बीड: बीड जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांना मानणारा असल्याचे अनेक निवडणुकांत सिद्ध झाले आहे. पवार यांच्या एस. काँग्रेसचे त्या काळी जिल्ह्यातील सातही आमदार विजयी झाले होते.
पुढेही राष्ट्रवादी स्थापनेनंतर पवारांच्या विचारांना कायम जिल्ह्याने साथ दिली. आता अजित पवार सत्तेत गेल्यानंतर ‘पवारच आपले दैवत’ म्हणणाऱ्या बहुतांश नेत्यांचा मूड हा सत्तेच्या बाजूने असल्याचे दिसते.
अपवाद आमदार संदीप क्षीरसागर यांचा. त्यांनी आपली भूमिका शरद पवारांच्या बाजूने असल्याचे जाहीर केले.
बीड जिल्हा आणि शरद पवार हे समीकरण १९७५ पासूनचे आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी एस. काँग्रेसची स्थापना केली आणि जिल्ह्यात सातही (त्यावेळी बीड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ होते) आमदार एस. काँग्रेसचे विजयी झाले.
पुढेही पवारांनी ज्या - ज्या वेळी साद घातली तेव्हा जिल्ह्याने त्यांना प्रतिसाद दिला. अगदी त्यांच्या म्हणण्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा दिवंगत गोविंदराव डक यांच्याकडून पराभवही झाला.
पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही जिल्ह्याने पवारांच्या विचारांना पाठिंबा दिला. त्या काळी जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराणी राष्ट्रवादीत आली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कायम ताकदीचा पक्ष राहिला.
परंतु, या काळात सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या समर्थकांची संख्याही वाढली. दोघांकडूनही बळ मिळत असल्याने अनेक राजकीय नेत्यांना ताकद मिळाली. काहींना मंडळे, काहींना परिषदाही मिळाल्या.
मात्र, बहुतेकांच्या घोषणा मात्र ‘पवार आपले दैवत’ असेच होत्या. मात्र, आता मोठ्या पवारांना दैवत म्हणणाऱ्या मंडळींकडून सत्तेतल्या अजित पवारांच्या पारड्यात वजन अधिक असल्याचे दिसते.
आपले दैवत शरद पवार म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांनी पहिल्याच टप्प्यात अजित पवारांसोबत मंत्रिपद मिळविले आहे. उर्वरित राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी संदीप क्षीरसागर यांनी मात्र आपण शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांनी लवकरच भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे. विशेष म्हणजे या घडामोडींच्या दिवशीच (रविवारी) प्रकाश सोळंके यांच्या गळ्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा मोठ्या पवारांच्या मध्यस्थीनेच पडल्याची सूत्रांची माहिती आहे. विविध कारणांनी ते देखील सत्तेसोबतच जाऊ शकतील, असा अंदाज आहे.
दराडे, काळे, शेख शरद पवारांच्या बाजूने
माजी आमदार उषा दराडे यांनी मोठ्या पवारांना साथ जाहीर केली असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे देखील मोठ्या पवारांच्याच बाजूने उभारले आहेत.
अशा काही शक्यता
आमदार बाळासाहेब आजबे यांनीही अद्याप आपली निष्ठा कोणाकडे हे स्पष्ट केलेले नाही. माजी आमदार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित देखील अजित पवारांसोबतच जाऊ शकतात, असा अंदाज आहे.
त्यांच्या जयभवानी कारखान्याला केंद्र सरकारची मदत मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे त्यांचाही कल सत्तेसोबतच असू शकतो. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाणांना देखील शरद पवारांऐवजी अजित पवारांचा मार्ग निवडावा लागण्याची शक्यता आहे.
कारण, त्यांच्याकडे अंबाजोगाई बाजार समितीचे सभापतिपद असून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळाले आहे.
इतर बहुतांश नेत्यांचा कलही सत्तेतल्या पवारांकडेच आहे. एकूणच आजपर्यंत शरद पवार दैवत होते पण आता ‘सत्ताकारण’ महत्त्वाचे असल्याने निष्ठा अजित पवारांच्या बाजूने अधिक असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.