बीड : २०१९ पासून शिवसेना सलग सत्तेत आहे. वर्षभरापूर्वी जरी सत्तांतर झाले असले तरी पूर्वीही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तर आताही शिवसेनेचेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र, शिवसेनेचे संघटन वाढण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोड्या, पक्षांतर्गत हेवेदावे आणि व्यक्तीगत व्यवसाय वृद्धीकडेच काही पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा प्रमुखांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन आणि यानंतर माजी जिल्हा प्रमुखांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचेच पदाधिकारी आताच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. जिल्ह्यात पूर्वीच्या युतीच्या सूत्रानुसार एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याचा असल्याने मुख्यमंत्र्यांकडून ‘सढळ’ हाताने वाढप्याची भूमिका निभावली जात आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही मुख्यमंत्र्यांचा शेरा असलेली ‘कोट्यवधींची उड्डाणे’ करणारी पत्रे दाखविली जात आहेत. मात्र, यातून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी किती मजबूत होतेय, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाची लक्तरेही वेशीला टांगली. कोणा कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचा बॅनरवर फोटो छापून त्यावर गंभीर आरोप करणारा मजकूर लिहीत त्या बॅनरवर चपला मारो आंदोलन केले. या आरोपांत काय, खरे व काय खोटे हा वेगळा विषय असला आणि कार्यकर्ते कोण व त्यांना पाठीशी कोणी घातले, हे लपून असले तरी यामुळे नको ती चर्चा झाली. मात्र, सदर प्रकार हा माजी जिल्हा प्रमुख ॲड. चंद्रकांत नवले यांनी घडवून आणल्याचा आरोप कुंडलिक खांडे समर्थकांनी करुन ॲड. नवले यांची पक्षातून हाकालपट्टीची मागणीही लाऊन धरली.
आरोप- प्रत्यारोप एकमेकांवर करण्याच्या या प्रकारामुळे पक्षाची अब्रू वेशीला टांगली गेली. दरम्यान, पूर्वीची शिवसेना आणि आता दोन शिवसेना झाल्या असल्या तरी नको त्या ‘धंद्यांत’ या पदाधिकाऱ्यांची नावे येतात. त्यामुळे पक्षाची लक्तरे वेशीला टांगली जात असली तरी पक्षाकडून मात्र अशा मंडळींची पाठराखण आणि त्यांच्या व्यवसायांना पाठबळच मिळत आहे. येवढे कमी की काय, लोखंडीच्या गाजलेल्या बाह्यस्त्रोत कर्मचारी भरतीतील अनियमितताही याच पक्षाचे काम असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.