पाचोड (जि.औरंगाबाद) : पत्नीच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आलेल्या महिला हिंसाचार प्रतिबंधक कलमाखालील गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणुन पैशासाठी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यास सोडून देत दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवल्याने फिर्यादी पत्नीच्या पतीने पोलिसांच्या धास्तीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवून त्यास अटक करावी. या मागणीसाठी चक्क मृतदेह पोलिस (Police) ठाण्यात आणुन उत्तरणीय तपासणी व ते ताब्यास घेण्यास हरकत घेत तब्बल नऊ तास मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याची घटना पाचोड (ता. पैठण) येथे घडली. (Man End Himself Because Of Police Fear In Paithan Taluka Of Aurangabad)
अधिक माहिती अशी, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील दाभरुळ तांडा (ता.पैठण) येथील रोशनी मोहन राठोड (वय २२) या विवाहितेने तिचा पती मोहन गोरख राठोड (वय २४) व अन्य सहा जणांविरुद्ध माहेरहुन दीड लाख रुपये आणण्यासाठी हे सात जण शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची शनिवारी (ता.११) तक्रार दिल्याने पोलिसांनी सात जणांविरूदध हुंडा प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा नोंदवून चौकशीसाठी मोहन राठोड व इतरांना बीट अंमलदार प्रशांत नांदवे व पोलिस नाईक पवन चव्हाण यांनी बोलावून घेत मोहन राठोड यास पन्नास हजारांची मागणी करीत बेदम मारहाण केली. यावेळी मोहन राठोड याने आपल्याकडील वीस हजार रुपये दिले व उर्वरित तीस हजार सोमवारी (ता.१३) देतो म्हणून सागितले व ते गेले. मोहन राठोड हा ऊसतोड कामगार असल्याने आपल्याकडे पैसे नसल्याने पोलिस पुन्हा मारतील. या धाकाने मोहन राठोड यांने सोमवारी (ता.१३) गावांपासून जवळच असलेल्या जामखेड शिवारातील जांबुवंताच्या डोंगर पायथ्याशी जाऊन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता दुपारी बारा वाजता त्यांना मोहन राठोड याचा मृतदेह सापडून आल्याची उपरोक्त सर्व कैफियत व आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला. (Police Violence)
मृतदेह सापडताच संतापलेल्या शेकडो नातेवाईकांनी मोहन राठोड यास खासगी वाहनाद्वारे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ठाकरे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. तोच नातेवाईकांनी मृतदेह दुपारी तीन वाजता थेट पोलिस ठाण्यात आणला. यावेळी उपस्थित साहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता नातेवाईकांनी उपरोक्त कैफियत मांडून संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवून त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही उत्तरणीय तपासणी करू देणार नाही व मृतदेह हलविणार नसल्याची ठाम भूमिका घेतली. या घटनेची वरिष्ठांना कल्पना मिळताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी पाचोड येथे धाव घेवून नातेवाईकांची समजुत काढत मृतदेहाची उत्तरणीय तपासणी होऊन डॉक्टरांचा अहवाल मिळताच दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र रात्रीचे बारा वाजले तरी नातेवाईक जुमानत नसल्याचे पाहुन औद्योगिक पोलीस ठाणे पैठण व बिडकीन पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर रात्री बारा वाजता पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह त्यात टाकून नातेवाईकांना इच्छितस्थळी उत्तरणीय तपासणीसाठी नेण्यासाठी विनंती केली. एक तास उलटला तरी कुणीच नातेवाईक रुग्णवाहिकेत बसत नसल्याने पोलिस ठाण्यात उभी राहिली. अखेर पोलिसांनी सदरील मृतदेह पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या शवगृहात आणुन ठेवले. दुसरा दिवस मंगळवार (ता.१४) उलटला तरी उशीरापर्यत नातेवाईकांनी उत्तरणीय तपासणीस विरोध दर्शवित संबंधितांवर गुन्हे नोंदवून अटक करण्याचा हट्ट कायम ठेवला असुन पोलिसांकडून नातेवाईकांना मृतदेहाची विटंबना होत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांसह राजकीय पदाधिकाऱ्याची नातेवाईकाची समजुत काढताना दमछाक होत आहे.
मृतदेहाची उत्तरणीय तपासणी होऊन अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, परंतु नातेवाईकाकडून होत असलेला उत्तरणीय तपासणीस विरोध मृतदेहाची अवहेलना करणारा आहे. नातेवाईकांस स्थानिक डॉक्टरावर संशय येत असल्यास त्यांनी इच्छितस्थळी कोणत्याही रुग्णालयात उत्तरणीय तपासणी करावी.
- डॉ.विशाल नेहुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, पैठण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.