सिडको : शहरातील अनेक वसाहतींत पाणी वेळेवर मिळत नाही, अपुरा पाणीपुरवठा होतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सणासुदीतही असेच चित्र असल्याने रविवारी (ता. १३) संतप्त नागरिकांनी सकाळी पाणी सोडणाऱ्या लाइनमनला पकडून ठेवले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
सिडको परिसरातील भवानी पेट्रोलपंप ते जिजाऊ चौक या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नेमलेल्या जीव्हीपीआर कंपनीकडून पाणीपुरवठ्याची नवीन लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. जुनी लाइन खराब झालेली असल्याने ती बंद करण्यात आली. दुसरीकडे अनेक भागांत अर्धवट लाइन टाकण्यात आली. परिणामी, नागरिकांना पाणी मिळत नाही. केवळ ५०० मीटर लाइन टाकण्यासाठी दोन महिने लागले.
अजूनही १०० ते १५० मीटरचे काम बाकी असल्याचे माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांनी सांगितले. यामुळे हे आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्याची सुटका झाली. या आंदोलनात प्रा. रामदास गायकवाड, हरिभाऊ भोसले, विजय जैस्वाल, विशाल मेने, राजेश कोल्हे, अनिल म्हैसेकर, मंगला रांजणीकर, रूपाली भंडारी, नंदा आहेर, पार्वती घाटे, रूपाली दांगट, मीरा सरोदे, शिल्पा शर्मा यांचा सहभाग होता.
...तर कंत्राटदार, अधिकाऱ्यांना कोंडू
पाणी सोडणाऱ्या लाइनमनला पकडून ठेवल्याच्या प्रकारानंतर महापालिका, कंत्राटदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुढील आठ दिवसांत काम मार्गी लागले नाही तर कंत्राटदार, कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडू, असा इशारा शिंदे यांनी दिला.
‘एमजेपी’कडून जलवाहिनीचे काम सुरू आहे. काही काम शिल्लक असल्याने काही घरांना पाणी कमी मिळते, अशी तक्रार आहे. तत्काळ हे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- के.एम. फालक, कार्यकारी अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.