पालम ः तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल २७ वर्षाचा कालखंड लोटूनही या कालावधीत सक्षम शैक्षणिक, औद्योगिक प्रकल्प तालुक्याच्या वेशीत कार्यरत झाले नाहीत. पर्यटनाची दुरवस्था झाली आहे. या तालुक्याच्या विकासाला चालना कधी मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पालम हा निजामकालीन तालुका म्हणून ओळखला जातो. परंतू, निजाम राजवट संपुष्टात आल्यानंतर पालमचा तालुक्याचा दर्जा काढून घेण्यात आला. त्यानंतर तालुका दर्जा प्राप्त होण्यासाठी येथील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा देत १९९२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कारकिर्दीत पुन्हा तालुका म्हणून घोषित करण्यात आला. नव्याने झालेल्या तालुक्यामुळे रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लागून विकासाचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही असे वाटले होते. परंतू, पाहिलेले सर्व स्वप्न ‘जैसे थे’ अवस्थेत आजही आहे. शैक्षणिक बाबीचा विचार केल्यास तालुक्यात गणेशराव रोकडे, लक्ष्मणराव गोळेगावकर, सुरेशराव जाधव यांनी शाळा महाविद्यालय सुरू करून शिक्षणाची दालने विद्यार्थ्यांसाठी खुली करीत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. यामुळे तालुक्यात काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रात वाव मिळाला. परंतू, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते.
जांभुळबेटचे सौंदर्य लयास जाण्याच्या मार्गावर
औद्योगिक क्षेत्राचा विचार केल्यास १९९० मध्ये पेठशिवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीच्या माध्यमातून अनेक मजुरांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या पेठशिवणी परिसरातील नागरिकांचा प्रश्न काही प्रमाणात मिटला. या शिवाय तालुक्यात एकही प्रकल्प पुर्ण न झाल्याने मजुर कामासाठी बाहेर गावी स्थलांतरित होत आहेत. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पात्रात वास्तव्यात असलेले जांभुळबेट कधीकाळी पर्यटनाचे आकर्षण बनले होते. परंतू, तेथे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड व बेसुमार वाळू उपश्यामुळे बेटाला आलेले सौंदर्य लयास जाण्याच्या मार्गावर आहे. २००७ मध्ये बेटातील पर्यटनासाठी दहा लाख रुपये खर्च करूनही विश्रामगृह बांधण्यात आले. परंतू, यासाठी याची देखभालीसाठी कोणीच नसल्याने विश्रामगृहातील वस्तू चोरीस गेल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक बाबतीत हा मागास तालुका म्हणून जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहे. या तालुक्याचा विकासाला चालना कधी व केव्हा मिळेल असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आजही भेडसावत आहे.
शहर स्वच्छ, सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात रस्ते, नाली, पथदिवे यासह शहरात इतर काही समस्या सोडून शहर स्वच्छ, सुंदर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे.
- बाळासाहेब रोकडे, विद्यमान उपनगराध्यक्ष.
संपादन ः राजन मंगरुळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.