जालना : मराठवाड्याची ओळख ही छत्रपती संभाजीनगरसह लातूर आणि नांदेड मोठ्या महानगरांमुळे आहे. मात्र, आता या शहरांच्या बरोबरीने जम्बो प्रकल्पांचे शहर म्हणून जालन्याची राज्यात ओळख निर्माण होत आहे.
त्यास कारण ही तसेच आहे, २०१४ नंतर जिल्ह्यात मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क, आयसीटी कॉलेज, रेल्वे पीट लाईन, सीडस पार्क, रेशीम बाजारपेठ या प्रकल्पांनंतर आता जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्ग आणि मेडिकल कॉलेजही मंजूर झाले आहे. शिवाय जालना महापालिकाही होणार आहे. त्यामुळे जालन्याचा चौफेर विकास होत असून दळणवळणांच्या सुविधांसह मराठवाड्यातील जम्बो प्रकल्पांचे शहर म्हणून जालन्याची ओळख निर्माण झाली आहे.
जालना जिल्हा हा मुळात कमी पर्जन्यमानात मोडतो. शिवाय जिल्ह्याला सत्ताकारणात लातूर, नांदेडप्रमाणे मोठे स्थान ही मिळाले नव्हते. परिणामी, मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्याचा विकास खुंटला होता. मात्र, २०१४ च्या सत्ता बदलानंतर जिल्ह्यात मोठे प्रकल्प येण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वात पहिला प्रकल्प जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दरेगाव शिवारातील ड्रायपोर्ट. याच ड्रायपोर्टचे आता मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कमध्ये रूपांतर झाले असून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यावर आहे.
शिवाय रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनची चाचणी ही यशस्वी झाली आहे. त्यामुळे जालना येथून लवकरच जनशताब्दी इलेक्ट्रिक इंजिनची रेल्वे धावणार आहे. तर दुसरीकडे रेल्वे पीट लाइनचे काम ही पूर्णत्वाकडे आहे. शिवाय रेल्वे स्थानक नूतनीकरणासाठी ही २५० कोटींची निधी केंद्राकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजूर करून आणला आहे.
तसेच सीड्स पार्क ही मंजूर असून पानशेंद्रा शिवारात काम सुरू आहे. तसेच आयसीटी कॉलेज ही जालना येथे सुरू झाले आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम बाजारपेठही सुरू झाली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही शहराजवळून गेला आहे. त्यामुळे दोन्ही शहरांकडील प्रवास आता कमी वेळेचा झालेला आहे.
या प्रकल्पांसह आता जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून जालना-जळगाव रेल्वे मार्ग व्हावा, अशी मागणी होती. या रेल्वे मार्गाचे रेल्वेच्या केंद्रीय पथकाने सर्वेक्षण केले होते.
शिवाय हवाई सर्वेक्षण ही करण्यात आले होते. या नवीन रेल्वे मार्गासाठी सात हजार १०५.४३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचा पन्नास टक्के निधी म्हणजे तीन हजार ५५२.७१५ कोटी रुपये राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
याशिवाय जालना येथे मेडिकल कॉलेजसह ४३० खाटांचे रुग्णालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. जालना येथील मेडिकल कॉलेजसाठी तालुक्यातील कुंभेफळ शिवारातील जागेची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पथकाने काही वर्षांपूर्वी पाहणी केली होती.
त्यामुळे ही जागा जवळपास निश्चित होणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मेडिकल कॉलेजसाठी इमारत होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालय येथे मेडिकल कॉलेज सुरू केले जाऊ शकते. या प्रकल्पांमुळे मराठवाड्यात जालन्याची ओळख ही जम्बो प्रकल्पांचे शहर म्हणून निर्माण होत आहे.
यांचे ठरले महत्त्वाचे योगदान
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
यांच्या पुढाकाराने ड्रायपोर्ट म्हणजे आताचे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क, आयसीटी कॉलेज, रेल्वे पीट लाईन, रेल्वे मार्ग विद्युतीकरणानंतर जालना-जळगाव नवा रेल्वे मार्ग यांनी खेचून आणला. शिवाय शहराअंतर्गत रस्त्यांसह पुलांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. तसेच मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न केले.
आमदार कैलास गोरंट्याल
यांनी जालन्यात मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी मोठा संघर्ष केला. अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. संबंधित मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करून मेडिकल कॉलेज मंजूर केले. शिवाय महात्मा फुले मार्केट उभारणीसाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून राज्य शासनाकडून मंजुरीही आणली होती.
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर
यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम बाजारपेठ उभारली. जालना महापालिकेसाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे जालना पालिकेचे महापालिकेत रूपांतर लवकरच होण्याच्या मार्गावर आहे.
मल्टी मॉडल लॉजिस्टिक
पार्क अंतिम टप्प्यात
आयसीटी कॉलेज झाले कार्यान्वित
रेल्वे पीटलाईनचे काम वेगात
समृद्धी महामार्गामुळे प्रवासाला गती
सीडस पार्क बनलाय लक्षवेधी
रेल्वेमार्ग विद्युतीकरणाकडे वाटचाल
नव्या रेल्वेमार्गाचा होणार फायदा
जालना-जळगाव हा १७४ किलोमीटर रेल्वे मार्ग जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव तीन जिल्ह्यातून जात आहे. याचा ऐतिहासिक अजिंठा पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. शिवाय सुरत, गुजरात, राजस्थानच्या रेल्वे गाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून या मार्गाचा फायदा होणार आहे. शिवाय जिल्ह्यातील राजूर, भोकरदन परिसर रेल्वेमार्गावर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.