बदनापूर : येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत. 
मराठवाडा

बदनापूर ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण 

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) -  येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे.

रुग्णालय शहराबाहेर साडेतीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे रुग्णांना प्रवास भाड्याचा खर्च करावा लागतो. त्यामुळे शहरातील रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचाराला प्राधान्य देतात. राज्य शासनाने बदनापूर ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत, शिवाय शहरात याच रुग्णालयाला जोडणाऱ्या ग्रामीण उपरुग्णालयाला मान्यता द्यावी, अशी मागणी होत आहे. 

रिक्त पदांमुळे कामाचा बोजा 

येथील ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांपासून रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे असताना एक पद कायम रिक्त असते. त्यामुळे चोवीस तास रुग्णसेवा देताना उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. परिचारिकांचे सातपैकी एक पद रिक्त असल्यामुळे उर्वरित परिचरिकांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे सातपैकी तीन पदे रिक्त आहेत. समाधानाची बाब म्हणजे क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे रिक्त नसल्यामुळे रुग्णांना रक्त व एक्‍स-रेचा अहवाल वेळेत प्राप्त होतो. बदनापूर ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरून रुग्णांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी तालुक्‍यातील रुग्णांकडून होत आहे. 

रुग्णवाहिकाही झाली जुनी 

येथील ग्रामीण रुग्णालयाला एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेची जीप जुनी असल्यामुळे दर महिन्याला त्याच्या देखभाल - दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे शासनाने रुग्णसेवेसाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर करावी, अशी मागणी रुग्ण करीत आहेत. 

येण्या-जाण्यांवर आर्थिक भुर्दंड 

येथील ग्रामीण रुग्णालय शहरापासून तब्बल साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्यामुळे रुग्णांना तपासणी व उपचारासाठी जाताना रिक्षाचा वापर करावा लागतो. त्यामुळे रुग्णांना नाहक भाड्याचे पैसे खर्च करावे लागतात, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. एकूणच यामुळे तालुक्‍यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांची संख्या रोडावलेली दिसते. अर्थात, येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी नियमित रुग्णसेवा देत असल्यामुळे रुग्णसंख्येत काहीशी वाढ झालेली दिसते. वरुडी येथील नूर हॉस्पिटलमुळे देखील रुग्णसंख्या घटल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. 

कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेवर परिणाम 

येथील ग्रामीण रुग्णालयात बदनापूर शहरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे रुग्णालयात आठवड्यातून एक किंवा दोन प्रसूती होतात. सिझेरियन प्रसूती असल्यास उपलब्ध सुविधेअभावी गर्भवती महिलांना जालना येथील महिला व बालरुग्णालयाला पाठविण्यात येते. बदनापूरचे ग्रामीण रुग्णालय लांब असल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे शिबिरी देखील घेता येत नाहीत. शिबिर आयोजित केल्यावर त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. 
शवविच्छेदन खोलीची अवस्था गंभीर झालेली असून खिडक्‍यांच्या काचा फुटलेल्या आहेत. 

संरक्षण भिंत पडलेली

बदनापूर ग्रामिण रुग्णालय आणि समाजकल्याण विभाग मुलांच्या वसतिगृहाची सामायिक भिंत मागील दोन वर्षांपासून पडलेली आहे. विशेष म्हणजे पडलेली भिंत रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाला खेटून आहे. त्यामुळे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रात्री-अपरात्री शवविच्छेदनगृहात ठेवण्याचे काम पडल्यास वसतिगृहातील विद्यार्थांत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पडलेली भिंत तातडीने बांधण्याची गरज आहे. 

ट्रॉमा केअर सेंटर आवश्‍यक 

बदनापूर शहरासह तालुक्‍यातील बराचसा भाग जालना-औरंगाबाद महामार्गावर आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यात अनेकजण जखमी होतात; मात्र जखमी झालेल्या लोकांवर तातडीने उपचार करण्यासाठी सक्षम रुग्णालय नाही. त्यामुळे गंभीर जखमी रुग्णांना जालना किंवा औरंगाबाद येथे हलवावे लागते. त्यात रुग्णांचा महत्त्वाचा वेळ वाया जात असल्यामुळे दुर्दैवाने जखमी व्यक्ती दगावण्याची घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे बदनापूर ग्रामीण रुग्णालयाला जोडून ट्रॉमा केअर सेंटरही उभारण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

बदनापूर ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. रुग्णालयाची संरक्षक भिंत एका ठिकाणी पडलेली आहे. शहरापासून रुग्णालय काहीसे अंतरावर असल्यामुळे त्याचा परिणाम बाह्य व आंतररुग्णांच्या संख्येवर जाणवतो. अर्थात, बदनापूर येथे ग्रामीण रुग्णालयाला आवश्‍यक असलेल्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. 
- डॉ. ओम ढाकणे, वैद्यकीय अधीक्षक 

बदनापूर तालुक्‍याचे ठिकाण असताना येथे ट्रॉमा केअर सेंटर नाही. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर आवश्‍यक उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे. बदनापूरचे ग्रामीण रुग्णालय शहरापासून दूर असल्यामुळे अनेक रुग्णांची शासकीय रुग्णालयात उपचार करण्याची इच्छा असताना त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. 
- पवन पाराशर, नागरिक, बदनापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT