बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात मुख्यमंत्री म्हणून प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला येणाऱ्या येणार म्हणून या दौऱ्याची महसूल व पोलिस प्रशासन आठ दिवसांपासून तयारी करत होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा रविवारी होणारा दौरा रद्द झाला. या निमित्ताने शिवसेनेतील दुफळी मात्र चव्हाट्यावर आली आहे.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा तसा हा पहिलाच सार्वजनिक दौरा होता. सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीडला व्हावा, हे शिवसेनेचे प्रयत्नही फोल ठरले. मात्र, परिसरातील श्री क्षेत्र कपिलधारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येण्याबाबत जवळपास निश्चित झाले होते. श्री क्षेत्र कपिलधार हे देशभरातील वीरशैव समाज बांधवांचे आद्यगुरू असलेले संत मन्मथस्वामी यांचे समाधीमंदीर असलेले तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेनिमित्त तीन दिवस यात्रा भरते. यात पौर्णिमेला मन्मथस्वामी महाराज यांच्या समाधीची पूजा तसेच धर्मसभा होते. त्याला वीरशैवांचे विविध भागांतील शिवाचार्यांची उपस्थिती असते. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले होते. महसूल व पोलिस प्रशासन मागच्या आठ दिवसांपासून या तयारीत होते.
महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या मतदार संघात संघटनात्मक पातळीवर कमकुवत असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी शहरात बॅनरबाजी जोरात केली. परंतु, बॅनर लावण्यापासून आणि तयारीपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुख व माजी मंत्री यांच्या गटांतील गटबाजी प्रकर्षाने दिसून आली. मुख्यमंत्री येण्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवाचार्यांची पत्रकार परिषद शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पुढाकाराने झाली.
दुपारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री येणारच आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. तर, सायंकाळी शिवा संघटनेचे प्रमुख मनोहर धोंडे यांची पत्रकार परिषद माजी मंत्री सुरेश नवले व शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या पुढाकाराने झाली. यात मनोहर धोंडे यांनी मुख्यमंत्री येणार नाहीत, हे तीन दिवसांपूर्वीच निश्चित झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. म्हणजे मुख्यमंत्री येणारच व येणार नाहीत हे देखील वेगवेगळ्या गटांच्या पत्रकार परिषदेतून समोर आले. शिवसेनेतील गटबाजी या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.