अंबाजोगाईत : शहरात नेहमी होणारी वाहतुकीची कोंडी, अनाधिकृत व बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक ठप्प होते. या ट्रॅफिकच्या समस्येवर उपाययोजना करून मार्ग कधी निघेल, याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मागील २० वर्षांत ट्रॅफिकचा प्रश्न मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर निर्माण होत आहे. अगोदरच अरुंद रस्ते, त्यात पुन्हा रस्त्यांच्या दोन्ही दुतर्फा होणारी दुचाकी व चारचाकी वाहनांची अनाधिकृत पार्किंग, यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते.
पर्यायी पादचाऱ्यांना रस्त्याने चालणेही कठीण होते. यावर उपाययोजना म्हणून एकतर रस्ता रुंद करणे, वाहनाची पार्किंग एकदिवसाआड एकतर्फी करणे, वाहतूक वणवे करणे अशा उपाययोजना करता येणे शक्य आहे. मात्र नगर पालिका व पोलिस प्रशासनाकडून यावर काहीच उपाययोजना होत नाहीत.
खासगी प्रवासी वाहतूक
बसस्थानकाच्या समोरील तहसील रोड, मागच्या बाजूचा रस्ता व पंचायत समिती रस्त्यावर, मोंढा भागात प्रवासी वाहने व मालवाहतूक वाहनांची पार्किंग असते. या पार्किंगची सोय करणे आवश्यक आहे.
शहरातील वाढती ट्रॅफिक, बेशिस्त वाहनांची पार्किंग व वाढता विस्तार लक्षात घेता, स्वतंत्र ट्रॅफिक ब्रँच असणे आवश्यक आहे. शहरात जिल्हा स्तरावरचे सर्व कार्यालये आहेत. त्यात अपर जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर व ग्रामीण पोलिस ठाणे यासह इतर कार्यालये आहेत. तर, ट्रॅफिक ब्रँच का नाही, असाही प्रश्न आहे. गुरुवारी (ता.२) विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण एका बैठकीनिमित्त येथे आले असता उपस्थित राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील ट्रॅफिकचा प्रश्न मांडला होता.
पोलिस चौकी होणार
शहरातील रविवारपेठ भागातील जुनी पोलिस चौकी सुरू करण्याची मागणीही श्री. चव्हाण यांच्याकडे केली. येत्या दिवाळीपर्यंत ही पोलिस चौकी दुरुस्त करून सुरू करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी पोलिस निरिक्षक श्री. घोळवे यांना केल्या.
या रस्त्यावर वाहतूक ठप्प
शहरातील गुरूवारपेठ ते योगेश्वरी मंदिरमार्गे मंडीबाजार, सावरकर चौक ते मीनाताई ठाकरे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवा मोंढा ते राजीव गांधी चौक या रस्त्यावर नेहमी वाहतूक ठप्प होते. बसस्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक वगळता इतर ठिकाणी वाहतूक पोलिस नसतात.
रस्त्याच्या दुतर्फा फळगाडे
शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा फळगाडे लागलेले असतात. याचाही अडथळा वाहतुकीला येतो.
रस्त्यावरच पार्किंग
शहरातील विविध कॉलनी, गल्ली, नगरात खासगी चारचाकी वाहनांची पार्किंगही रस्त्यावरच असते. वाहन घरात जाण्यासाठी अनेकांनी आपल्या दारात रँप केलेले आहेत. पण, वाहन बाहेरच पार्क केलेले असते. अनेक खासगी रूग्णालयाची वाहने बाहेर रस्त्यावरच पार्क केलेले असतात. प्रत्येकाने आपापल्या वाहनांसाठी पार्किंगची सोय स्वत: करायची, असा नियम बांधकाम परवाना घेतानाच असतो, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची गरज आहे. ठिक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बेशिस्त वाहतुकीच्या पार्किंगमुळे ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याने चालणेही कठीण होते. त्यामुळेच संबंधित विभागाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाढत्या रहदारीमुळे बाहेर पडण्याची इच्छा असूनही जाता येत नाही.
— रामकृष्ण पवार, सेवानिवृत्त शिक्षक
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करणार आहोत. त्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही करणार आहोत. वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस कार्यरत असतील.
— अनिल चोरमले, पोलिस उपअधिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.