बदनापूर, ता. ७ : तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या बदनापूर रेल्वे स्थानकावर मराठवाडा एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याही जलद रेल्वेगाड्यांना थांबा नाही. त्यामुळे तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना जालना अथवा छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक गाठून तेथून जलद रेल्वेगाड्यांनी पुढचा प्रवास करावा लागतो.
यात अधिकचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. इतर तालुक्यातील रेल्वे स्थानकांवर बऱ्यापैकी जलद रेल्वेगाड्या थांबत असताना केवळ बदनापूरशी दुजाभाव का असा प्रश्न बदनापूर तालुक्यातील जनतेला पडला आहे.
जालना म्हणजे पर्यायाने बदनापूरचे खासदार रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यांच्या काळात तरी बदनापूर स्थानकावर जलद रेल्वेगाड्या थांबविण्याचा महत्त्वाचा निर्णय व्हायला हवा, अशी अपेक्षा बदनापूर शहर व तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची आहे.
निजाम राजवटीत देखील बदनापूर रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व होते. मात्र स्वतंत्र भारतात बदनापूर रेल्वेस्थानक काहीसे दुर्लक्षित झाले. त्यात १५ ऑगस्ट १९९२ रोजी बदनापूरला तालुक्याला दर्जा मिळाला.
मात्र बदनापूर स्थानकाचा फारसा विकास काही झालाच नाही. या स्थानकावर मराठवाडा एक्स्प्रेस आणि सध्या सवारी गाडीची जलद रेल्वे झालेल्या छत्रपती संभाजीनगर - हैदराबाद एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याही जलद रेल्वेगाड्या थांबत नाहीत, हे येथील प्रवाशांचे मुख्य दुखणे आहे.
रेल्वे प्रशासनाचा कायम दुजाभाव
बदनापूर तालुका होऊन ३० वर्षांहून अधिक कालखंड लोटला आहे. बदनापूर तालुक्याला बदनापूर तालुका, अंबड तालुक्यातील काही गावे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही गावे असे जवळपास शंभर गावे जोडलेली आहेत.
मात्र बदनापूर रेल्वेस्थानकावर अद्याप महत्त्वाच्या जलद रेल्वेगाड्या थांबत नाहीत. त्यामुळे मुंबई, हैद्राबाद, तिरुपती, रामेश्वरम या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकतर जालना अथवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाऊन पुढचा प्रवास करावा लागतो, यात प्रचंड वेळ आणि पैसा वाया जातो.
दक्षिण - मध्य रेल्वे प्रशासन बदनापूरच्या बाबतीत दुजाभाव करीत असल्याची प्रवाशांची भावना आहे. बदनापूर तालुका होऊन ३० वर्षे लोटली तरी अद्याप या स्थानकावर तपोवन, नंदीग्राम, देवगिरी, जनशताब्दी अशा नियमित रेल्वेगाड्यांसह कोणत्याही विशेष जलद गाड्या थांबत नाहीत.
त्यामुळे मुंबई, हैदराबाद आणि त्यापुढे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बदनापूर तालुक्याचे रेल्वेस्थानक वगळता नगरसोल, परतूर, सेलू, मानवत रोड आदी तालुक्याच्या ठिकाणी नियमित रेल्वेगाड्यांना थांबा आहे. मात्र बदनापूर तालुक्याचे ठिकाण असताना या ठिकाणी जलद रेल्वे का थांबत नाही असा सवाल रेल्वे प्रवासी उपस्थित करीत आहेत.
दळणवळणाच्या बाबत सुदैवी, पण जालना जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बदनापूर वाहतुकीच्या संदर्भात सुदैवी आहे. बदनापूर तालुका मुंबई - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. शिवाय नव्याने निर्माण झालेला समृद्धी महामार्ग देखील बदनापूर तालुक्यातून जातो.
अशा परिस्थितीत बदनापूरला यापूर्वीच अद्ययावत बसस्थानक होणे अपेक्षित होते. मात्र उशिरा का होईना बदनापूरला बसस्थानक होत आहे, ही समाधानाची बाब आहे. बदनापूर तालुका मुंबई - हैदराबाद अशा रेल्वे मार्गावर येतो.
मात्र बदनापूर स्थानकाचा उल्लेखनीय विकास झालेला नाही. त्यात जलद रेल्वे थांबत नसल्याचा प्रश्न कायम प्रवाशांना सतावत असतो. विमान वाहतुकीच्या बाबतीत बदनापूर तालुका छत्रपती संभाजीनगर विमानतळापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपेक्षा
जालना जिल्ह्याचे रावसाहेब दानवे सध्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघाने पूर्वीपासून भरभरून पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मताधिक्यात बदनापूर मतदार संघाचा वाटा कायम मोठा राहिला आहे.
त्यामुळे आता बदनापूर रेल्वे स्थानकावर जलद रेल्वेगाड्यांना थांबा देने त्यांना शक्य असल्याने त्यांनी तातडीने रेल्वे प्रशासनास सूचना देऊन बदनापूरला जलद रेल्वे थांबविण्याची कार्यवाही करावी. शिवाय बदनापूर स्थानकाचा विकास साधावा, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.