कळमनुरी (जि. हिंगोली) : अनेक वर्षांपासून स्थलांतरीत झालेल्या व लॉकडाउननंतर आपल्या मूळ गावी परतलेल्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाहीत. ते कुठल्याही कल्याणकारी योजनेचे लाभार्थी नसल्याने त्यांना स्वस्तधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी या नागरिकांनी स्वस्तधान्य दुकानदारांविरुद्ध तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वस्तधान्य वितरण प्रणाली चौकशीच्या फेऱ्यात अडकून विक्रेते अडचणीत सापडले आहेत.
कोरोना आजारामुळे निर्माण झालेली संकटकालीन परिस्थिती पाहता राज्य शासनाने गरीब घटक असलेल्या नागरिकांची उपासमार होणार नाही, बंदच्या काळात त्यांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध व्हावे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा याकरिता विविध कल्याणकारी योजनांमधून लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे.
मोफत तांदूळ वाटपाचे काम
याचा मोठा लाभ लाभार्थी नागरिकांना होत आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर केंद्र शासनानेही प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेमधून प्राधान्य अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेमधील लाभार्थींना प्रतिकिलो पाच किलो मोफत तांदूळ देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेमधील लाभार्थींना मोफत तांदूळ वाटपाचे कामही तालुक्यातील पुरवठा विभागाने हाती घेतले आहे.
कामगार, मजूर मूळ गावी परतले
मात्र, कामानिमित्त तालुक्यातील मजूर व कामगारांनी पुणे, मुंबई ,नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात स्थलांतर करणाऱ्या मजूर व कामगारांची नावे शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना ऑनलाइन झाल्यामुळे वगळल्या गेली आहेत. कोरोना आजारामुळे हे मजूर, कामगार आता आपल्या मूळ गावी परतले आहेत.
मोफत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी
या नागरिकांकडे कुठल्याही कल्याणकारी योजनेची शिधापत्रिका नसल्यामुळे त्यांना सवलतीच्या दरात व मोफत धान्य मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी या प्रकाराविरुद्ध प्रशासनाकडे तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. दुसऱ्या बाजूला काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही गरिबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावे याकरिता स्वस्तधान्य दुकानदाराकडे तगादा लावल्याचे चित्र आहे.
येथे क्लिक करा - व्हिडिओ: लघू, शेतीवर आधारित उद्योग सुरू व्हावेत: आनंद निलावार
यंत्रणा संशयाच्या फेऱ्यात
गावाकडे परत आलेले मजूर, कामगार कोणत्याही योजनेचे लाभार्थी नसल्याने संबंधित दुकानदार धान्य देण्यात धजावत नाहीत. त्यामुळे अशा दुकानदारांविरुद्ध तक्रार करण्याचा मार्ग निवडला गेला आहे. त्यामुळे स्वस्तधान्य वाटप करणारी यंत्रणा अडचणीच्या व संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. दरम्यान, कोणत्याही कल्याणकारी योजनेचे लाभार्थी नसलेले गरजू मात्र अडचणीत सापडले आहेत.
धान्य देण्याची तरतूद नाहीस्वस्तधान्य दुकानांमार्फत लाभार्थींना सवलतीच्या व मोफत योजनेमधील धान्य वाटप करण्यात येत आहे. स्वस्तधान्य विक्रेत्यांविरुद्ध कुठलीही तक्रार आल्यास त्याची शहानिशा केल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाहीत, त्यांना धान्य देण्याचे आदेश अथवा तरतूद नाही.
- कैलासचंद्र वाघमारे, तहसीदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.