मराठवाडा

मांजराच्या उपविभागासाठी अंबाजोगाईच योग्य

दत्ता देशमुख / प्रशांत बर्दापूरकर

बीड/अंबाजोगाई - नदीचा उगम आणि पाणी जिल्ह्यातले, धरणासाठी बुडालेल्या गावांपैकी जास्त गावे जिल्ह्यातली आणि उस्मानाबादची. पण, लोकनेते शंकरराव चव्हाण यांची जिल्ह्याला देण असलेल्या मांजरा धरणाच्या पाण्याचा लाभ लातूरकरांनाच झाला. मात्र, आता अंबाजोगाईत याचे उपविभागीय कार्यालय येत असल्याने धरणाचा एकेक हक्क मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे. 

अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालय येणे प्रशासकीय सोयीबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मात्र, लातूरला मुक्कामाचा छंद जडलेल्या अधिकाऱ्यांना अंबाजोगाई गैरसोयीचे वाटू लागल्याने अंबाजोगाईत येणाऱ्या कार्यालयाला ही लॉबीही खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. 

सौताडाजवळून (ता. पाटोदा) उगम पावणाऱ्या मांजरा नदीचे जिल्ह्यात साधारण शंभर किलोमीटर अंतराचे पात्र आहे. याचे पाणी वाहून जात होते आणि अंबाजोगाई व केज तालुक्‍यात तत्कालीन परिस्थितीत कुठलेही सिंचनाचे साधन नव्हते. त्यामुळे शंकरराव चव्हाण यांनी या नदीवर धनेगाव (ता. केज) येथे १९७१ मध्ये धरणाला मंजुरी दिली. १९७४-७५ मध्ये सुरू झालेले काम १९८१ मध्ये संपले. शंकरराव चव्हाण यांची सिंचनाची तळमळ आणि त्यांनी टाकलेल्या शब्दामुळे तसेच तत्कालीन स्थानिक नेत्यांच्या आग्रहाने धरणासाठी १२ गावांना विस्थापित व्हावे लागले. विस्थापितांमध्ये अर्धेअधिक बीड आणि काही उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. ४६.८९३ दशलक्ष चौरस मीटर पाणी साठवण क्षेत्र आणि ४५.९० चौरस किलीोमटर बुडित क्षेत्र असलेल्या या धरणासाठी सर्वाधिक जमीन बीड जिल्ह्याची आणि काही उस्मानाबाद जिल्ह्यातील गेली. पण, या धरणाच्या कालव्यांतून निघणाऱ्या पाण्यावरचे लोणी आतापर्यंत लातूरकरांनी खाल्ले.

या धरणाच्या दोन्ही कालव्यांवरुन लातूर जिल्ह्यातील १८ हजार २२३ हेक्‍टर सिंचन होत आहे. तर, सर्वाधिक जमीन गेलेल्या बीड जिल्ह्याला केवळ चार हजार ७१९ हेक्‍टर सिंचनावर समाधान मानावे लागले. धरणात खारीचा वाटा असलेल्या उस्मानाबादकरांच्या सिंचनाची बोळवण केवळ ६२७ हेक्‍टरांवर आहे. सिंचनाबरोबरच लातूर शहरासह लातूरच्या औद्योगिक वसाहतीच्या पाण्याची भिस्तही याच धरणावर आहे. एकूणच लातूरचे राजकीय बळ तत्कालीन काळात वाढल्याने बीडकरांच्या तोंडचे पाणी लातूरला पळाले. दोन्ही कालव्यांचा अधिक फायदा आणि कार्यालयेही लातूरला गेली. आता यातील उपविभागीय कार्यालय लातूरहून अंबाजोगाईत येत असताना त्यालाही खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी उपविभाग अंबाजोगाईतच हवा
अंबाजोगाई ते धरणाचे मुख्यालयाचे अंतर ३० किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात धरणाची आणि नद्यांची पाहणी करणे अंबाजोगाईतून सोयीचे आहे. 

पूर-महापुराच्या आपत्कालीन स्थितीत अधिकारी जवळ असतील तर दरवाजे उघडणे, धरणाच्या सुरक्षेची पाहणी करण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई सोयीचे आहे; तसेच हे शहर मध्यवर्तीही आहे. सरता पावसाळा आणि मागच्या वर्षी आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्याची उदाहरणे आहेत. प्रशासकीय दृष्टीने निर्णय घेण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी लातूरपेक्षा अंबाजोगाईहून जवळ आणि सोयीचे असल्याचे मत निवृत्त उपअभियंता बी. एस. पन्हाळे यांनी व्यक्त केले. 

...मग यावे लागले लातूरहून
चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षी मोठा पाऊस झाला. अचानक धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडले. मात्र, वांगदरी येथील नदीवरील दरवाजे उघडत नसल्याने अंबाजोगाई तालुक्‍यातील गावांच्या शेतांमध्ये पाणी शिरले. यासाठी लातूरहून यंत्रणा पोचण्यास उशीर झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. लातूरऐवजी अंबाजोगाईत कार्यालय असते तर हा प्रकार टळला असता. 

अधिकाऱ्यांना गैरसोयीची भीती
दरम्यान, त्या काळात केज, अंबाजोगाई भागात राजकीय नेतृत्व सक्षम नव्हते तर राज्याच्या राजकारणात लातूरचा दबदबा वाढत होता. यामुळेच कालव्यांतून होणारे लातूरचे सिंचन वाढले आणि कार्यालयेही लातूरला हलली. आता सोयीमुळे १५ जानेवारीपासून मांजराचे उपविभागीय कार्यालय अंबाजोगाईला येत असताना त्याला खोडा घालण्याचे प्रयत्न राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरुन सुरू आहेत. यामध्ये राजकीय नेत्यांचा ‘इगो’ आहे. तर या कार्यालयातील अधिकाऱ्यांना लातूरला राहणे प्रतिष्ठेचे आणि सोयीचे वाटते. अंबाजोगाईत कार्यालय आल्यानंतर गैरसोय होईल, या भीतीने ही मंडळीही खोडा घालण्यात पुढे सरसावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT