- जितेंद्र विसपुते
औरंगाबाद - वर्ष २०१५ मध्ये राज्यातील पाच पाणथळ भूभागांची, आंतरराष्ट्रीय रामसर दर्जा मिळावा यासाठी निवड करण्यात आली. पैकी एक मराठवाड्याची शान आणि पक्ष्यांचे माहेरघर असलेले जायकवाडी पक्षी अभयारण्य (ता. पैठण, जि. औरंगाबाद) आहे. रामसर दर्जासाठी आवश्यक असलेला जायकवाडीचा अंतिम प्रस्ताव स्थानिक वन्यजीव विभागाकडून शासनाकडे ऑगस्ट २०२० मध्ये पाठविण्यात आला आहे. तेव्हापासून हा प्रस्ताव राज्य शासनाकडेच आहे. यामुळे जायकवाडीच्या रामसरचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पर्यावरणवाद्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
हा प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे आणि केंद्राकडून पुढे रामसर परिषदेला पाठविला जातो. जायकवाडी पक्षी अभयारण्यास रामसर दर्जा मिळावा यासाठी वन्यजीव विभाग २०१५ पासून प्रयत्नशील होता. जायकवाडी धरणाचा परिसर तब्बल १८ हजार १५३ हेक्टर असून पाणपसारा जवळपास ३५ हजार हेक्टरमध्ये पसरलेला आहे. १०७ गावांचे यासाठी पुनर्वसन करण्यात आलेले आहे. १० ऑक्टोबर १९८६ मध्ये जायकवाडी धरणाच्या किनाऱ्यापासून ५०० मीटरपर्यंतचा आतील भाग अभयारण्य म्हणून जाहीर झाला.
जायकवाडी परिसरात जवळपास ६० कुटुंबातील २५५ प्रजातींचे पक्षी येथे आढळून येतात. शिवाय २०१८ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून पाणपक्षी संवर्धनासाठी प्राधान्य देण्यात आलेल्या पाणथळांत जायकवाडी पक्षी अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच २०१७ मध्ये धरणाच्या भिंतीपासून ५०० मीटर बाहेरील भाग केंद्र सरकारकडून इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. तथापि, वन्यजीव विभागाकडून २०२० मध्ये जायकवाडीचा रामसर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. दोन वर्षे उलटली अद्याप हा प्रस्ताव शासनाकडेच पडून आहे. प्रस्ताव पुढे जावा यासाठी लोकप्रतिनिधींचा देखील पाठपुरावादेखील आवश्यक आहे.
रामसर म्हणजे...
इराणमधील रामसर शहरात १९७१ मध्ये जगभरातील पाणथळ भूभागांच्या संरक्षणाबाबत करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत झालेल्या ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. १९७५ पासून हा ठराव अमलात आला. भारतानेही हा करार मान्य केलेला आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक पाणथळ भूभाग औरंगाबाद (१६६८) जिल्ह्यात आहेत. यानंतर उस्मानाबाद (१६६२), तर बीड (१६५३) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कमी पाणथळ भूभाग परभणी (२७६) जिल्ह्यात आहेत.
रामसर यादीत जायकवाडीचे नाव समाविष्ट झाल्यास पाणथळ भूभागावरील जैवविविधतेचे, पर्यावरणाचे अति सूक्ष्म नियोजन करता येते. संबंधित भूभागाची कीर्ती जागतिक पातळीवर पोहोचते. युनेस्कोकडून विशेष दर्जा जाहीर केला जातो. यामुळे पक्षीसंवर्धनासह पर्यटनासही चालना मिळते.
याचेही घोडे अडले
जायकवाडी पक्षी अभयारण्य, बीड जिल्ह्यातील नायगाव मयूर अभयारण्य आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट अभयारण्यातील पक्ष्यांसह वन्यजीवांच्या संवर्धनाकरिता वन्यजीव विभागाने ही अभयारण्य क्षेत्र ‘क्रिटिकल वाइल्डलाइफ हॅबीटॅट एरिया’ (गंभीर परिस्थितीत असलेल्या वन्यजीवांचे अधिवास क्षेत्र) म्हणून जाहीर व्हावे यासाठी देखील २०२० मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत. मात्र यावर देखील अद्याप निर्णय झालेला नाही.
वन्यजीव विभागाकडून २०२० मध्ये जायकवाडीचा रामसरसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव आमच्याकडून वरिष्ठांना पाठविण्यात आलेला आहे.
- डॉ.राजेंद्र नाळे, प्र. विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग, औरंगाबाद.
जायकवाडी पक्षी अभयारण्य मराठवाड्याची शान आहे. त्यास रामसर दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पाठपुरावा करावा.
- अतींद्र कट्टी, मानद वन्यजीव रक्षक, नांदेड.
शासनाने हा प्रस्ताव पुढे जाईल यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासकीय उदासीनता यातून स्पष्ट होते.
- डॉ.सुधाकर कुऱ्हाडे, मानद वन्यजीव रक्षक, नगर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.