छत्रपती संभाजीनगर : गेली काही महिन्यांपासून फळभाज्या, पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. आता तर टोमॅटोने शंभरी गाठली आहे. एक लिटर पेट्रोल आणि एक किलो टोमॅटोचे दर जवळपास सारखेच झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. ग्राहक आता किलो, अर्धा किलोऐवजी पाव किलो टोमॅटोवर गरज भागवित आहेत.
बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १४) ६५ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. दोन ते तीन दिवसांपासून टोमॅटो ६० ते ८० रुपये किलो दराने विकले जात होते. सोमवारी चक्क शंभर रुपये किलो दराने विकले गेले. त्यामुळे ग्राहक दर विचारून पुढे निघून जात असल्याचे चित्र भाजी मार्केटमध्ये होते.
बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून पालेभाज्या खराब येत होत्या. तरीही दरांमध्ये कोणताही फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीत सोमवारी आलेला माल क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे ः बटाटा- ३७०, भेंडी- ३६, दुधी भोपळा-८, चवळी शेंगा- ११, फ्लॉवर- ३२, गाजर- ३३, गवार- १०, काकडी-४०, कांदा- ५३०, कारली- १३, कोबी-२९, ढोबळी मिरची- १६, दोडका (शिराळी)- ९, वाल भाजी- १२, वांगी- १४, भुईमूग शेंगा (ओली)- २४, हिरवी मिरची- ३७, मका कणीस- २२ एवढा माल आला होता. तर, कोथिंबिरीच्या ११ हजार ४०० गड्ड्या, मेथी भाजी - ६ हजार १०० नग, पालक- ५ हजार ४०० नग एवढा माल आला होता. फळे- (क्विंटलमध्ये) डाळिंब - ११, द्राक्ष- ५, मोसंबी ३१, पपई ८, पेरू ४२, संत्री २२ , सीताफळ ६८, आवळा- ७, अद्रक - ७, अशी आवक झाली होती.
टोमॅटोची आवक कमी झाली असून दरामध्ये वाढ झालेली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दरांवर परिणाम झाला आहे.
— सुरेश नरवडे, विक्रेता.
पेट्रोलच्या दरात टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत. भाव ऐकूनच किलोऐवजी पाव किलो खरेदी करत आहोत. सगळ्याच वस्तूंचे दर वाढले असून जगणे कठीण झाले आहे.
—अण्णासाहेब शेजूळ, ग्राहक.
भाज्या करताना टोमॅटोची गरजच भासतेच. आता शंभर रुपये किलोने टोमॅटो खरेदी करणे परवडणारे नाही. आता खाण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागतो.
— सपना वायकोस, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.