shri laxmi devi yatra culture of reverse tilt to complete vow Sakal
छत्रपती संभाजीनगर

Shri Laxmi Devi Yatra : प्रथा उलटे झोके घेऊन नवसपूर्तीची!

Vow Completion :चिंचेच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर डोके खाली व पाय वर अशा प्रकारे झोके घेऊन नवसपूर्ती केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

औराळा (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) : गावात दरवर्षी एप्रिल महिन्यात श्री लक्ष्मी देवीची यात्रा भरते. सर्व जातीधर्मातील लोक मातेच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात. मानाच्या झेंड्याच्या मिरवणुकीनंतर सुरू होते नवसपूर्ती. या यात्रेत बारा गाड्या ओढून आणि झाडाला उलटे झोके घेऊन नवसपूर्तीची परंपरा आहे.

चिंचेच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर डोके खाली व पाय वर अशा प्रकारे झोके घेऊन नवसपूर्ती केली जाते. काही जण बोकडाचा बळी देऊन नवसपूर्ती करतात. अनेक वर्षांपासूनची ही प्रथा आहे.

- वाल्मीक पवार, चापानेर, ता. कन्नड

कन्नड तालुक्यातील औराळा गावच्या श्री लक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरवात होते. यात्रा रामनवमीपर्यंत चालते. श्री लक्ष्मीदेवी औराळा गावासह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे.

या वार्षिक यात्रोत्सवाला अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्याने महाराष्ट्राभरातून लाखो भक्त श्रीक्षेत्र औराळा भूमीत लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी दरवर्षी हजेरी लावतात. भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी श्री लक्ष्मीदेवी संस्थानचे अध्यक्ष डॉ. आनंदराव महाले, दिलीप वाघ, बाबूलाल वाघ, सीताराम वारे, चंद्रकांत देशमुख, रमेशकुमार खंडेलवाल या विश्वस्तांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ पुढाकार घेतात.

झेंड्याचे असे महत्त्व...

गावातील ज्येष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार या देवस्थानबाबतची आख्यायिका अशी ः औराळा येथील परीट समाजाचे तान्हाजी वाघ यांच्या चंद्रभागाबाई नावाच्या मुलीचा विवाह धुळ्यातील लकडू जगदाळे यांच्याशी झाला होता. मात्र, लग्नाला वीस वर्षे झाली तरी त्यांना आपत्यसुख लाभले नव्हते.

चंद्रभागाबाई दिवाळसणासाठी पतीसह माहेरी आल्या. मंगळवारच्या दिवशी तान्हाजी वाघ यांनी देवीला नवस केला. ‘माझ्या मुलीला मूळबाळ झाले तर दरवर्षी तुझ्या यात्रोत्सवात तुझ्या नावाच्या झेंड्याची भव्य मिरवणूक काढीन, असा तो नवस होता.

देवी नवसाला पावली. तेव्हापासून आजपर्यंत वाघ मंडळींकडून झेंड्याच्या मिरवणुकीची परंपरा सुरू झाली. दरवर्षी न चुकता वाघ-जगदाळे कुटुंबीयांकडून देवीच्या झेंड्याची मिरवणूक काढली जाते, असे गावातील ग्रामस्थ सतीश जीवरग यांनी सांगितले.

बारा गाड्यांची आख्यायिका

यात्रेचा दुसरा मान औराळीच्या निकम पाटलांच्या बारा गाड्यांचा. त्याकाळी गावातील मोठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती म्हणजे दशरथ पाटील निकम. त्यांच्याकडे सर्व काही होते, परंतु लग्नाला बरीच वर्षे झाली तरी घरात पाळणा हलत नसल्याने ते नेहमीच निराश असत. त्यांनी यात्रेच्या दिवशी देवीला नवस केला. ‘मला मुलगी किंवा मुलगा होऊ दे.

