Voting esakal
छत्रपती संभाजीनगर

Loksabha Election 2024 : ‘एमआयएम’, ‘वंचित’च्या मतांवर ठाकरे गटाचा डोळा!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांसह नेते, पदाधिकारी कार्यकर्ते भर उन्हात घाम गाळत आहेत. प्रमुख पक्षांच्या मतांची फोडाफोडी करून ती मते आपल्या बाजूने कशी वळविता येईल, याची रणनीती आखली जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाला शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे व गेल्यावेळी मिळालेल्या भाजपच्या मतांची तूट भरून काढावी लागणार आहे. त्यामुळे या पक्षाचा डोळा एमआयएम व वंचित बहुजन आघाडीतील नाराजांच्या मतांवर आहे.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कोण कोणाची मते फोडून ती मते आपल्याकडे वळवितो, यावरच विजयाचे समीकरण ठरणार आहे.

संभाजीनगर मतदारसंघात यंदा वीस लाख ६१ हजार २२० मतदार आहेत तर गेल्या लोकसभा निवडणुकीत १९ लाख ७५ हजार एवढे मतदार होते. यापैकी ६० टक्के मतदान झाले होते. त्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख ८३ हजार एवढी मते घेतल्याने अटीतटीच्या झालेल्या लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी मतविभाजनाच्या जोरावर साडेचार हजार मतांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता.

पण यावेळची निवडणूक सर्वच पक्षांसाठी पूर्णपणे वेगळी आहे. आधी शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना गेल्यावेळी मिळालेल्या मतांच्या भरवशावर यावेळी राहता येणार नाही.

शिवसेनेतील फुटीमुळे व भाजप सोबत नसल्याने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीतील नाराजांच्या मतांवर त्यांनी डोळा ठेवला आहे. यावेळी खैरे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची देखील साथ मिळणार आहे, पण हे मतदान किती? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

मुस्लिमबहुल भागात वाढल्या भेटीगाठी

यावेळी इम्तियाज जलील यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी नाही. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसू शकतो. तसेच वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम उमेदवार दिल्याने अफसर खान किती मतांपर्यंत बाजी मारतात, यावर जलील यांचे गणित विसंबून आहे. खैरे आणि भुमरे यांच्यातील मत विभाजनाचा फायदा पुन्हा आपल्याला होऊ शकतो, असा विश्वास एमआयएमचे समर्थक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, चंद्रकांत खैरे यांच्या मुस्लिम भागात गाठीभेटी वाढल्या असून, त्यावर महायुतीचे संदीपान भुमरे यांचीही ‘नजर’ आहे. खैरे यांचा मुस्लिम भागातील वावर वाढल्याने हिंदू मते त्यांच्यापासून दूर जातील, अशी आखणी महायुतीतर्फे केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT