परभणी/औराद शहाजनी (जि.लातूर) : परभणी (Parbhani) व परिसरात मंगळवारी (ता.३१) सकाळी दीड ते दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता.३०) रात्रीपासूनच पावसाचा अंदाज येत होता. त्यानंतर मंगळवारी पहाटे पासूनच परभणी शहर व परिसरात जोरदार पाऊस (Rain) झाला. परभणी शहरात गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. परंतु, मोठा पाऊस झाला नव्हता. मंगळवारी पहाटेपासूनच परभणी तालुक्यातील सर्वच गाव शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त होता. हा पाऊस परभणी शहरासह आजूबाजूच्या परिसरात झाला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रकल्प भरले आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात (Yeldari Dam) ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्याप या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नाही. परंतु पाऊस असाच सुरू राहिला तर दोन दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातील औरादसह परिसरात जोरदार पाऊस
औराद शहाजनी (जि.लातूर) (Latur) व परिसरात रविवारी (ता.२९) रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण झाले आहे. परंतु यामुळे रस्त्याची दुरावस्था व सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आलेली आहे. सोमवारी (ता.३०) सकाळपासूनच जोरदार पावसाची हजेरी लागल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. औराद शहाजनीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील जामखंडी जवळील निलंगा-भालकी, बिदर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहून पूल वाहून गेल्यामुळे हा मार्ग बंद झालेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आंबेवाडी मार्गे मिरकल -बेलूर -हुलसुर असा लांबचा प्रवास करून राष्ट्रीय महामार्गावर परत यावे लागत आहे. पुल कर्नाटकाचा वाहून गेला तरी त्रास महाराष्ट्रातील वाहनचालकांना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण या महामार्गावरून खूप मोठ्या प्रमाणात मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केली जात असते.
जामखंडी जवळील हा पूल मागील चार वर्षांपासून बांधकामविना तसाच पडून आहे. कर्नाटक शासनाने तात्पुरता पूल केल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही पावसाळ्यात पुन्हा वाहून गेल्यामुळे वाहनचालकांना लांबचा प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरून औरादहुन भालकी, बिदर, हैदराबाद जाणाऱ्या बसेस व वाहनचालकांना या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. औराद व परिसरातील या दमदार पावसामुळे सर्वच पिकांना जीवनदान मिळाले आहे. औराद येथील जलविद्युत जलविज्ञान प्रकल्पामध्ये रविवार रात्रीपासून ७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आले आहे, तर आतापर्यंत येथून एकुण ६१७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, अशी माहिती मुक्रम नाईकवाडे यांनी दिलेली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.