औसा : गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झाल्यास नैसर्गीक आपत्तीअंतर्गत मदत देण्याची सध्या तरतूदच नाही. यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन सरकारने बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्याची तरतूद केली होती. त्याच धर्तीवर शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नैसर्गिक आपत्ती अंतर्गत देण्याची तरतूद करावी अशी विनंती केली.
उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याने गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार श्री. पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लातूर जिल्ह्यात जवळपास ५ लाख ७५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून संततधार पावसामुळे व शंखी गोगलगायीच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रादुर्भावाने पिके नष्ट झाली आहेत.
शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गतच्या निकषात पिकांवर होणारे किड हल्ले ही बाब समाविष्ट आहे. परंतु शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसानीचा समावेश नसल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देता येत नसल्याचे महसूल विभागाचे मत आहे. सन २०१७ बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हा शासनाने या संदर्भात एक शासन निर्णयानुसार बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या निकषात करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित केली होती.
लातूर जिल्ह्यात गोगलगायीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. याच्या नुकसानीपोटी भरीव आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्याची आवश्यकता आहे. यामुळे राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या निकषात बोंडअळीच्या धर्तीवर शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा समावेश करण्यात यावा, तसेच सदरील नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त आर्थिक मदत त्वरीत देण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती या निवेदनाव्दारे आमदार श्री. पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.