मुलगी झाली तर लक्ष्मी, मुलगा झाला तर लक्ष्मीकांत नाव ठेवीन, दरवर्षी स्वखर्चाने तुझ्या यात्रेला बारा गाड्या घेऊन येईन, असा तो नवस होता. नवसपूर्ती झाली. मुलगी झाली. नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. दशरथ निकम पाटील यांच्या पश्चात आजही त्यांचे वंशज दरवर्षी औराळी येथून बारा गाड्या आगदी थाटामाटात नेतात.

रंगतो कुस्तीचा आखडा

यात्राकाळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मोकळी शेते यात्रेकरूंनी गजबजून जातात. विविध दुकाने थाटतात. ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात कररूपी उत्पन्न मिळते. यात्राकाळात कुस्तीचा आखाडा भरतो. सुरवातीला लहान पहिलवानांनी कुस्ती जिंकली तर बक्षीस म्हणून रेवड्या, नारळ दिले जातात. त्यानंतर दहा रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत बक्षिसे दिली जातात.

उलट्या झोक्याचा नवस

चार झेंड्यांच्या काठ्या मंदिरात आल्यानंतर उलटे झोके घेऊन नवसपूर्तीला सुरवात होते. यात अनेक जण सहभागी होतात. देवस्थानच्यावतीने परिसरातील चिंचेच्या मोठ्या झाडाला झोका बांधलेला असतो. जमिनीपासून ४-५ फूट उंचीवर तो असतो. यावर नवस बोलणाऱ्या महिला डोके खाली करून उलटे झोके घेतात.

कमीत कमी पाच झोके घेऊन बोललेला नवस पूर्ण करतात. बारा गाड्या ओढण्याचाही नवस अनेकांनी केलेला असतो. सर्वांत पुढे नवसाची गाडी आणि त्यामागे ११ गाड्या असतात. नवस बोललेली व्यक्ती गाड्याचे चऱ्हाट कमरेला बांधते. त्याच्यावर सावलीसाठी वस्त्र धरले जाते. उपस्थित भाविक ‘बोल लक्ष्मी माता की जय’ असा जयघोष करतात आणि काही पावले बारागाड्या ओढून व्यक्ती नवस फेडते.

मानाच्या झेंड्याची मिरवणूक

श्रीलक्ष्मी देवी यात्रेला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरवात होते. रामनवमीपर्यंत दररोज पहाटे चारला भाविक मंदिरात दाखल होतात व देवीला दंडवत घालतात, नंतर दर्शन घेतात. रामनवमीनंतर प्रथांना सुरवात होते. मानाच्या व नवसाच्या झेंड्यांची मिरवणूक काढण्यात येते. ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक प्रथम मंदिराजवळ येते.

गावच्या वरच्या बाजूला देवीचे ठाणं आहे, तर गावच्या खालच्या बाजूला मंदिर आहे. मानाच्या झेंड्यांची मिरवणूक देवीच्या ठाण्यापासून सकाळी नऊला निघते. वाजतगाजत दुपारी बारापर्यंत ती मंदिरात येते. मंदिरात मिरवणूक आल्यानंतर बारा गाड्या ओढणे, बोकडांचे बळी, उलटे झोके घेणे आदी प्रथांना सुरवात होते.

औराळा येथील यात्रेला ५००-६०० वर्षांचा इतिहास असावा, असे सांगितले जाते. कोकणातून आलेली माता लक्ष्मी इथला निसर्गरम्य परिसर पाहून इथल्या चिंचेच्या वनात स्थिरावली. तिचे माहात्म्य हळूहळू लोकांना कळू लागले. मनोकामना पूर्णत्वाची प्रचिती येऊ लागली, आजही येते. त्यामुळे भाविकांची संख्या वाढती आहे. यात्राकाळात लाखो भाविक येतात. देवस्थानाला शासनाकडून तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला आहे.

- सतीश पोपटराव जिवरख, पुजारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT