परळी वैजनाथ : आईच्या पोटातील गर्भजल कमी झालेले. बाळाच्या शरीरावरील सुरक्षा कवच निघून गेलेले. वेळेआधी प्रसुती केल्यानंतर बाळाचे वजन केवळ ७०० ग्रॅम भरले. त्यात श्वसनात अडचणी, इतर अवयवांचे पोषण व्यवस्थित न झालेले.
अशा सर्व स्थितीत परळी येथील डॉक्टरांनी तब्बल २ महिने ११ दिवस उपचार करत या बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. नवजीवन लाभलेल्या या चिमुकल्याला रुग्णालयातून सुटी देताना आई-बाबांसह डॉक्टर्सच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले.
अंबाजोगाई तालुक्यातील कांदेवाडी येथील विद्या दिनकर कांदे या परळी येथे दोन महिन्यांपूर्वी खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. सातवा महिना असल्याने डॉक्टरांनी काही वैद्यकीय चाचण्या केल्या तर त्यात गडबड असल्याचे लक्षात आले.
गर्भातील बाळाच्या शरीरावर असलेले सुरक्षा कवच निघून गेले होते. गर्भजल कमी झाल्याने असे होऊ शकते असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे बाळाला पोटातच संसर्ग होण्याचा धोका असतो आणि जीविताला इजा होऊ शकते.
यामुळे डॉ. शालिनी कराड यांनी सातव्या महिन्यात प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती झाल्यानंतर झालेले बाळ हे वजनाने अत्यंत कमी आणि धोक्याच्या स्थितीत होते. असा प्रकार आजवर कधीही पाहण्यात आला नव्हता, तशा बाळाला शक्यतो लातूर किंवा नांदेड येथे हलवावे लागते.
मात्र आव्हान स्वीकारून ते डॉ.उमेश मुंडे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. डॉ. उमेश मुंडे यांच्याकडे नवजात बाळ उपचारासाठी दाखल केलेले असताना त्याचे वजन मात्र ७०० ग्रॅम होते. त्या बाळाची श्वसन यंत्रणा व्यवस्थित नव्हती, शरीरातील इतर अवयवांचे पोषण झालेले नव्हते. त्याला कृत्रिम श्वसन यंत्राची आवश्यकता असते.
अशा स्थितीत डॉ. मुंडे यांनी बाळावर उपचार सुरू केले. त्याला सुरुवातीला फुफ्पुसे तयार होण्यासाठी इंजेक्शन दिले. संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला हे बाळ दूध पित नव्हते, १ मिलीपासून हळूहळू सुरुवात करण्यात आली.
नंतर प्रकृती हळूहळू सुधारत गेली. तब्बल २ महिने ११ दिवस हे उपचार चालले. हे उपचार चालू असताना डॉक्टर स्वतः तेवढे दिवस दवाखान्यात २४ तास मुक्कामाला असायचे. ही केस आव्हानात्मक नक्कीच होती. सुरुवातीला पुढे काय होईल हे सांगता येणे कठीण होते.
मात्र, विश्वासाच्या पाठबळावर हे आव्हान पेलू शकलो, असे डॉक्टर सांगतात. हे सर्व आव्हान पेलण्यासाठी डॉ. बालासाहेब कराड यांनी प्रोत्साहित केले असेही त्यांनी सांगितले. बाळाचा सातव्या महिन्यात जन्म होऊन पुरुष जातीच्या अर्भकाचे वजन एवढे कमी असणे हे धोक्याचे असते.
श्वसन यंत्रणा कमकुवत असते, बाळाला अन्न देणे कठीण असते. इतर अवयव ठीक काम करत नाहीत. अशा अवस्थेतील बालक जगवणे फार आव्हानात्मक काम आहे. आपण हाताळलेली अशी पहिली केस असल्याचे डॉ.शालिनी कराड यांनी सांगितले.
डॉ. उमेश मुंडे यांनी नवजात अर्भकाला अत्यंत कठीण अवस्थेत दाखल करून घेतले. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत त्याच्यावर उपचार केले. हे काम नक्कीच आव्हानात्मक होते. ते स्वीकारून आम्ही बाळावर उपचार केले आणि त्याला जीवदान देऊ शकलो ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, असे डॉ. मुंडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.