जालना - जिल्ह्यात यंदा डेंगीच्या तापाचे थैमान सुरूच आहे. जूनपासून आजपर्यंत तब्बल ४२ रुग्ण आढळून आले आहे. शिवाय चार जणांचा डेंगीसदृश तापाने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सध्या सहा रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात जून महिन्यापासून पावसाने ओढ दिली. मात्र, तरी देखील जिल्ह्यात जून महिन्यापासूनच डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. सुरवातीच्या काळात ही प्रमाण कमी होते. मात्र, जसा-जसा पाऊस लांबला तशी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली.
परिणामी नागरिकांकडून पाणी साठा केला जात आहे. सुरुवातीच्या काळात शहरातील सटवाई तांडा येथे डेंगीचे रुग्ण आढळून आले. मात्र, डेंगीची ही साथ आता शहरासह अन्य तालुक्यात ही पसरत असल्याचे चित्र आहे. जूनपासून आतापर्यंत १७६ नमुने डेंगीची चाचणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यांपैकी तब्बल ४२ डेंगीचे रूग्ण आढळून आले आहेत. तर चार रुग्णांचा या डेंगीसदृश तापाने बळी घेतला आहे.
जालना शहरातील सटवाई तांडा, चंदनझिरा, बडी सडक, ढोरपुऱ्यासह भोकरदन शहर व तालुक्यात, जाफराबाद, बदनापूर, अंबड तालुक्यातही डेंगीचे रूग्ण आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे मागील महिन्यात जिल्ह्यात तब्बल २४ डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. तर ता. एक ऑक्टोबर ते आजपर्यंत जिल्ह्यात दोन रूग्ण निष्पन्न झाले आहेत. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या सहा डेंगी सदृश तापाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पाणी साठ्यात वाढ झाल्याने डेंगीचे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डेंगीचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला नाही. परिणामी रुग्णांची भर पडत असल्याचे चित्र आहे.
शहरासह जिल्ह्यात डेंगीचे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच काही संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा मृत्यू डेंगी आजाराने झाला आहे का याचा अहवाल गुरूवारी (ता.पाच) वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त होणार आहे. सध्या जिल्ह्यात डेंगी संसर्ग परिस्थिती आटोक्यात आहे.
डॉ. संतोष टोनगिरे,
जिल्हा हिवताप अधिकारी, जालना.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या सहा डेंगीच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पूर्वी काही रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटीही देण्यात आली आहे.
डॉ. प्रताप घोडके,
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, जालना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.