Nanded News 
मराठवाडा

Video : डॉ. मुलमुले यांचे विलगीकरणातील दिवस त्यांच्याच शब्दात

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले २० मार्च २०२० रोजी आॅस्ट्रेलियाहून नांदेडला आले. डॉ. मुलमुले हे प्रसिद्ध निवेदक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. नांदेडला आल्यानंतर विलगीकरणाचा शिक्का मारून ते घरातच बसलेले आहेत. या काळात त्यांनी घेतलेली काळजी आणि त्यांचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहे. त्यांचे अनुभवकथन त्यांच्याच शब्दामध्ये खास ई-सकाळच्या वाचकांसाठी...
 
माझे विलगिकरणातील दिवस...

वीस मार्चपासून मी घरात बंदिस्त आहे. एकोणीसच्या रात्री मी ऑस्ट्रेलियाहून परतलो. सोळा तासाचा प्रवास अखंड मास्क लाऊन, चेहऱ्याला बोट लावण्याचे कसोशीने टाळत पार पाडला. पालथ्या मुठीवर क्वारंटाईनचा शिक्का मारून घेतला आणि स्वतःला घरात कोंडून घेतले. आता मी मोकळा आहे, पण घरात. जणू एकांत कोठडीतून बऱ्याकमध्ये आणलेला, साखळदंडासह घरातल्या घरात फिरण्याची मुभा असलेला कैदी.

माझे कपडे मी अलीकडे फारसे बदलत नाही. कैद्यासारखी तीच ती ट्रेकप्यांट, तोच तो अंगाला न टोचणारा, पटकन काढता-घालता येणारा टी-शर्ट घालतो. दाढीही मी रोज करीत नाही. आंघोळ कधी बाराला, कधी तीनला. जेवणाची कुठलीच वेळ नाही. एरवी कामाच्या रेट्याने वेळेवर, म्हणजे वेळ पाहून भूक लागायची. आता वेळही जात नाही आणि भूकही लागत नाही. एकच विचार असतो डोक्यात, कधी होईल माझी यातून सुटका?

गप्पांची मैफल रंगवावी...
मला एक अनावर उर्मी येते. खसाखसा चेहरा धुवावा. घोटून दाढी करावी. नवा प्यांट शर्ट चढवावा. मोटार काढावी. मॉलमध्ये जावं. चवीने बघत टीशर्ट पाहावे, खरेदी करावे. एखादा मैटीनी टाकावा. फूड जंक्शनला पिझ्झा खावा. संध्याकाळी मित्रांबरोबर नवे रेसटोरेंट धुंडाळावे. मस्त गप्पांची मैफल रंगवावी. किमान रस्त्याने रहदारी पहात हिंडावे.

किमान गर्दीतून वाट काढत फुटपाथवर घासाघीस करीत  फुटकळ वस्तूंची खरेदी करावी. पाणीपुरीच्या गाड्याभोवती जमलेल्या घोळक्यात जेमतेम हात घालीत बशी सरकवावी, मंदिराच्या गाभाऱ्यात भक्तांचे धक्के खात हातावर खडीसाखर तीर्थ घ्यावे, ट्रेनमध्ये शब्दशः यातायात करीत आपला बर्थ गाठावा, मोर्च्याच्या कडेला उभे राहून आपणही जय हो म्हणून ओरडून घ्यावे...

मी गर्दीला आसुसलेलो आहे...
मी...मी गर्दीला आसुसलेलो आहे. पण मला माहित आहे, यातले आता काहीही शक्य नाही. आता गर्दी दूर, किमान रस्त्याने निरुद्देश भटकता येईल की नाही याचीही शाश्वती नाही. कदाचित कोरोनाचे संक्रमण, कोरोनाग्रस्तांचे मृत्यू आटोक्यात येतील, कदाचित ते आटोक्यात नाही येणार, आमच्या अंगवळणी पडतील. लाख दोन लाख मरतील हे वाक्य आम्ही सहजतेने बोलू लागलो आहोतच. बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी कामासाठी बाहेर पडून स्फोटात शेकडो लोकांचे प्राण घेणाऱ्या त्याच लोकलच्या डब्यात बसून ज्या अगतिकतेने मुंबईकर प्रवास करतात, त्याच अगतिकतेपोटी मीही बाहेर पडेन.

मी दाराशीच थबकेन
हां, बाहेर पडण्यापूर्वी बायको किमान चार वेळा काळजीयुक्त स्वरात विचारेल, खरंच जरुरी आहे का? तुम्ही नाही गेलात बँकेत तर चेक वटणार नाही का? तुम्ही नाही गेलात सांत्वनासाठी तर जो मित्र वारला त्याच्या बायकोला वाईट वाटेल का?तुम्ही नाही गेलात तर विजेचे बिल ते लोक कमी नाही करणार का? तुम्ही नाही गेलात तर टूरवाले रिफंड नाही देणार का? मी दाराशी थबकेन. या प्रश्नाचं उत्तर नाही येतेय याची खात्री करूनच बाहेर पडेन. 

