नांदेड : शासनाचा महसूल भरून अधिकृतरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू लिलावधारकांना उमरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक आनंत्रे पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी सोमवारी (ता. तीन) जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा....सेंद्रीय भाजीपाला का असतो आरोग्यासाठी उपयुक्त
जप्त वाळू साठ्यांचा लिलाव
उमरी तालुक्यातील येंडाळा, कौडगाव व महाटी नदीकाठांवर प्रशासनाने वाळूसाळे जप्त करून त्याचा लिलाव केला आहे. या लिलावात प्रतिब्रास चार हजार दोनशे रुपयांप्रमाणे रक्कम भरली. सोबतच दहा टक्के गौण खनिज कर भरला. यानंतर लिलावधारकांना दहा दिवसांत वाळूची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली.
प्रत्येक वाहणाला १४ हजाराचा हप्ता
वाळू वाहतूक करत असताना उमरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक आनंत्रे वाळू साठ्याच्या ठिकाणी खासगी वाहनातून भल्या पहाटे येत आहेत. प्रतिब्रास एक हजार रुपयांची मागणी करून एका वाहनाला दर महिन्याला १४ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना पावती तपासणीचा अधिकार नसताना ते गाड्या अडवून पावत्यांवर सही करत आहेत. तसेच वाहनचालक व वाळू ठेकेदारांना दमदाटी करून पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे.
या प्रकरणी अशोक आनंत्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे दिले आहे.
हेही वाचलेच पाहिजे...बीजोत्पादनातून मिळते दुप्पट उत्पन्न
पोलिस अधीक्षकांना कारवाइचे आदेश
या बाबत जिल्हाधिकारी यांनी पोलिस अधीक्षकांना कार्यवाही करण्यास सांगितले असल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली आहे. या शिष्टमंडळात निवेदनात देताना गंगाधर बडुरे, राजू पाटील हंबर्डे, तिरुपती वेताळे, संजय मोरे, मारोती नरवाडे, परमेश्वर लोहगावे, साईनाथ सुबलवाड, मुदसर खान, प्रकाश बेलकर, राजू मुंडे, गंगाधर बेलकर, सुनील पिल्लेवाड, ज्ञानेश्वर बेलकर, स्वप्नील लुटे, शिवराम पांडे, बापूराव जिगळे, शंकर बेलकर आदी उपस्थित होते.
पोलिसांकडून सर्रास वसुली
जिल्ह्यात वाळू उपसा करणाऱ्या लिलावधारकांना वाहतुक हद्दीतील सर्वच पोलिस ठाण्यांना हप्ते द्यावे लागतात. हा विषय सर्वश्रुत झाला आहे. शासनाचा महसुल भरुन वाळू घाट असलेल्या पोलिस ठाण्याला ठरविक रक्कम द्यावी, लागते असे लिलावधारकांचे मत आहे. यात प्रत्येक वाहनाला त्यांच्या खेपेनुसार रक्कम द्यावी लागते. यामुळे वाळू वाहतुक तसेच वाळू घाट असलेल्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चंगळ होत असते. हप्ते वसुलीचा प्रकार पुर्वी लपून झपून व्हायचा. परंतु सध्या पोलिसांच्या वसुलीच्या तगाद्याने हा प्रकार जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचल्याने चर्चेला उधान आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.