जालना - जालना रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी १८२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
जालना रेल्वे स्थानिकाचे नूतनीकरण भूमिपूजन रविवारी (ता.सहा) श्री. दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, उद्योजक घनश्याम गोयल, योगेश मानधनी, कैलास लोहिया, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, शहराध्यक्ष राजेश राऊत, सतीश घाडगे, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, रेल्वेच्या विभागीय अधिकारी नीती सरकार आदींची उपस्थिती होती.
श्री. दानवे म्हणाले, की केंद्रीय रेल्वे मंत्री झाल्यानंतर मनमाड ते जालना रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाला सुरवात केली, ते काम आता पूर्ण झाले आहे. जालना येथे शंभर कोटींची पीटलाईन मंजूर केली असून याचे काम पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण होईल. भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. जालना येथून वाराणसी, पुणे, तिरूपती या तीन रेल्वे सुरू केल्या आहेत. येत्या काळात जालना येथून जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे विद्युत इंजिनवर सुरू करण्यात येणार आहे.
शिवाय हैदराबाद-मुंबई ही रेल्वे विद्युत इंजिनवर धावेल. पहिल्या टप्प्यात मनमाड ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम येत्या एक ते दीड महिन्यात सुरू होईल. त्यानंतर पुढील टप्प्यात छत्रपती संभाजीनगर ते परभणीपर्यंत रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. जालना-जळगाव आणि जालना-खामगाव रेल्वे मार्गाची मागणी होत होती.
जालना-खामगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर जालना-जळगाव रेल्वे मार्गाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या शिवाय देशातील एक हजार ३०९ रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यांपैकी ५०८ रेल्वे स्थानक नूतनीकरणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामध्ये जालना रेल्वे स्थानकाचा समावेश असून १८२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
पुढील ५० वर्षांचा विचार करून हे रेल्वे स्थानक निर्माण करण्यात येत आहे. राजूर गणपती मंदिर प्रतिकृती असलेले रेल्वे स्थानक निर्माण होणार आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूने ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे सर्व सुविधा असणार आहेत. येथे मॉलची उभारणी केली जाईल, त्यात गाळे भाडेतत्त्वावर घेऊन अनेकांना व्यवसाय सुरू करता येणार आहे. यामुळे शहरासह पर्यटनाचा विकास होईल. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या रेल्वे स्थानकाच्या कामाला सुरवात होणार आहे, असे श्री दानवे यांनी यावेळी म्हटले.
शहराच्या इतिहासातील रेल्वे नूतनीकरण भूमिपूजनाचा हा सुवर्णक्षण आहे. श्री. दानवे यांच्यामुळे या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. याचा येथील नागरिकांना फायदा होईल. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर शहराच्या विकासात भर पडत आहे. विकास कामे करताना त्यांनी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेतले. त्यांनी राजकीय पक्षात कधी भेद केला नाही.
- कैलास गोरंट्याल, आमदार, जालना
रेल्वे स्थानिक नूतनीकरणामुळे जालन्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे सुविधा मिळेल. येथील तरुणांना व्यवसायाची संधी मिळेल. ज्या पद्धतीने पुणे रेल्वे सुरू केली. जालना-जळगाव रेल्वे मार्ग नियोजित आहे. त्या पद्धतीने आता जालना ते बीड रेल्वे मार्ग श्री. दानवे यांनी मंजूर करून घ्यावा. त्याचा फायदा जालना, अंबड येथील नागरिकांनाही होईल.
- राजेश टोपे, आमदार, घनसावंगी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यामुळे जालना रेल्वे स्थानक नूतनीकरणासाठी १८२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यांनी जालना-जळगाव रेल्वे मार्ग मंजूर केला आहे. त्यांच्या रूपाने जालन्याला केंद्रात रेल्वे मंत्रिपद मिळाल्यानंतर अनेक कामे मार्गी लागत आहेत.
- नारायण कुचे, आमदार, बदनापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.