छत्रपती संभाजीनगर : अनेकजण दातांना सरळ करण्यासाठी तार म्हणजे ब्रेसेस लावतात. पण ब्रेसेसमुळे अनेकदा दातांच्या अन्य समस्या तयार होतात. दातांमध्ये वेदना होणे, तोंडाची स्वच्छता राखता न येणे, तोंडातून घाण वास येणे, आणि खाण्यावर मर्यादा येतात. ब्रेसेसमुळे ठराविक कालावधीनंतर डेंटिस्टकडे जावे लागक असल्यामुळे खर्च वाढतो. दंतरुग्णांची ही समस्या लक्षात घेऊन दातांना लावण्यासाठी भारतीय बनावटीचे, सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडतील असे पारदर्शक (क्लिअर) अलाइनर्सचे ‘नेक्झलाईन ’ हे स्टार्टअप ओम सोमवंशी, इरादत खान या तरुणांनी सुरू केले आहे.
शंभरपैकी जवळपास ६० लोकांना दातांविषयी समस्या असतात. अनेकांचे दात वाकडे, बाहेर आलेले किंवा त्यात अंतर असल्यामुळे त्यांना आरोग्याच्या दृष्टीने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय स्वतःचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपले दात चांगले दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. वेड्यावाकड्या दातांमुळे अनेकांना न्यूनगंड येतो. त्यामुळे महागडा खर्च करून ब्रेसेसचा उपयोग केला जातो. त्यानंतरही अनेक बंधने येतात. शिवाय डॉक्टरकडे जावे लागत असल्याने खर्चही वाढतो. हे हेरून ओम सोमवंशी आणि इरादत खान यांनी एक अभिनव प्रयोग केला आहे.
या दोघांचे छत्रपती संभाजीनगरमधील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१९ मध्ये बीटेक मॅकेनिकलचे शिक्षण पूर्ण झाले. हे दोघेही वर्गमित्र आहेत. शिक्षणानंतर त्यांनी थ्रीडी प्रिटींगचा स्टार्टअप सुरू केला. यामध्ये अनेकदा त्यांनी सर्जिकल साहित्य तयार केले. हे करत असताना त्यांनी दातांना लावायचे मेटल ब्रेसेस पाहिले. त्यामध्ये उत्सुकता आल्यामुळे त्यांनी ब्रेसेसचा अभ्यास सुरू केला आणि त्यांना दंतरुग्णांना सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्यांविषयी कळले. त्यातून त्यांना अगदी कमी पैशांत पारदर्शक स्वरूपाचे अलाइनर्स बनवण्याची कल्पना सुचली.
स्टार्टअपच्या माध्यमातून अलाइनर्स
मार्केटमध्ये असलेले पारदर्शक स्वरुपाचे अलाइनर्स किट सर्वसामान्यांना परवडणारे नाही. काही कंपन्यांच्या अलाइनर्सची किंमत लाखांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडतील, असे भारतीय बनावटीचे अलाइनर्स तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नेक्सडेंट प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. त्या माध्यमातून त्यांनी ‘नेक्झलाईन’ हे स्टार्ट अप सुरू केले. या स्टार्टअपच्या माध्यमातून अलाइनर्स ब्रेसेसच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.
अशी आहे प्रक्रिया
ओम आणि इरादत यांचे हे स्टार्टअप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अटल इन्क्यबेशन सेंटरमध्ये नोंदणीकृत आहे. अलाइनर्स हे आयएसओ प्रमाणपत्र असलेले आहे.
याची प्रक्रिया सोपी आहे. सर्वप्रथम रुग्णाला डेंटिस्टकडे जाऊन इंट्रा ओरल स्कॅन करावे लागेल. डेंटिस्ट ते स्कॅन कंपनीला पाठवून देईल आणि ४-५ दिवसांत अलाइनर्सचे किट घरपोच येईल.
ब्रेसेसमुळे दात व्यवस्थित होण्यासाठी वर्ष लागते, तेथे अलाइनर्समुळे ६ ते ७ महिन्यांचा कालावधी लागतो, असा दावा आहे. हे अलाइनर्स लावल्यानंतर ते कधीही काढता येऊ शकतात.
पारदर्शक असल्यामुळे अलाइनर्स समोरील व्यक्तीला दिसत नाही. ते लावल्यानंतर खाण्यासाठीही बंधन नाही की वारंवार डॉक्टर्सकडे जाण्याची गरज नाही. आतापर्यंत दहा रुग्णांनी यशस्वीपणे अलाइनर्स वापरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.