औरंगाबाद - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही बरेच दिवस रुग्णसंख्या शून्यावर होती. आता मात्र रुग्ण आढळत आहेत. सोमवारी (ता.६) जिल्ह्यात सहा रुग्ण आढळले. यातील पाच रुग्ण शहर परिसरात तर एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे. जिल्ह्यात सध्या १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका आहे, मास्कचा वापर करण्याच्या सूचना केल्या होत्या. तब्बल दोन ते तीन महिन्यानंतर रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात रविवारी (ता.५) तीन रुग्ण आढळले होते. शहरात संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने चाचणीसाठी तपासणी केंद्र वाढवली आहेत. नागरिकांनी बूस्टर डोस घेऊन कोरोनाची तीव्रता टाळावी असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. शहरात यापूर्वी सहा केंद्रे सुरू होती. आता दहा तपासणी केंद्रे असतील, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे रुग्ण मार्च अखेरपर्यंत आढळले. त्यानंतर कोरोना झपाट्याने नियंत्रणात आला. मास्क वापरही बंद झाला. एप्रिलमध्ये रुग्णांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. कोरोना संपला अशा आविर्भात असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचा पुन्हा शिरकाव झाला आहे. शहरात काल दोन, ग्रामीण भागात एक रुग्ण आढळला. त्यात हर्सूल जेलमधील एक कैदी असून दुसरा रुग्ण समर्थनगरातील आहे.
आरोग्य विभागातील कर्मचारी पॉझिटिव्ह
लातूर जिल्ह्यात दोन महिन्यांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. काल चार जणांना कोरोनाची लागण झाली. यातील तिघे रुपनगरतांडा (ता. रेणापूर) व एक जण औसा तालुक्यातील आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या सहावर गेली आहे. दीर्घ कालावधीनंतर हिंगोली जिल्ह्यात रुग्ण आढळला असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी काल पॉझिटिव्ह आला. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले गेले असून आज ४० आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी झाली. दरम्यान राज्यात आज १०३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.