परभणी : ''बहुजन सुखाय बहुजन हिताय'' हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात शहरांसह खेडोपाडी लालपरी धावत आहेत. आधुनिकतेच्या काळातही लालपरीलाच प्रवाशांची पसंती आहे, परंतू, अधिकऱ्यांच्या मर्जीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लांब पल्ल्यांसाठीही जुन्याच बसेस दिल्या जात असल्याने वाहक - चालकांसह प्रवासी कमालीचे वैतागले आहेत.
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्रभर लालपरीचे जाळे विणले आहे. खासगी वाहनांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महामंडळानेही कात टाकली आहे. अत्याधुनिक बसेस सुरु करून प्रवाशांची मने जिंकली जात आहेत. असे असले तरी भंगार बसेसचे ग्रहण मात्र कायमच आहे. परभणी आगारातून दररोजच भंगार असलेल्या बसेस धावत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. मध्येच या बसेस बंद देखील पडत असल्याने चालक व वाहकांची तारांबळ उडत आहे. दुसऱ्या बसमध्ये बसवून द्यायचे झाले तरी, त्या बसेस पुर्ण भरुन येत असल्याने बंद गाडीतील प्रवाशांना तासनतास रस्त्यावरच थांबावे लागत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह दररोज अप-डाऊन करणारे तसेच शाळा - महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश असतो.
अधिकाऱ्यांची मर्जी
वास्तवीक पाहता परभणी आगाराला १३ नव्या कोऱ्या बसेस मिळालेल्या आहेत. त्यापैकी दोन बस स्टॅन्डबाय देखील ठेवण्यात येतात. पुणे, पंढरपूर कोल्हापूर, अमरावती, नागपूर अशा दूरच्या पल्यासाठी नव्या गाड्या देणे आवश्यक आहे. परंतू तेथे जुन्या बस दिल्या जात असल्याची माहिती एका चालकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
सोमवारी नागपूरसाठी खराब बस का सोडण्यात आली ? याबद्दल संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे. काही मर्जीतील वाहकांना सेलू, सोनपेठला किंवा जवळच्या प्रवासासाठी त्या बस दिल्या जात आहेत. अधिकाऱ्यांच्या मर्जीला प्रामाणिक वाहक व चालक वैतागले आहेत. वरिष्ठांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशीही मागणी आता जोर धरत आहे.
मी सोमवारी (ता. ८) परभणी - नागपूर या भंगार गाडीमधून प्रवास करत होतो. अशी मोडकी - तोडकी बस दिल्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. हिंगोलीत तीन - चार तास वाया गेले. प्रवाशांना झालेल्या त्रासाची जबाबदारी कोण घेणार. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर आगारप्रमुखांनी कारवाई करण्याची गरज आहे. आरक्षण करूनही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
— सुदामराव वाघमारे, प्रवासी, परभणी.
परभणी - नागपूरसाठी अशी बस कुणी व का ? पाठवली त्याची चौकशी करून कारवाई करू. दरम्यान परभणी येथून नागपूरसाठी दुसरी बस पाठवण्यात आली होती. यापुढे लांब पल्ल्यासाठी बसेस सोडताना काळजी घेतली जाईल.
— दत्तात्रय काळम पाटील, आगार प्रमुख परभणी.
परभणी बसस्थानकातून खिळखिळ्या बस सोडल्या जातात.
आसनांसह खिडक्याही तुटलेल्या असतात
बस स्वच्छ देखील करत नाहीत
चालकाचे सीटही तुटलेले असतात.
बसचा संपूर्ण ढाचा, खुर्च्या हलतात
भंगार बसमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.