robbery bungalow in hanumannagar sambhaji nagar stolen 79 kg gold and 11 lakh rs crime police Sakal
छत्रपती संभाजीनगर

Hanuman Nagar Crime : कुटुंब देवदर्शनासाठी गेल्याची चोरट्यांनी साधली संधी; गजबजलेल्या हनुमाननगरात फोडला बंगला!

Chhatrapati Sambhajinagar Crime : तासाभरात ७९ तोळे सोने, सव्वाअकरा लाखांची रोख लंपास; पुंडलिकनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद.

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचा बंगला फोडून चोरट्यांनी तब्बल ७९ तोळे सोन्याचे दागिने, सव्वाअकरा लाखांची रोख आणि एलईडी टीव्ही असा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी (ता. दोन) सकाळी नेहमीच गजबजलेल्या हनुमाननगर भागात उघडकीस आली.

तीन चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसून येत आहे. घटनास्थळी पुंडलिकनगर पोलिस, ठसेतज्ज्ञ, श्वान पथक; तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या प्रकरणी अशोक तुळशीराम शिंदे (वय ३८, रा. गारखेडा) यांनी तक्रार दाखल केली. शिंदे यांचा पुतण्या अमित मनोहर शिंदे (वय ३२) यांचा हनुमाननगर भागात गल्ली क्रमांक २ येथे दोनमजली बंगला आहे. शिंदे हे मंडप व्यावसायिक असून, ते कुटुंबासहित २२ जूनला केदारनाथ येथे दर्शनासाठी गेलेले आहेत.

शनिवारी (ता. सहा) शिंदे कुटुंब घरी परतणार आहे. सोमवारी (ता. एक) मध्यरात्री सव्वाच्या सुमारास शिंदे यांच्या शेजारी एक घर सोडून असलेल्या लोखंडी जिन्यावरून चोरट्यांनी वर प्रवेश केला.

शिंदे यांच्या दुकानाशेजारी असलेल्या दुकानाच्या पत्र्यावरून शिंदे यांच्या छतावर चोरटे गेले. छतावरील प्रवेशद्वाराचा कडीकोयंडा तोडत त्यांनी हॉलमध्ये प्रवेश केला. यानंतर बंगल्यातील पॉल, दोन बेडरूममधील कपाटातील सर्व साहित्य त्यांनी बाहेर काढून फेकले.

कपाटातील ड्रॉव्हर धुंडाळत त्यांनी किमती ऐवज लंपास केला. सकाळी खाली असलेल्या दुकानात कामाला असलेली तरुणी छतावर कुंड्यातील रोपांना पाणी टाकण्यासाठी आली असता, हा प्रकार उघड झाला.

पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर एएसआय म्हस्के हे पथक आणि ठसेतज्ज्ञासह दाखल झाले. श्वान पथकालादेखील पाचारण करण्यात आले. श्वान खालील रस्त्यापर्यंत माग काढून तिथेच घुटमळला.

घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, गुन्हे शाखेचे पीएसआय संदीप सोळुंके, नवनाथ खांडेकर, अमोल शिंदे आदींनी भेट देत पाहणी केली. या घटनेत चोरट्यांनी ७९ तोळे सोन्याचे दागिने आणि सव्वाअकरा लाखांची रोख रक्कम, पाचशे ग्रॅम चांदी, एलईडी टीव्ही असा ऐवज लंपास केला.

दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात मध्यरात्री १.१० वाजता दुचाकीवरून तीन चोरटे आल्याचे व ते २.१० वाजता निघून गेल्याचे आढळले. हे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत.

रेकी करून चोरी केल्याचा संशय

अमित यांची नागपूर येथे असलेली बहीण शनिवार रात्री घरी आली होती. रविवारी रात्री घराला कुलूप लावून चावी अमितच्या मित्राकडे देऊन ती नागपूरला गेली होती. यानंतर चोरट्यांनी एक दिवस रेकी करून चोरी केल्याची शक्यता आहे.

१२ दिवसांत दुसरी मोठी घरफोडी

१२ दिवसांत शहरात घडलेली घरफोडीची ही दुसरी मोठी घटना आहे. २० जूनला भरदिवसा चोरट्याने चिकलठाणा विमानतळासमोरील फिनिक्स प्राइड या सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर असलेल्या आकाश देऊळगावकर या बँक मॅनेजरचे घर फोडून १० तोळ्यांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

सहा महिन्यांत शहरात १४१ घरफोड्या

शहरात गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन्ही परिमंडळांत मिळून १४१ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी परिमंडळ १ अंतर्गत ६१ घटना घडल्या असून, परिमंडळ २ अंतर्गत ८० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी २० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेचा अभाव

हनुमानगर येथील शिंदे यांच्या घरी घरफोडीची घटना घडल्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पथक, ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाला याची माहिती लवकर प्राप्त झाली नव्हती. ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दोन तास उशिरा दाखल झाले. अधिक तपास केला जात आहे.

चोरटे असे घुसले घरात

शिंदे यांचे घर दोनमजली असून, खालच्या मजल्यावर दोन दुकाने आणि वर छत आहे. या छताच्या टेरेसवर हॉलमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. शिंदे यांच्या बंगल्याच्या शेजारी मोबाइल शॉपी असून, त्यावर पत्र्याचे शेड आहे. मोबाइल शॉपीशेजारी इलेक्ट्रिकल दुकान असून, त्याच्या बाजूला बाहेरून लोखंडी जिना आहे.

त्यावरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. चोरट्यांनी या लोखंडी जिन्याचा वापर करीत वरचा मजला गाठला. त्या जिन्यावरून ते मोबाइल शॉपीच्या पत्र्याच्या शेडवर उतरले. तेथून चालत त्यांनी शिंदे यांचे टेरेस गाठले. टेरेसवरच्या रूमचा कडीकोंडा तोडत त्यांनी घरात प्रवेश केला आणि लाखोंचा डल्ला मारला.

पहिल्या बेडरूममधील चोरीला गेलेला ऐवज

  • १७ तोळ्यांचे दोन हार

  • सात तोळ्यांचे दोन नेकलेस

  • दीड तोळ्याच्या दोन बांगड्या

  • चार तोळ्यांचे १५ सोन्याचे तुकडे

  • पाच तोळ्यांचे एक गंठण

  • सहा ग्रॅमची एक अंगठी

  • ५०० ग्रॅम चांदीचा ऐवज

  • दीड लाख रुपये रोख रक्कम

दुसऱ्या बेडरूममधील ऐवज

  • तीन तोळ्यांचे सोन्याचे साईबाबांचे ब्रासलेट

  • प्रत्येकी अडीच तोळे वजनाच्या दोन बांगड्या

  • प्रत्येकी ५ तोळ्यांचे दोन ब्रासलेट

  • प्रत्येकी पाच तोळ्यांच्या दोन गळ्यातील चेन

  • साडेसात तोळ्यांचे गंठण

  • एक तोळ्याची अंगठी

  • एक तोळ्याची कर्णफुले

  • साडेचार तोळ्यांची सोनसाखळी

  • तीन तोळ्यांचे १० शिक्के

  • ९ लाख ६८ हजार रुपये रोख

  • १० हजारांचा एलईडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT