वसमत : वसमत शहरापासून मोजक्या अंतरावर असलेल्या नांदेड व परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असल्याने तेथील तळीराम व दारू विक्रेत्यांनी वसमतकडे आपला मोर्चा वळवला आहे. चारचाकी व दुचाकीद्वारे देशी व विदेशी दारुचा पूरच त्या दिशेने वाहत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून आहे. विशेष म्हणजे दारुची ह्या चोरट्या वाहतूकीवर पोलीसांच्या धाडी पडत असल्याने शहर व ग़्रामीण पोलिस ठाणे दारुमुद्देमालाने गजबजले आहे.
याबाबत माहिती अशी, की देश व राज्यसह कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असून रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सुरुवातीला नांदेड व नंतर परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी किराणा दुकान काही वेळासाठी सुरू ठेवण्याचे आदेश असले तरीही बार व दारूची दुकाने मात्र कायम बंद असल्याने तळीराम दारू विक्रेत्यांची तगमग वाढली आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात लाॅकडाऊन नसल्याने सर्व दुकाने सुरू आहेत. वसमत शहरापासून मोजके अंतरावर नांदेड व परभणी जिल्हे असून आता या तळीराम व दारू विक्रेत्यांनी आपला मोर्चा वसमतकडे वळवला आहे.
त्यामुळे मागील दोन दिवसांपासून वसमत शहरात स्थानिक नागरिकांपेक्षा नांदेड व परभणी जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच तगमग होत असलेल्या या दोन्ही जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांनी चारचाकी व दुचाकीद्वारे दारू नेण्याचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी शहर पोलिसांनी नांदेड येथील दोघांना अटक करुन चारचाकी व दारुसह अडिच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अनेक दुचाकीवरील दारुविक्रेत्यवर कारवाई सुरु आहे. शनिवारी ता.२७ उपविभागीय पोलिस अधिकारी वाशीम हाश्मी, ग्रामीण पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अविनाश राठोड, साहेबराव चव्हाण, अंबादास विभुते, मधुकर आडे, राहूल नरवाडे, निलेश अवचार या पथकाने आंसेगाव रोड, बाभूळगाव रोड, नांदेड रोड आदी ठिकाणी सापळा रचून १० दुचाकी व देशी विदेशी दारुसह ३ लाख ६० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन संबंधितांवर कारवाई केली. तर शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन धाडीत बारा हजारांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही ठाण्यात राजकीय समर्थकांच्या फेऱ्या
वसमत येथून दारुची चोरटी वाहतूक करणार्या मध्ये राजकीय वरदहस्त असलेले असल्याने वसमत येथे पक्षीय पदाधिकारी असलेल्यांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे आपल्या प्रियजणांना काही मदत करता येते का याची चाचपणी करण्यासाठी राजकीय पुढारी दोन्ही ठाण्यात घिरट्या घालताना दिसत आहेत.
होळी सण उत्सवामुळे अधिकच गर्दी
रविवारी होळी व सोमवारी धुळंडी असल्याने दारुची मागणी लक्षात घेता चोरटी दारुविक्रेत्यांची गर्दी अधिकच पहायला मिळाली.
स्थानिक दारुविक्रेत्यांची चांदी
शेजारील दोन्ही जिल्ह्यांती यश जयंतल लाकडानची आयती संधी आल्याने स्थानिक दारुविक्रेत्यांनी चांदी केली. ग्रामीण भागात पार्सल सुविधा देऊन दाम दुपटीची कमई केली.
संपादन - गणेश पिटेकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.