परतूर - पुतण्याचा वाढदिवस करत आकात परिवाराने आपली मतदारसंघातील ताकद दाखवत पुन्हा एकदा आमदारकी वर दावा केल्याची चर्चा मतदार संघात रंगात आली आहे.
परतूर मंठा मतदारसंघातील माजी आमदार वैजनाथ आकात नातू व बाबासाहेब आकात यांचे चिरंजीव कपिल आकात हे सध्या राजकारणात सक्रिय आहे.
त्यांचे लहान बंधू कुणाल आकात यांच्या मुलगा कुबेर चा प्रथम वाढदिवस शनिवारी (ता.नऊ) होता. यानिमित्त शुक्रवारी परतूर मंठा मतदार संघातील आकात परिवारावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी त्यांनी वरद विनायक मंगल कार्यालयात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार राजेश टोपे, खासदार संजय जाधव, निर्मलाताई रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख , राजेश विटेकर, माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमानिमित्त अनेकांनी केलेल्या भाषणात कोपरखळ्याही मारल्या गेल्या. या वेळी महेबूब शेख म्हणाले, की आजच्या काळात काका पुतण्याचा वाढदिवस साजरा करतो ही अभिमानाची बाब आहे,
असे बोलताच जमलेल्या नागरिकांत एकच हशा पिकला. आमदार राजेश टोपे यांनी वैजनाथ आकात यांचा अनुभव व त्यांची शैक्षणिक क्षेत्रात असणारी तळमळ या बद्दल मनोगत व्यक्त केले. खासदार जाधव म्हणाले की, या विधानसभेचे नाव निघताच आधी आकातच नाव येते. एकंदरीत रावसाहेब दानवे यांचे जावई महेश आकात पण या कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित होते.
यावरून कपिल आकात हे आगामी विधानसभा निवडणूक लढवून विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभा करणार का अशी चर्चा परतूर शहरात जोरदार सुरू आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. पंकज बोराडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष ए. जे. बोराडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, काँग्रेसचे ॲड. अन्वर देशमुख, गोपाळ बोराडे, विलास आकात,
माजी नगराध्यक्ष विनायक काळे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड,माजी उपनगराध्यक्ष अंकुश तेलगड, माजी उपनगराध्यक्ष आरिफ अली, विजय राखे, वैजनाथ बागल आदी राजकीय नेत्यांसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान,आकात यांचे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. यात कोणत्याही निवडणुकीत कपिल आकात यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. एकंदरीत आकात परिवार विधानसभेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो, अशी चर्चा मतदारसंघात जोर धरत आहे.
हा आमचा पारिवारिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आमच्या आकात परिवारावर प्रेम करणाऱ्या जवळपास सात हजार जणांनी उपस्थिती लावून माझा पुतण्या कुबेरला शुभेच्छा दिल्या आहेत. राहिला विषय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा, जर पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढविणार आहे.
कपिल आकात, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, परतूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.