औसा : गतवर्षीपासून खत कंपन्यांकडून केला जाणारा खतांचा पुरवठा हा भारत नावाखाली होत असून या खतांच्या गोण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा मतदानावर प्रभाव पडेल असा मजकूर असलेला खत तो फोटो स्टिकर चिकटवून विक्री करण्याचे बंधन दुकानदारांना घातल्याने आता खत विक्री कशी करायची?
याची चिंता खत विक्रेते यांच्यासह खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना लागली आहे. खत विक्रेत्यांकडे असे स्टिकर उपलब्ध नाहीत आणि युरिया सारख्या खताला स्टिकर चिकटवणे परवडत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
आचारसंहित्येच्या कक्षेत खातांना आणायचे होते तर फोटो छापलाच कशाला? असा सवाल खतविक्रेते करीत आहेत. सध्या जिल्ह्यात हजारो टन खत गोदामात आहे आणि आता उसाला डोस देण्यासाठी शेतकरी खतांची मागणी करीत असतांना खताची विक्री करता येत नाही.
यावर उपाय म्हणून खातांना आचारसंहितेच्या कक्षेतून काढावे अथवा ज्या कंपन्यांचा खत आहे त्यांनी स्टिकर लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी दुकानदार करीत आहेत. केंद्र शासनाच्या खते विभागाने देशात भारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या.
त्या सोबत खतांच्या गोणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला. परवा लोकसभेची आचार संहिता लागू झाल्यावर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्र काढून कोणत्याही राजकीय व्यक्तीचे फोटो अथवा मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असलेली खते तो मजकूर अथवा फोटो स्टिकरने झाकूनच विक्री करण्याचे आदेश दिले.
जर असे आढळले नाही अथवा कोणाची तक्रार अली तर अशा दुकांदारावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. खत विक्रेत्यांकडे हजारो टन खते गोदामात आहेत. आता उसाच्या डोससाठी शेतकरी खतांची मागणी करीत आहेत.
या खतांवर असलेला फोटो झाकण्यासाठी दुकानदाराकडे स्टिकर उपलब्ध नाहीत. आणि बाजारातून असे स्टिकर विकत आणणे दुकानदाराला परवडत नाही. त्यामुळे अशी खते शेतकऱ्यांना विकायची कशी हा प्रश्न दुकानदारांना सतावतो आहे.
पंतप्रधान मोदींच्या फोटोला रंग लवायलाही दुकानदार धजत नाहीत. रंग लावून फोटो झाकला तर त्याला वेगळाच रंग येण्याची भीती असल्याने ज्या कंपनीचे खत आहे त्या कंपनीने दुकानदारांना स्टिकर पुरवावे दुकानदार स्टिकर लावून त्याची विक्री करतील अशी मागणी करीत यावर निवडणूक आयोगाने पर्याय काढावा अशी विनंती लातूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.