांनी बिबट्या दिसला नसल्याचे सांगितले.
वन विभागाचा पहारा
उल्कानगरीमध्ये दिसलेला बिबट्या सापडला नसला, तरीही वन विभागाने मात्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. सोमवारी, मंगळवारी रात्रीही वन विभागाचे कर्मचारी या भागातच बसून होते.
उल्कानगरीमध्ये बिबट्या दिसला होता. मात्र, आम्हाला अजूनही बिबट्या दिसला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी. पण, घाबरून जाऊ नये. वन्यप्राणी दिसल्यास नागरिकांनी वन विभागाला १९२६ या टोल फ्री नंबरवर किंवा वैयक्तिक मला ९५७९२७१५५२ या क्रमांकावर संपर्क करावा.
- दादासाहेब तौर, वनपरिक्षेत्र अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.