नांदेडः श्रीगुरू गोविंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगची माजी विद्यार्थिनी वसुंधरा शिराढोणकरने युरोपीय उपग्रहाच्या उड्डाणात योगदान दिले आहे. उत्तर ब्राझिलमधील फ्रेंच गयाना स्पेस सेंटरमधून बुधवारी ओपीएस-सॅट या अनोख्या उपग्रहाला घेऊन सोयुझ रॉकेटने अवकाशात उड्डाण केले, तो क्षण अवकाश संशोधन क्षेत्रासाठी तर विशेष होताच; पण महाराष्ट्रासाठीही तो अभिमानास्पद ठरला. कारण, युरोपियन स्पेस एजन्सीच्या (यूएसए) या उपग्रहाचा विकास करणाऱ्या टीममध्ये वसुंधरा शिराढोणकर या महाराष्ट्रीयन मुलीचा समावेश होता.
फ्लाइट नियंत्रण टीममध्येही वसुंधराचा समावेश
वसुंधरा नांदेड येथील श्रीगुरू गोविंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगची माजी विद्यार्थिनी आहे. ईएसएच्या या उपग्रहाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयोगाची निवड करण्यात वसुंधराने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. हा उपग्रह अवकाशातील नवीन कार्यात्मक तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यासाठी विकसित करण्यात आला असून, हे अशा प्रकारचे जगातील पहिलेच मिशन आहे. हा उपग्रह ऑपरेट करणाऱ्या चार जणांच्या फ्लाइट नियंत्रण टीममध्येही वसुंधराचा समावेश आहे. वसुंधराचे शिक्षण औरंगाबाद आणि नांदेड शहरात झाले. त्यानंतर पुण्यातील हनीवेल या कंपनीत काही काळ काम केल्यानंतर ती पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला गेली. सध्या स्पेसफ्लाइट इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. तिचे आई-वडील सध्या पुण्यात राहतात, तर नांदेडमध्येही तिचे अनेक कुटुंबीय आहेत.
सर्वांना खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी
नांदेडमधील श्रीगुरू गोविंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगमधून वसुंधराने २००८ मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन शाखेत बी. टेक. ही पदवी संपादन केली. ‘एसजीजीएस’चे संचालक यशवंत जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वसुंधराने प्राप्त केलेल्या यशाबद्दल आनंद व अभिमान व्यक्त केला. ‘आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी तिने केली आहे.’ ती सध्या जर्मनीतील डर्मस्टॅड येथे मुख्यालय असलेल्या ‘टर्मा जीएमबीएच’ या कंपनीसाठी एक्स्परिमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीअर म्हणून काम करत आहे. या कंपनीचा युरोपियन स्पेस एजन्सीशी करार झालेला आहे. त्यामुळे वसुंधराला ईएसएच्या ओपीएस-सॅट प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
जगातील सर्वांत शक्तिशाली इनफ्लाइट कॉम्प्युटर्स
मिशनचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक क्षमतांमध्ये आमूलाग्र स्वरूपाची सुधारणा कशी झाली आहे याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी हा उपग्रह विशेषत्वाने विकसित करण्यात आला आहे. उपग्रह अधिक शक्तिशाली ऑनबोर्ड कॉम्प्युटर्ससह अवकाशात झेपावतील तेंव्हा या क्षमतांची आवश्यकता खऱ्या अर्थाने भासणार आहे. नवोन्मेषकारी (इनोव्हेटिव) नियंत्रण सॉफ्टवेअर्सची चाचणी घेणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ओपीएस-सॅट हा उपग्रह आकारमानाने अत्यंत छोटा आहे. याची उंची केवळ ३० सेंटीमीटर आहे. मात्र, जगातील सर्वांत शक्तिशाली इनफ्लाइट कॉम्प्युटर्स यामध्ये बसवलेले आहेत. ओपीएस-सॅटमधील ऑनबोर्ड सॉफ्टवेअरची ट्रायल घेण्यासाठी कोणीही अर्ज करू शकते. या क्षेत्रातील कंपन्या आणि संशोधकांपासून ते निव्वळ छंद म्हणून हे करू इच्छिणारेही इंटरनेटवरून थेट लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात. अशी माहिती देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.