पाचोड (जि.औरंगाबाद) : फेसबुकवरून मैत्री झालेल्या महिलेचे समोरील व्यक्तिशी अनैतिक संबंध प्रस्थापित होऊन अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केला. खूनाचे पुरावा नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला आहे. बहात्तर तासांत तिघा जणांच्या मुसक्या आवळून त्यांना गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी गजाआड केल्याची घटना शनिवारी (ता.२१) घडली. अधिक माहीती अशी, बुधवारी (ता.१८) थेरगाव-हर्षी (ता.पैठण) शिवारात शेत गट नं. १०६ मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात हत्याराने व जाळून जिवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह पुरुन टाकला. एवढेच नव्हे तर मृतदेहाची ओळख पटु नये म्हणुन त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह अर्धवट जाळले होते. (Wife Killed Her Husband With Help Of Lover In Aurangabad)
या संबंधी पाचोड (Pachod) येथे अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यांत आला होता. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलीसांनी सदर घटनास्थळी धाव घेऊन बारकाईने पाहणी केली असता मृतदेहा शेजारी पोलिसांना मृताची ओळख पटविण्याचे अनुषंगाने त्याचे शरीरावर ओळख चिन्ह दिसून आले नाही. उलट शरीर अर्धनग्न व अर्धवट जळालेले असल्याने चेहरा ओळखणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मृत नेमका कोण? हे एक कोडे ठरले होते. पोलिसांनी घटनास्थळाचे अत्यंत सुक्ष्म व बारकाईने पाहणी केली असता तिथे एक साडी सेंटरच्या नावाची कॅरीबॅग व मिनरल वॉटरची बॉटल पडलेली आढळले. याच पुराव्यांचा आधार घेत औरंगाबादचे (Aurangabad) जिल्हा पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया (IPS Manish Kalwania) यांनी पोलीसांची वेगवेगळी चार तपास पथके स्थापन करून त्यांना तपासाबाबत मार्गदर्शन व सुचना करून मृताची ओळख पटविण्याचा शोध सुरू केला.
मृताचे शेजारी मिळालेल्या साडीच्या कॅरीबॅग व पाण्याची बॉटल यावर शेवगाव (जि.अहमदनगर) असा पत्ता लिहिलेला असल्याने मृत हा शेवगाव (जि.नगर) भागातील असण्याची शंका वर्तवून पोलीसांनी शेवगावचा संपुर्ण परिसर पिंजून काढला. या दरम्यान गोपणीय बातमीदार पेरून त्यांना मृताचा फोटो शेअर करून व शोधपत्रिका आधारे स्थानिक नागरिक व परिसरात चौकशी करित असतांना बातमीदाराद्वारे खात्रीलायक बातमी मिळाली कि, मृत हा जाधव वस्ती, दत्तमंदिर जवळ, वरूर रोड शेवगाव (ता. शेवगाव) येथील रहिवाशी असुन त्याचे नाव देविदास रामभाऊ जाधव असे आहे. त्यावरून पोलीस मृताचे घरी वरुर रोड, शेवगाव येथे गेले असतां त्याचे राहते घराला कुलूप लावले होते. त्याचे नातेवाईकांचा शोध घेत असताना मृताची पहिली पत्नी ही मृतापासुन विभक्त राहत असुन ती जुन्नर (जि. पुणे) राहते तर त्याची दुसरी पत्नी नामे सुरेखा देवीदास जाधव ही मागील तीन-चार दिवसांपासुन गावात नसल्याची माहिती मिळाली. यामुळे मृताच्या पहिल्या पत्नीशी संपर्क साधून तिचे आधारे मृताची खात्रीशीर ओळख पटविण्यात पोलीसांना यश आले. मृताची दुसरी पत्नी नामे सुरेखा जाधव हिचे बाबत अधिक संशय बळवल्याने तिची अधिक माहिती घेतली असता ती नागपूर येथे असल्याची माहिती मिळताच एका पथकाने नागपुर येथे जाऊन तिचा शोध घेतला असता तिच्या सोबत आशिष विजय राऊत (वय २६, रा. सावळी (सदोबा), ता.आर्णी, जि.यवतमाळ) होता. दोघांना ताब्यात व विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, त्यांची दोघांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमांतून दोन वर्षापूर्वी झाली. पती हा वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे ती वारंवार आशिष राऊत यास सांगत होती. यातून त्यांचे दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले व तिचा पती देवीदास रामभाऊ जाधव हा या प्रेमसंबधामध्ये अडसर ठरत असल्याने त्याचा आम्ही व आशिष यांचा मित्र संगीत शामराव देवकते (रा. सावळी, ता.आर्णी जि. यवतमाळ) असे तिघांनी मिळुन वरूर रोड शेवगाव येथील राहते घरात लोखंडी रॉडच्या साहाय्याने खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह थेरगाव -हर्षी शिवारात पैठण-पाचोड रस्त्यालगत अर्धवट जाळून टाकल्याची कबुली दिली. मृतदेह वाहून नेण्यासाठी त्यांनी संगीत देवकते याच्या कारचा (एमएच-१२ जीएफ-१५२७) वापर केला असल्याचे सांगितले. त्यावरून त्यांना तिसरा साथीदार संगीत शामराव देवकते हा सध्या त्याचे मूळगावी सावळी येथे आहे, अशी कबुली दिली. यावरुन त्याचा शोध घेऊन त्यास त्याच्या गावातुन ताब्यात घेतले. पोलिसांनी मृताची पत्नी सुरेखा देविदास जाधव (वय २५, रा. जाधव वस्ती, वरुर रोड, शेवगाव, जि. अहमदनगर), आशिष विजय राऊत, संगित शामराव देवकते यांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून एक लाख ५१ हजार रोख रक्कम व २० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण १,७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे हे करित आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप टूबे, जमादार श्रीमंत भालेराव, बालू पाथ्रीकर, वाल्मीक निकम, रजनी सोनवणे, आनंद घाटेश्वर, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जिवन घोलप आदींनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.