नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. मागील दहा दिवसात वीस हजार क्विंटलची आवक झालेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार सातशे रूपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली.
जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीनची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. कापणी करून ठेवलेल्या तसेच शेतात उभ्या असलेले सोयाबीन भिजल्यामुळे नुकसानीचे प्रमाण अधिक होते. यानंतर भिजलेल्या सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्या मालाला दर कमी मिळत होता. त्यात ओलावा अधिक असल्यामुळे व्यापारी दर कमी देत होते. सध्या सोयाबीन काढणीनंतर ते वाळविल्यामुळे धान्यातील ओलावा कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात दरामध्ये सुधारणा झाल्याचे दिसुन येत आहे.
हेही वाचा- Video : ‘हे’ आहे माहूरगडानंतर दुसरे दत्ताचे देवस्थान
नवा मोंढा बाजारात आवक
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात मागील दहा दिवसात सोयाबीनची आवक वीस हजार क्विंटल झाली. गुरूवारी (ता. पाच) सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान तीन हजार दोनशे ते कमाल सात हजार आठशे ८१ रुपये दर मिळाला. सरासरी तीन हजार ७८१ रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगीतले. सोयाबीनला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेनुसार तीन हजार ७१० रुपये दर जाहीर केले आहेत. सध्या बाजारात दरात सुधारणा झाल्याने शेतकरी शासकीय धान्य खरेदी केंद्राएवजी बाजारात धान्य विक्री करत आहेत.
सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी
जिल्ह्यात आठ लाख ७८ हजार ३८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी यंदा आठ लाख तीन हजार ५१० हेक्टरवर पेरणी झाली होती. परतीच्या पावसाने पेरणी क्षेत्रापैकी तब्बल सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. यात कोरडवाहू क्षेत्राचे सहा लाख ४८ हजार ७८, बागायती ६१ व बहुवार्षिक फळपिकांच्या १७७ हेक्टरचे नुकसान झाल्याचे सर्वेत आढळून आले. यात सर्वाधिक सोयाबीनचे तीन लाख ७५ हजार ३७३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळेल.
उघडून तर बघा- ज्येष्ठांनो सावधान ...!
नवा मोंढ्यात सोयाबीनची दहा दिवसातील आवक व दर
(आवक व दर क्विंटलमध्ये)
तारीख..........आवक......किमान दर.....कमाल दर.....सरासरी दर
२५ नोव्हेंबर...३,००७........३,१००.......३,७००.........३,५००
२६ नोव्हेंबर...१,४३०........३,४००.......३,६००.........३,५५०
२७ नोव्हेंबर...२,०७८........२,९००.......३,६८१.........३,६००
२८ नोव्हेंबर...२,१४८........३,१००.......३,६९०.........३,६००
२९ नोव्हेंबर...२,४०२........३,०००.......३,७७१.........३,६५०
३० नोव्हेंबर...१,६४९........३,१११.......३,७००.........३,५००
०२ डिसेंबर....२,१३०........३,१५१.......३,८५१.........३,८५१
०३ डिसेंबर....२,१८३........३,१००.......३,९०२.........३,७००
०४ डिसेंबर....१,२५८........३,३००.......३,८५१.........३,७००
०५ डिसेंबर....१,६६१........३,१३२.......३,८७५.........३,७८१
तेल उत्पादक प्लॅंटवर सोयाबीनचे दर वाढविल्यामुळे मोंढा बाजारातही भावात तेजी आले आहे. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्याने दरात सुधारण झाली.
डी. ए. संगेकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.