Kunbi Caste Certificate: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठवाड्यात ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विदर्भ आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही तालुक्यात मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र दिले जातात. या दाखल्याची प्रक्रिया काय असते, असा प्रश्न आता मराठवाड्यातील नागरिकांना पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया सारखीच असते.
विदर्भ आणि सातारा, कोल्हापूरमध्ये काय प्रक्रिया असते-
कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक (तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या आदी.) यापैकी कुठल्याही एका नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.
जातीचा पुरावा मिळवण्यासाठी पर्याय -
अ) रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.
ब) स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासावे.
क) आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी
(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.
ड) रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.
इ) रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.
मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारच्या जीआरनुसार प्रक्रिया-
१३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या रक्ताच्या नात्यातील कुठल्याही एका नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा सादर करावा लागतो. मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरीक वरील पर्याय शोधून पुरावा गोळा करु शकतात.
मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसगट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
नव्या जीआरनुसार राज्य सरकारकडून निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येत आहे. ही समिती महसूल, शैक्षणिक आणि संबंधित नोंदी तपासात आहे. मागणीनुसार निजाम काळातील 'कुणबी' नोंदी असलेल्या मराठा समाजाला 'कुणबी' प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया (SOP) निश्चित करेल आणि अशा प्रकरणांची वैधानिक आणि प्रशासकीय छाननी करेल. या समितीने प्राथमिक अहवाल तयार करून सरकारला सादर केला आहे. त्यानुसार समितीने ४०- ४५ दिवसात १ कोटी ७२ लाख दस्तावेज तपासून १३,५०० नोंदी शोधल्या आहेत. समितीच्या पाहणीनुसार अनेक मराठा कुटुंबांच्या तीन पिढ्यांपूर्वी किंवा दोन पिढ्यांपूर्वी कुणबी म्हणून नोंदी आढळल्या आहेत.” अशी माहीती चंद्रकांत पाटलांनी दिली. (Latest Marathi News)
निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि सर्व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून आहेत. तसेच औरंगाबादचे विभागीय आयुक्त (छत्रपती संभाजी नगर) समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीला पूरक माहिती देण्याचे कामही महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील यापूर्वीची समिती करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.