परभणी : कोरोनावर लस निर्मितीसाठी अवघे जग प्रयत्न करीत आहे. लस कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे यापुढे देशातील प्रत्येक नागरिकास कोरोना योद्धा म्हणून वावरावे लागेल, तशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप)च्या वतीने आयोजित ‘कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा कृषी शिक्षणावर परिणाम’ यावरील ऑनलाइन प्रशिक्षणाचे उद्घाटन मंगळवारी (ता. नऊ) झाले. यावेळी दुपारी चार वाजता डॉ. गंगाखेडकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण सहभागी झाले होते. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. आनंद देशपांडे, डॉ. गोपाल शिंदे यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा : परभणीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू -
यावेळी बोलताना डॉ. गंगाखेडकर म्हणाले, ‘‘कोरोना हा आजार नवीन आहे. एवढा लॉकडाउन कोणत्याही देशाने पाहिला नाही. सध्या न्युझिलंड हा कोरोनामुक्त झाला आहे ते त्यांनी घेतलेल्या काळजीने. त्यांनी जे केले ते आपण का नाही करणार. तो देश छोटा आहे, आपला देश मोठा आहे. परंतु, हताश होऊन बसलो तर काहीही करू शकणार नाही. त्यामुळे आपण आशावादी राहिले पाहिजे. आपला देश विस्ताराने आणि लोकसंख्येने मोठा आहे, त्यामुळे सद्यःस्थितीतर प्रत्येकाने वॉरियर्स बनलं पाहिजे. प्रत्येकानं स्वत:सह कुटुंब आणि समाजाची काळजी घेतली पाहिजे. लस शोधण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत काही हाती लागेल अशी आशा आहे. त्यामुळे लस कधी येईल यावर अवलंबून न राहता आपण स्वत: योद्धा म्हणून वावरावे.’’
जीवन जगण्याची नवीन शैली निर्माण
लॉकडाउन उठवलं म्हणजे कोरोना संपला असे नाही. लॉकडाउन उठवला कारण शासनांना वाटल, जीवन जगण्याची नवीन शैली निर्माण झाली आहे. ती दोन महिन्यांत शिकले आहेत आणि ती भविष्यात पाळतील, ही आशा ठेवूनच लॉकडाउन उठवलं असेल. होमिओपॅथिक आणि आयुर्वेद या बाबत आयुष मंत्रालय सांगेल. आम्ही त्यांना केवळ मदत करू. भारतात कोरोनाचे आकडे जास्त दिसतील. परंतु, देशाची लोकसंख्या पाहता ते साहजिक आहेत, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. ढवण यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन डॉ. विणा भालेराव व डॉ. प्रवीण कापसे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.