दुरूनच नमस्कार करेन
आधी मोबाईल, रुमाल, पाकीट, किल्ल्या, एवढेच बघायचो, आता मास्क आणि सैनिटायझरची शिशीही चाचपूनच निघेन..रस्त्याच्या कडेकडेने, गर्दीशी फटकूनच चालेन. सारखा मास्क चाचपेन. आसपास कुणी शिंकतो आहे का, खोकलतो आहे का याचा अदमास घेण्यासाठी माझे कान सतत टवकारलेले राहतील. चालण्याच्या श्रमापेक्षा सतत सावध राहण्याने मी थकून जाईन. रस्त्याच्या पलीकडून कदाचित कुणी परिचित मला आवाज देईल, तर तो निष्कारण घसा खाकरतो हे आठवून मी त्याला टाळेन. दुरूनच नमस्कार करेन आणि चालत राहीन. 

काळजी घेणारा मी स्मगलरच
रस्त्यातल्या गाड्यांवर दिसणारे रसरशीत जांभळं, लालचुटुक स्ट्रोबेरीज मला खुणावतील. पिवळी धम्मक केळं आणि जांभळी जर्द वांगीही, पण मी आधीच फ्रीजमध्ये कोंबलेली पंधरा दिवसांची भाजी आठवून चालत राहीन. आता रोजरोज ताजी भाजी घेऊन ती साबणाने धुण्याचे कष्ट मला होणार नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे. मी हात काखेत घट्ट आवळून चालेन. दाराला, खिटीला, जिन्याला हात लावण्याचे टाळण्याची शिकस्त करेन. जणू आपल्या बोटांचे ठसे उमटवू न देण्याची काळजी घेणारा स्मगलरच! कारण मला माहित आहे, बोटाच्या ठशांवरून कोरोना माझ्या घराचा माग काढेल, माझ्या फुफ्फुसांचा माग काढेल.

नोकरी करीत असतो तर?
बँकेत मी चिमटीत धरून पैसे पाकिटात टाकेन, आणि कॅशियर खाकरल्याचा भास होऊन तेथून पळत सुटेन. एरवी मी मॅनेजरसोबत गप्पा मारून चहा घेतला असता, पण आता काचेबाहेरूनच हात दाखवून सटकेन. त्याचा आहे, पण त्याच्या समोर बसणाऱ्या खंडीभर कस्टमरचा काय भरवसा? मी विचार करतो, नोकरी करीत असतो तर? तर सारा दिवस मास्क लावून, आल्या-गेल्या माणसांकडे संशयाने बघत कसेबसे आठ तास काढले असते. माझ्यापर्यंत पोचलेल्या फाईल उचलतांना, उघडतांना, पाने उलटतांना अस्वस्थ झालो असतो. कदाचित हातमोजे वापरायला सुरवात केली असती. मध्यंतरात एकत्रित डबा खाताना मित्रांच्या दूर बसलो असतो आणि कधी नाही ते कसोशीने धोधो नळाखाली हात धुतले असते.

गर्दीत जाण्यासाठी चारवेळा विचार करेन 
घरी परतल्यावर मी दाराशीच कपडे काढून सरळ बाथरूम गाठेन. सुतक लागले असावे तसे सारे कपडे धुण्यात टाकेन. खिशातल्या सैनिटायझरने हात चोळून घेईन. आता कुठल्याही समारंभांना उपस्थिती लावण्यापूर्वी चार वेळा विचार करेन. काकाचं वर्षश्राद्ध तर लॉकडाऊनमध्येच आटोपलं, मात्र पुढे पुतण्याचं लग्न आहे. कुठल्यातरी कारणावरनं जायचं मी टाळेन, पण काय कारण द्यावं याचा मी आता विचार करीत बसलो आहे.

नवे नियम अंगवळणी पडतीलही...
आता मी बाहेरून येताक्षणी माझ्याकडे धावत येणाऱ्या नातवाला पटकन कडेवर उचलून घ्यायला माझे हात कचरतील. त्याचे गोबरे गाल चुंबून घेताना ओठ थरथरतील. मी ते नाईलाजाने टाळेन, आणि त्याच्या नजरेतली नाराजी पाहून मला वाईट वाटत राहील. त्याला घट्ट छातीशी धरताना माझा श्वास घशात अडकेल. त्याच्या कुरळ्या केसातून बोटे फिरवताना मी ते आधी धुतले होते का हे प्रयत्नपूर्वक आठवताना माझा मेंदू कुरतडत राहील.  

त्याच्या निरागस डोळ्यात पाहताना मी नव्या पिढीचे भवितव्य शोधेन. कसे असेल त्याचे जग याची कल्पना करेन आणि काळजीने काळवंडून जाईन. खरे तर या विषाणूने नव्हे, माझ्या चिंतेने माझे मन काळवंडून गेले आहे. आता या नव्या जगाचे नवे नियम माझ्या अंगवळणी पडतीलही, पण मन मागे मागे पाय ओढत राहील. जुन्या दिवसांकडे मला खेचत राहील...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT