छत्रपती संभाजीनगर (घाटी परिसर) : आधीच दृष्टिदोषाने बेजार असलेली ७५ वर्षीय ज्येष्ठ महिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात आली. महिलेच्या याच दोषाचा फायदा घेत, घाटीत परिसरात उभ्या असलेल्या एका महिलेने सोनाराकडे नेत या वृद्धेचे सुमारे ४० हजारांचे दागिने काढून लांबविले. पुन्हा या वृद्धेला घाटीत आणून सोडले. आधीच दृष्टी दोषाने बेजार असलेल्या या वृद्ध महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळाले.
एक तर वाढत्या वयाने जाणवणारा थकवा, त्यात दृष्टी दोष, फसवणूक कशी झाली हे सांगता येईना, अशा परिस्थितीत या वृद्धेला तब्बल चार तास पोलिस ठाणे आणि शहरात पायपीट करावी लागली. ही घटना गुरुवारी (ता. २१) घाटी रुग्णालयात उघडकीस आली. शहरातील सातारा परिसरातील अनुसया मुरलीधर नन्नवरे (वय ७५) यांचे डोळ्यांचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतरही त्यांना स्पष्ट दिसत नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा गुरुवारी (ता. २१) बोलवण्यात आले. अनुसया यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सीटीस्कॅन करण्यास सांगितले होते. पुढे घाटी परिसरात त्यांना एक महिला भेटली.
त्यांच्याकडील सीटीस्कॅन करण्याचा फॉर्म हाती घेऊन त्यासाठी दागिने काढावे लागतील, असे सांगत ती महिला अनुसया यांना रिक्षाने सोनाराकडे घेऊन गेली. सराफा परिसरातील एका सोनाराकडे अनुसया यांचे दागिने काढण्यात आले. नंतर रिक्षाने दोघी पुन्हा घाटीत आल्या. येथे अनुसया यांनी रिक्षा चालकाचे पैसे दिले. परंतु, दागिने परत न देताच ही महिला पसार झाली. असे अनुसया यांचे म्हणणे आहे. यानंतर काय करावे हे या वृद्ध महिलेला सुचत नव्हते. त्यात घाटीतील अभ्यागत समितीचे सदस्य प्रवीण शिंदे, इक्बालसिंग गील यांची भेट झाली
. यानंतर शिंदे यांनी पावणे दोनच्या सुमारास ११२ क्रमांकावर कॉल करून ही माहिती दिली. दहा मिनिटांत पोलिस व्हॅन घाटीत आली. त्यांनी अनुसया यांना प्रकाराबाबत विचारले. परंतु, त्यांना स्पष्ट सांगता येत नव्हते.
शेवटी येथून ते अनुसया यांना घेऊन बेगमपुरा पोलिसांकडे गेले. बेगमपुरा पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी त्यांच्या दुचाकीवर तर अभ्यागत समिती सदस्य प्रवीण शिंदे, ठाकरे गट युवा सेना उपशहर प्रमुख अक्षय दांडगे आणि अनुसया हे रिक्षाने परिसरात फिरले. प्रकरणी रात्री उशिरापर्यंत बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सोनाराने आजीला ओळखले
अभ्यागत समिती सदस्य शिंदे, दांडगे आणि अनुसया यांच्यासह दुचाकीवर असलेले बेगमपुरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी चार चकरा मारल्या. परंतु, अनुसया यांना काही लक्षात येत नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून गांधी पुतळ्यापाशी रिक्षा सोडून पायी चालण्याचा निर्णय घेतला. त्यात आजींनी सराफा बाजारातील सोनाराचे दुकान ओळखले. सोनारानेदेखील आजींना ओळखले. यानंतर सोनाराने दुकानात घडलेला प्रकार सांगितला. दागिने सोबतच्या महिलेला पिशवीत दिल्याचे त्यांनी सांगितले. दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले. पुढे पुन्हा पोलिस ठाण्यात जात तेथून शिंदे यांनी अनुसया यांना जेऊ घालून पुन्हा घाटीत सोडत उपचार करण्याची जबाबदारी स्वीकारली.
सोनारही झाला भावूक
त्या महिलेसोबत सोने काढण्यासाठी सोनाराकडे गेलेल्या आजीचे वय आणि उपचारासाठी झालेली त्यांची पायपीट पाहून, सोनारदेखील भावुक झाला. मला दागिने काढण्याचे पैसे नको म्हणाला. आजी म्हणाल्या दहा रुपये तरी ठेवा परंतु सोनाराने पैसे घेतले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.