जालना - मराठवाड्यातील जालना शहर स्टील उद्योगाप्रमाणे बियाणे उद्योगाचे हब म्हणून विकसित झाले आहे. या ठिकाणी महिको सारख्या जवळपास पन्नासहून अधिक बियाणे उत्पादक कंपन्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मुबलक बियाणे कंपन्या यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. बियाणे निर्मिती करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते.
त्यातच या दोन्ही जिल्ह्यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या बदनापूर सारख्या ठिकाणी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर कृषी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थी बियाणे कंपन्यांसाठी कुशल मनुष्यबळ ठरत आहेत. एकूणच बियाणे उद्योगाच्या भरभराटीत बदनापूर कृषी महाविद्यालयाचे योगदान मोठे आहे.
बियाणे उद्योगाची पंढरी
जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिको, कलश, नाथ सीडस्, अजित सीड्स अशा लहान - मोठ्या शेकडो कंपन्या आहेत. राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या दोन्ही जिल्ह्यातच सर्वाधिक बियाणे निर्मिती केली जाते. अर्थात हा उद्योग बहुतांशी कुशल मनुष्यबळावर आधारित आहे.
त्यासाठी कृषी पदवी, पदव्युत्तर आणि पदविकाधारक मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असते. अर्थात अनेक ठिकाणी अशा उद्योगांसाठी बाहेर राज्यातून कुशल कामगार आयात करावे लागते. मात्र बदनापूर येथे कृषी महाविद्यालयातून घडविलेले विद्यार्थी अशा उद्योगात आज भरीव कार्य करत आहेत.
बदनापूर कृषी महाविद्यालयाची भरारी
बदनापूर कृषी महाविद्यालयाची स्थापना वर्ष २००० मध्ये झाली. बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषीच्या उच्चशिक्षणाची संधी मिळाली आहे. बदनापूरचे महाविद्यालय नवी दिल्ली येथील कृषी अनुसंधान परिषदेने अधिस्वीकृत केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांतून कृषी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात.
बदनापूर कृषी महाविद्यालयातून आतापर्यंत ९०० विद्यार्थ्यांनी कृषी पदवीधर तर अंदाजे २५० विद्यार्थ्यांनी कृषी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. यात ५० इतर राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील अनेक विद्यार्थी तांत्रिक मार्गदर्शक म्हणून विविध बियाणे, खत आणि कीटकनाशक कंपन्यांत तर काही विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक निवड मंडळातर्फे शास्त्रज्ञपदाला गवसणी घातलेली आहे.
अर्थात काही विद्यार्थी कृषी उद्योजक देखील झाले आहेत. याच महाविद्यालयाचा सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील विद्यार्थी योगकुमार श्रीखंडे यांनी रोपवाटिका टाकली असून त्यांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपेक्षा अधिक आहे.
एकूणच बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवस्थित तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याने खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विकास साधला जात असून त्यांच्या संशोधन आणि नावीन्यपूर्ण कल्पनेने सामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीस मदत मिळत आहे. शिवाय जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बियाणे उद्योगाला देखील झळाळी प्राप्त होत आहे.
सद्यःस्थितीत कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी भारतीय प्रशासन सेवा (वन विभाग), महाराष्ट्र प्रशासन सेवा, कृषी शास्त्रज्ञ नाबार्ड क्षेत्र, बँक, कृषी विभाग अशी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. स्वतःचे व्यवसाय व उद्योग उभारत आहेत. बियाणे क्षेत्रामध्ये सुद्धा महाविद्यालयाचे बरेचसे विद्यार्थी खाजगी बियाणे कंपनीमध्ये यशस्वीरीत्या काम करीत आहेत. विद्यार्थ्यांनी भाजीपाला पिके, कपाशी, मका, बाजरी व इतर पिकामध्ये वाण विकसित केलेले आहेत. ती वाणे आज शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित व लोकप्रिय आहेत.
- डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, बदनापूर
जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा दोन्ही जिल्ह्यात भरपूर बियाणे कंपन्या आहेत. अशा ठिकाणी कुशल मनुष्यबळ आवश्यक असते. त्याची पूर्तता बदनापूर कृषी महाविद्यालय व इतर केंद्राच्या माध्यमातून होत आहे. अर्थात बदनापूर येथे संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर राष्ट्रीय हवामान केंद्र मंजूर होणे गरजेचे आहे. तसेच मोसंबी फळ प्रक्रिया केंद्राची देखील नितांत आवश्यकता आहे.
- भगवानराव मात्रे, शेतकरी तथा अध्यक्ष स्वाद शेतकरी उद्योग, बदनापूर
माझे कृषी पदव्युत्तर शिक्षण बदनापूर कृषी संशोधन केंद्रातून पूर्ण झाले. या प्रक्षेत्रावर प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे कार्य केले. सध्या मी जालना येथील महिको आंतरराष्ट्रीय बियाणे कंपनीत रोप पैदासकार म्हणून कार्यरत आहे. बदनापूर कृषी संशोधन केंद्र येथे सुधारित जाती निर्माण करण्याचे तंत्र अवगत केल्याने त्याचा फायदा मला माझ्या क्षेत्रात होत आहे.
- डॉ. सतीश सुरासे, रोप पैदासकार, महिको, जालना
बदनापूर कृषी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे महत्त्वाचे केंद्र झाले आहे. जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योगाला या दोन्ही केंद्राचा मोठा लाभ होत आहे. मी बदनापूरला शिक्षण घेत असताना तुरीच्या पिकांवरील संशोधन कार्याचा अभ्यास करता आला.
चांगल्या प्रतीची आणि कमी कालावधीत तूर उत्पादन करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शक मला याच ठिकाणाहून मिळाले. एकूणच शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि कमी कालावधीत दर्जेदार पीक उत्पादित व्हावे, शेतकऱ्यांना हंगामात दोनदा पिके घेता यावीत, या दृष्टीने यशस्वी कार्य करण्यात आले.
- डॉ. जस्ती श्रीवर्षा, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास फाउंडेशन, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.