बीड : जिल्हा रुग्णालयात सध्या एकूण खाटांच्या क्षमतेच्या दुप्पट रुग्ण भरती असतात. ता. १५ ऑगस्टपासून सर्व आरोग्य सेवा मोफत केल्याने बाह्य रुग्ण विभागातील संख्याही दुप्पट झाली आहे. त्यामुळे संख्या अधिक, जुन्या इमारतीमधील सोनोग्राफी केंद्राच्या बाहेरची जागा अपुरी आणि सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचा परिणाम गर्भवतींच्या तपासण्यांवर होत आहे. जागा व बसण्याची सुविधा अपुरी असल्याने गर्भवतींना ताटकळत थांबावे लागते.
जिल्हा रुग्णालयाची सध्याची खाटांची क्षमता ३२० असली तरी आंतररुग्ण विभागात रोज साधारण ५०० रुग्ण शरिक असतात. ३२० खाटांच्या क्षमतेचे मनुष्यबळ मंजूर असले तरी त्याही काही पदे रिक्त आहेत. त्यात ता. १५ ऑगस्टपासून शासनाने सर्व आरोग्य सेवा मोफत केल्याने आता बाह्य रुग्णांची संख्याही दीड पटीने वाढली आहे.
सध्या बाह्यरुग्ण विभागात रोज साधारण १५०० रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे वाढते रुग्ण व अपुरे मनुष्यबळावर रुग्णसेवा देताना जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या नाकी येतात. त्यात जुनी जिल्हा रुग्णालयाची इमारत देखील जुनाट व अपुरी आहे. येथे सोनोग्राफी केंद्र असून, या केंद्राच्या समोरच्या बाजूलाच एक्स- रे मशिन देखील आहे.
दोन्हीच्यामध्ये केवळ व्हरांडा आहे. दरम्यान, सोनोग्राफीसह एक्स- रे करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची नियमितची संख्या ४०० च्या घरात आहे. सकाळच्या सत्रात एकाच वेळी या ठिकाणी पोटदुखी, हात मोडलेले तसेच गर्भवती असे साधारण अडीचशे ते तीनशे रुग्ण तपासणीसाठी येतात. यात महिलांची संख्या दोनशेच्या घरात असून, यात ५० हून अधिक गर्भवती महिला असतात. तर, बसण्याची व्यवस्था केवळ १५ ते २० रुग्णांपुरते खाट ठेवलेले आहेत. त्यामुळे गर्भवतींसह इतर रुग्णांनाही ताटकळत उभा राहावे लागते. गर्भवतींना याचा त्रास अधिक आहे. अपुरी जागा व खाट, यामुळे वातावरण देखील कोंदट असते.
गर्भवती व महिलांसाठी असावी स्वतंत्र व्यवस्था
सध्या वापरात असलेली इमारत ५० वर्षांहून अधिक जुनी आहे. या इमारतीमध्ये सध्या असलेल्या सोनोग्राफी केंद्र व एक्स- रे विभाग समोरासमोर असल्याने रुग्णांसाठी जागा अपुरी पडते. जिल्हा रुग्णालयात महिला व बालसंगोपन केंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली असली तरी विद्युतीकरण व लिफ्ट नसल्याने ही इमारत वापरात नाही.
नव्या इमारतीमध्ये महिलांसाठीचे सर्व विभाग व सोनोग्राफी केंद्र हलविले हा चांगला पर्याय असू शकतो. तसेच सोनोग्राफी केंद्राच्या बाजूला महिलांसाठी बसण्याची व्यवस्था देखील करणे गरजेचे आहे. जुनी इमारत, उपलब्ध यंत्रणेच्या जोरावर जिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्णांवर उपचार केले जातात. माता- बालसंगोपन केंद्राची इमारत कार्यान्वित झाल्यानंतर या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असतील. या इमारतीत केवळ बालके व महिला रुग्णांची सोय असेल.
- डॉ. अशोक बडे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.